PNE26W61411
अहिल्यानगर ः महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ साप्ताहिक उपक्रमांतर्गत बूथ हॉस्पिटल येथे डेंग्यूविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
------------
पाणीसाठे झाकून ठेवा, कोरडा दिवस पाळा
यशवंत डांगे ः घरोघरी जाऊन पाणीसाठ्यांची तपासणी
अहिल्यानगर, ता.२४ ः शहरात गेल्या तीन वर्षांपासून ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात आल्याने डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. यंदा आतापर्यंत डेंग्यूचे सरासरी आठ रुग्ण आढळले आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, साठवलेले पाणी उघडे ठेवल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातही होत असल्याने नागरिकांनी पाणीसाठे झाकून ठेवावेत आणि नियमितपणे कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘डेंग्यूमुक्त अहिल्यानगर’ साप्ताहिक उपक्रमांतर्गत बूथ हॉस्पिटल येथे डेंग्यूविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक दत्तात्रय कावरे, नगरसेविका मंगल लोखंडे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी सतीश राजुरकर, बूथ हॉस्पिटलचे प्रमुख सुरेंद्र चोपडे, आहारतज्ज्ञ शीतल शिंदे आदी उपस्थित होते. डांगे म्हणाले, नागरिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आहार, विहार आणि निद्रा यांचा योग्य समतोल राखल्यास आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत होते. बूथ हॉस्पिटलचे आरोग्यसेवेतील कार्य कौतुकास्पद आहे. कोविड महामारीच्या काळात या रुग्णालयाने जिल्ह्यात चांगले काम केले आहे, असेही डांगे यांनी नमूद केले.
------------
नगरसेवकांकडून उपक्रमाचे कौतुक
आयुक्त यशवंत डांगे स्वतः रस्त्यावर उतरून काम करतात, ही चांगली बाब आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आरोग्यविषयक सुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असल्याचे नगरसेवक बोराटे सांगितले, तर कदम म्हणाल्या, महापालिका प्रशासन आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा आणि महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा.