पुणे, ता. २४ : डेंगीमुळे लोहगाव येथील एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, एका लहान बाळालाही अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले आहे. लहान मुलांमधील डेंगीचे वाढते गंभीर प्रकार पाहून पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे; मात्र डेंगी विषाणूंच्या जनुकीय रचनेत बदल (म्युटेशन) किंवा इतर काही आनुषंगिक बदल दिसून येत नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
शहरात यावर्षी २,१८९ डेंगीचे संशयित रुग्ण आढळले असून, त्यांपैकी १०३ जणांना निश्चित निदान झाले आहे. २,१८९ जणांची ‘एनएस-१’ ही डेंगीची प्राथमिक चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, १०३ जणांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) केले आहेत. बाधितांमध्ये बालकांचे प्रमाणही दिसून येत आहे. वास्तविक पाहता, ज्यांना मधुमेह, रक्तदाब, वाढलेले वजन अशा सहव्याधी आणि वयोवृद्ध आहेत, त्यांच्यात डेंगीची गुंतागुंत होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. मात्र, मुलांमध्येही यावेळेस बाधा झाल्याचे दिसून येत आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश गुजर म्हणाले, ‘‘डेंगी विषाणूंचे डेंगी १, २, ३ आणि ४ असे चार प्रकार आहेत. त्यापैकी ‘डेंगी-२’ हा प्रकार अधिक गंभीर आहे आणि मृत्यूदर जास्त असतो. इतर प्रकारांत फारसा गंभीर परिणाम दिसून येत नाही. मात्र, त्यापैकी सध्या कोणता प्रकार जास्त आढळून येतो, हे पाहायला हवे. त्याबाबतचे रोगराईविषयक सर्वेक्षण हे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) ही केंद्रीय प्रयोगशाळा करते. दरम्यान, शाळेच्या बाजूला बांधकाम सुरू असेल किंवा पाण्याचा निचरा होत नसेल तर तेथे डासोत्पत्ती होते. तसेच, मुलांना शाळेत फुल पँट किंवा पूर्ण बाह्यांचा शर्ट घालून देत नसल्यानेही त्यांना डासांच्या चावण्याची शक्यता असते.’’
मोठ्यांमध्येही डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. तापाकडे दुर्लक्ष करून उपचारास उशीर करणे घातक ठरू शकते. प्लेटलेट्स कमी झाल्यावर रुग्ण रुग्णालयात येतात. पहिल्या तीन दिवसांत निदान झाल्यास उपचार सोपे होतात. यंदा तापाचे प्रमाण जास्त असून, अशक्तपणा जाणवतो. ‘एनआयव्ही’ने म्यूटेशनबाबत कोणतीही सूचना दिलेली नाही. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती रोखणे गरजेचे आहे.
- डॉ. आरती किणीकर, विभागप्रमुख, बालरोग विभाग, ससून रुग्णालय
‘एनआयव्ही’ने डेंगी विषाणूंच्या म्यूटेशनबाबत कोणतीही मार्गदर्शक सूचना दिलेली नाही. त्यामुळे याबाबत अद्याप काही सांगता येणार नाही. दरम्यान, खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्या बालिकेला इतर सहव्याधीही असल्याने, तिच्या मृत्यूचे नेमके कारण पडताळणी समितीच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. डेंगी फवारणीसाठी २२५ हून अधिक कंत्राटी मनुष्यबळ असून, त्यामध्ये वाढ केली जाईल.
- डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.