पुणे

दोन पावसाळ्यांच्या गावात डेंगी प्रतिबंधक लसीकरण

CD

दोन पावसाळ्यांच्या गावात डेंगी प्रतिबंधक लसीकरण

तमिळनाडूच्या तेनकाशी जिल्ह्यात देशातील पहिला प्रयोग

मयुरेश प्रभुणे : सकाळ न्यूज नेटवर्क

तेनकाशी (तमिळनाडू), ता. २६ : तमिळनाडूच्या तेनकाशी जिल्ह्यातील कडयानल्लूर हे गाव देशातील डेंगी नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी पथदर्शक ठरणार आहे. वर्षातील सात महिने पावसाळा असलेल्या या गावात लवकरच देशातील पहिले डेंगी प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. या प्रयोगामधून हाती येणाऱ्या निष्कर्षांनुसार देशभरात डेंगी प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवायचा, हे ठरविण्यात येईल.
तमिळनाडूच्या नैऋत्येला असलेला तेनकाशी हा जिल्हा पश्चिम घाटाशी संलग्न असून, या जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मॉन्सून, तर ऑक्टोबर ते डिसेंबर काळात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस होतो. एडिस इजिप्ती डासांच्या उत्पत्तीसाठी अनुकूल स्थिती असल्याने या जिल्ह्यातील कडयानल्लूर गावामध्ये २०१० पासून डेंगीच्या रुग्णांची वाढती संख्या नोंदवली जात आहे. या भागातील डेंगीवर नियंत्रण आणण्यासाठी तमिळनाडू सरकार आणि भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संयुक्त विद्यमाने लवकरच डेंगी प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार असून, त्यासाठी जपानी कंपनी ताकेडाने विकसित केलेली ‘क्यूडेंगा’ ही लस वापरण्यात येणार आहे. तमिळनाडू सरकार आणि आयसीएमआर यांच्यामध्ये नुकताच प्रायोगिक लसीकरणासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री के. जी. अरुणराज आणि आयसीएमआरचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी ‘सकाळ’ला माहिती देताना कडयानल्लूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अनिता कॉलिन्स म्हणाल्या, ‘‘आमच्या भागात जून ते डिसेंबर असा सात महिने पाऊस होतो. आसपासच्या प्रदेशात भातशेती मोठ्या प्रमाणात होते. तसेच, या भागात अनेक लहान मोठे तलावही आहेत. डासांचे प्रमाण जास्त असल्याने आमच्या आरोग्य केंद्रात दिवसाला सरासरी दहा ते पंधरा तापाचे रुग्ण तपासणीसाठी येतात. ऑक्टोबर ते डिसेंबर काळात रुग्णांची संख्या वाढते. गेली १६ वर्षे कडयानल्लूर आणि आसपासच्या गावांमध्ये डेंगीचे रुग्ण वाढत असून, काही रुग्णांचे डेंगीमुळे मृत्यूही झाले आहेत. आयसीएमआरने ठरवून दिलेल्या नियमांनुसार आम्ही उपचार करत असतो.’’
‘‘डेंगी प्रतिबंधक लसीकरणाचा प्रयोग सर्वसामान्य नागरिकांसोबत आरोग्य यंत्रणेसाठीही उपयुक्त ठरणार आहे. नोव्हेंबरपासून कडयानल्लूरमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार असून, रुग्णांना तीन महिन्यांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल. या रुग्णांच्या आरोग्यासंबंधीच्या नोंदी आयसीएमआरचे दोन शास्त्रज्ञ ठेवणार असून, त्या नोंदींमधून लसीचे काही दुष्परिणाम दिसतात का, लसीकरणानंतर गावातील डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी होते का, हे तपासण्यात येईल. या निष्कर्षांवरून तमिळनाडूत इतरत्र आणि देशाच्या इतर राज्यांत डेंगी प्रतिबंधक लसीकरणाचा निर्णय आयसीएमआरकडून घेण्यात येईल,’’ असेही डॉ. अनिता यांनी सांगितले.

कशी आहे क्यूडेंगा लस?
जपानी कंपनी ताकेडाने विकसित केलेल्या ‘क्यूडेंगा’ या लसीच्या वापराला २०२२ मध्ये परवानगी मिळाली. जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असलेली ही लस जगातील ४२ देशांमध्ये डेंग्यू नियंत्रणासाठी वापरली जाते. भारतात यंदाच्या जुलैमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने ‘क्यूडेंगा’च्या देशातील वापराला परवानगी दिली असून, बायोलॉजिकल ई कंपनीसोबत स्थानिक उत्पादन, तर डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या मदतीने लसीचे मार्केटिंग करण्यात येणार आहे. या लसीमध्ये डेंगीच्या विषाणूची अपायकारक नसलेली आवृत्ती वापरण्यात आली असून, ही लस विषाणूच्या चारही उपप्रकारांवर प्रभावी ठरते. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये संसर्ग झाल्यावर डेंगीचे शरीरावरील दुष्परिणाम आणि रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे नोंदींमधून दिसून आले आहे. चार ते ६० वर्षे वय असलेल्यांना ही लस देण्यात येईल.

Sayaji Shinde on Bhimashankar project : "पर्यावरण नष्ट करायला तुम्हाला निवडून दिलंय का?"; कर्जत-भीमाशंकरमधील प्रकल्पावरून सयाजी शिंदे भडकले, १ लाख तरुणांची फौज उतरवण्याचा इशारा!

Manchar News : आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज! मंचरचे जैव ऊर्जा तज्ञ ॲड. राहुल पडवळ यांचा नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव

Pune News : मध्यवर्ती पेठांमध्ये दिवसा मालवाहतुकीस बंदी; मालाची चढ-उतार करण्यास रात्री ११ ते सकाळी ९ या वेळेतच परवानगी

Ganja Smuggling : गांजाची तस्करी करणाऱ्या वाहतूक पोलिसाला तेलंगणात अटक

Pune News : पक्षकाराची सही, प्रतिज्ञापत्र नसल्याने पोटगीचा दावा फेटाळला; उत्पन्नाचा तपशीलही दिला नाही

SCROLL FOR NEXT