लोकांशी व्यवहार नीट ठेवा, विकासाचे माझ्यावर सोपवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रतिनिधींना इशारावजा सल्ला
सोलापूर, ता. २८ : जनता विकासकामांसह लोकप्रतिनिधींचा व्यवहारही पाहते. भाजपच्या पदाधिकारी-सदस्यांकडे गेल्यास सन्मान मिळेल, हा विश्वास वाटेल, असा व्यवहार ठेवा. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. पण पारदर्शी, प्रामाणिकपणे काम करा. भ्रष्टाचार खपवून घेणार नाही; अन्यथा पदावरून काढावे लागले, पद गेले तरी चालेल, असा इशारावजा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांना दिला.
भाजपने मंगळवारी येथे आयोजित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित सदस्यांसह पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपण निवडून आल्यावर माझ्यामुळेच निवडून आल्याचा समज होतो, त्यातून आपला व्यवहार बदलत जातो. लोक जसा विकास पाहतात, तसा आपला व्यवहारही पाहतात, हे लक्षात ठेवा. एकवेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत व्यवहार कसा आहे, हे सर्वाधिक महत्त्वाचे असते. भलेही एखादे काम होणार नाही, पण भाजपच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो तर सन्मान मिळेल, आमचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, आमच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, हा विश्वास वाटायला हवा. तशी भावना जनतेत निर्माण झाली पाहिजे.
निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केले, यावरून तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे, या माध्यमातूनही होणार आहे. कोणत्याही स्थितीत प्रामाणिक, पारदर्शी काम व्हायला हवे. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. पदावरून काढावे लागले, एखादे पद गेले तरी चालेल. लोकांनी पारदर्शी, प्रामाणिकतेने काम करण्यासाठी निवडून दिले आहे. आपल्या प्रत्येक कामात देवाभाऊ पाठीशी आहे, पण चुकलात तर त्याला माफी नाही. व्यवहाराचे आपण पाहा, लोकांशी आपला व्यवहार कसा आहे, हे आपण ठरवा. विकासाची काळजी माझ्यावर सोपवा. आपण जे जे मागाल ते ते देण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
विश्वास ठेवा, प्रामाणिकतेने काम करतील
सोलापूरकरांना आश्वस्त करतो, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला विश्वास वाया जाणार नाही. त्यातून उतराईसाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करू. निवडून आलेले लोकप्रतिनिधी पारदर्शी, प्रामाणिकतेतून आपली सेवा करतील, असा विश्वास व्यक्त करतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.