सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. ५ ः संविधानिक संस्थांकडून न्याय मिळत नसल्याचे सांगत संविधान बदलण्याची भाषा करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. संविधानाशी खेळाल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला.महायुतीतर्फे आज नागपुरात पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी यशवंत स्टेडियमवर झालेल्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अशी घोषणा देत भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दटके, आमदार परिणय फुके, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांतील विविध नेते सहभागी झाले. यशवंत स्टेडियम येथून संविधान चौकापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली.
संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून राष्ट्रगीताने पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेत नागपूर, विदर्भासह राज्यातील इतरही जिल्ह्यातून भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने अनेकदा संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन केले आहे. १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात संविधानात दुरुस्ती करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. आज ‘व्होट चोर’ म्हणणारेच संविधानाचे चोर आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशाचे संविधान बदलण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. जगातील विविध देशांमध्ये सत्तापालट घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींचे हस्तक राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला.
जनताच काँग्रेसला उत्तर देईल
नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेसह विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपातून सत्तांतर घडविण्याचे प्रयत्न झाल्याचा उल्लेख करीत भारतातही असेच षडयंत्र सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. भारतीय संविधानाची मूळ ओळख निळ्या रंगाशी जोडलेली असताना राहुल गांधी यांच्या हातात दिसणारे लाल रंगाचे पुस्तक संविधान बदलण्याच्या त्यांच्या मनीषेचे प्रतीक असल्याची टीका फडणवीस यांनी केली. देशातील जनता या षडयंत्राला उत्तर देईल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस लोकांना संभ्रमात टाकते ः गडकरी
देशातील विविध राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसला विजय मिळतो. केरळ, तेलंगण आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेस विजयी होते, तेव्हा लोकशाही धोक्यात नसते. मात्र, पराभव होताच राहुल गांधी देशाची लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप करतात. काँग्रेस लोकांना पटवून देऊ शकत नाही, तेव्हा गोंधळात टाण्याचे काम करते. सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेसचे नेते सैरभैर झाले असून, लोकशाही संस्था आणि व्यवस्थेवर आघात करत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला बदनाम करून मतचोरीच्या आरोपांद्वारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. संसद हे मत मांडण्याचे व्यासपीठ असताना काँग्रेस कामकाजात अडथळे आणत आहे. भाजपचा लोकशाहीवर ठाम विश्वास असून, लोकशाहीचे रक्षण करणे हे आमचे मिशन आहे, असे गडकरी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.