MGV26B15180
मंगळवेढा : शहरातील दामाजी चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून जीव मुठीत धरून रस्ता पार करताना विद्यार्थिनी.
........
मंगळवेढ्यातील दामाजी चौकात वाहतूक कोंडी कायम
.......
विद्यार्थी अन् नागरिकांसाठी धोकादायक चौक; स्कायवॉकची मागणी
..........
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. २५ : शहरातील दामाजी चौकात वारंवार वाहतूक कोंडी होत असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेला ये-जा करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्कायवॉक उभारण्याची मागणी पुढे येऊ लागली. पालिकेत चार वर्षानंतर लोकप्रतिनिधी आल्यामुळे पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
शहरातील प्रमुख चौक असलेला दामाजी चौक नेहमी वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जातो. शहरात जाणारा मार्ग देखील या ठिकाणाहून जातो. शिवाय पंढरपूर व विजयपूरकडे जाणारी वाहने, एसटी बसस्थानक, पेट्रोल पंप, पोस्ट ऑफिस, पंचायत समिती, भारतीय स्टेट बँक, दामाजीपंत मंदिर, मंगळवेढे भूमी संतांची सेल्फी पॉइंट, फळे व फूल विक्रेते ही कायम वर्दळीची ठिकाणे देखील याच परिसरात येत असल्यामुळे या चौकाला कायम जत्रेचे स्वरूप निर्माण झालेले असते. येथे नागरिकांची वर्दळही मोठी आहे. शिवाय पंढरपूर विजयपूर हा बायपास रस्ता केला असला तरी अनेकदा अवजड वाहने शहरातून जात आहेत. शिवाय सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सध्या दुचाकी वाहनधारकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. वाहनांची संख्या पाहता, वाहतुकीवर नियंत्रण करणे देखील अडचणीचे ठरणारे आहे. याच रस्त्यालगत इंग्लिश स्कूल ही माध्यमिक शाळा व महाविद्यालय आहे. या शाळेमध्ये शहर व ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकावयास येत आहेत. वाहनांच्या रांगा लागल्यामुळे त्यांना रस्त्याच्या एका बाजूला थांबावे लागत आहे. त्यामुळे या कोंडीवर व विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्कायवॉक उभारण्याची मागणी होत आहे. त्या दृष्टीने नगरपालिकेने लक्ष घालण्याची मागणी देखील पुढे येऊ लागली.
----
चौकट
उपनगराध्यक्ष याच संस्थेचे सेवानिवृत्त प्राध्यापक
चार वर्षानंतर नगरपालिकेत लोकप्रतिनिधी आले नगराध्यक्ष सुनंदा अवताडे यादेखील उच्चशिक्षित आहेत उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले शिवाय उच्चशिक्षित नगरसेवक आल्यामुळे या नगरपालिकेच्याकडून अपेक्षा वाढल्या.
दामाजी चौकात वाहनाच्या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे येण्यासाठी गैरसोयीचे होत आहे. विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्यामुळे स्काय वॉक झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये येण्या-जाण्याचा मार्ग सोयीचा होऊ शकतो.
- अण्णासाहेब आसबे, नागरिक, मंगळवेढा
-----
या परिसरातील शिक्षण संस्थांमध्ये प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन असे ७५०० विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. शाळा भरताना व सुटताना रस्त्यालगत शाळेचे कर्मचारी थांबवलेले असतात. स्कायवॉक झाल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
- अॅड. सुजित कदम, अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, मंगळवेढा
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.