ऐन खरिपात डिझेल टंचाईचा फटका
विदर्भातील १२७४ पेट्रोल पंपांवर मर्यादित पुरवठा; मशागतीची कामे ठप्प
विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : शेतीच्या यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देत विविध योजना राबविणाऱ्या शासनाकडूनच आता डिझेल पुरवठ्यावर मर्यादा आल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांना केवळ १२ ते १५ लिटर डिझेल दिले जात असल्याने मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की विदर्भातील पेट्रोल पंपांची दरमहा डिझेल मागणी साडेतीन लाख लिटरपेक्षा अधिक आहे. मात्र उपलब्ध होणाऱ्या एकूण डिझेलपैकी तब्बल १.२ लाख लिटर डिझेलचा वापर एकट्या नागपूर जिल्ह्यात होतो. उर्वरित साठ्याचे वितरण विदर्भातील अन्य १० जिल्ह्यांत केले जाते. उपलब्ध डिझेलपैकी ७० ते ८१ टक्के इंधन मालवाहतुकीसाठी वापरले जाते, तर केवळ २० ते २५ टक्के डिझेल शेतीकामासाठी उपलब्ध राहते. अनेक गावांत स्थानिक पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने १० ते १२ किलोमीटर अंतरावरील पंपांवर जावे लागत आहे. मात्र तेथेही मर्यादित डिझेल मिळत असल्याने दिवसभर प्रतीक्षा करूनही काही तासांचीच मशागत होत असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.
अख्खा दिवस पंपावर; तरीही १५ लिटरच डिझेल
‘‘खरीप हंगाम तोंडावर असून मशागतीची कामे वेगाने सुरू आहेत. पण स्थानिक स्तरावर डिझेल मिळत नसल्याने १० ते १२ किलोमीटर दूर जावे लागत आहे. तेथे दिवसभर रांगेत थांबल्यानंतरही केवळ १५ ते १८ लिटर डिझेल दिले जाते. त्यामुळे काही क्षेत्राचीच मशागत होते आणि उर्वरित वेळ ट्रॅक्टर उभाच ठेवावा लागतो,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील काउरवाडी (अंबोडा) येथील शेतकरी गजानन विजय बोरकर यांनी व्यक्त केली.
चौकट --
जिल्हानिहाय कार्यरत पेट्रोल पंपांची संख्या
नागपूर --- २५२
अमरावती १७१
यवतमाळ १४०
चंद्रपूर १२०
बुलडाणा ११०
वर्धा ९१
अकोला ८९
गोंदिया ८७
भंडारा ८३
वाशीम ७३
गडचिरोली ५८
एकूण १२७४
-----
शेतकरी संघटनांचा इशारा
डिझेल पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. यांत्रिकीकरणावर अवलंबून असलेल्या शेतीसमोर इंधनटंचाईचे संकट निर्माण झाल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र डिझेल कोटा जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
----
हंगामात पीककर्जापासून ते बियाणे आणि नंतर विमा भरपाईपर्यंत सर्वच टप्प्यांवर शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. आता शासन धोरणामुळे शेतकऱ्यांना हंगामाच्या तोंडावर पैसे देऊनही डिझेल मिळत नाही अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. प्रत्येक पातळीवर शेतकऱ्यांचीच अडवणूक का, असा माझा प्रश्न आहे.
- मनीष जाधव,
शेतकरी, वागद, यवतमाळ
फोटो ओळी : agnngp२०p११
यवतमाळ : काळी दौलत खान येथील पंपावर डिझेलसाठी लागलेल्या रांगा.
-----
फोटो : agnngp२०p१२
यवतमाळ : अंबोडा येथील पंपावर डिझेल मिळवण्याच्या प्रतीक्षेत ट्रॅक्टरधारक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.