पुणे - मंदी... मंदी असा धसका घेऊन गप्प बसण्याऐवजी ते एकत्र आले, लोकांपर्यंत गेले आणि व्यवसायाला पुन्हा गती दिली... पुण्यातील प्रकाशन व्यावसायिकांनी प्रतिकूल स्थिती असतानाही मंदीला इष्टापत्ती मानली. पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळे प्रयोग केले, त्यातून या व्यवसायाने पुन्हा उभारी घेतली आहे.
बाजारपेठेतील मंदीने अनेक व्यवसायांना विळखा घातला, तसा प्रकाशन व्यवसायालाही त्याचा जोरदार फटका बसला होता. पुस्तक विक्री निम्म्याने घटली होती; पण संकटे संधी घेऊन येतात, या उक्तीप्रमाणेच प्रकाशक, पुस्तक विक्रेते एकत्र आले. या प्रसंगातून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करून अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. वाचक हा पुस्तकापर्यंत येण्याऐवजी पुस्तके वाचकांपर्यंत पोचली आणि व्यवसायाला उभारी मिळाली.
‘मनोविकास प्रकाशन’चे आशिष पाटकर म्हणाले, ‘‘प्रकाशन व्यवसायाने आता उभारी घेतली आहे. सामान्य काळाप्रमाणे पुस्तकांची विक्री होऊ लागली आहे. मंदीचा काळ असतो, त्या वेळी प्रत्येकजण अधिक सर्जनशील होतो. त्याप्रमाणे आम्हीही विचार करू लागलो. काही प्रकाशक एकत्र आले विविध उपक्रम हाती घेतले. विषयांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यातून मार्ग दिसला आणि यशही मिळाले.’’
‘‘या सर्वांचा परिणाम राज्यभर झाला. आता पुस्तक विक्री चांगली होऊ लागली आहे. साहित्य संमेलनातही विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे,’’ असे पाटकर यांनी सांगितले.
लेखकांना दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीवर १२ टक्के जीएसटी आकारला आहे. पूर्वी हा कर नव्हता. आता कर लावल्याने पुस्तकांच्या किमती सुमारे वीस टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. त्यामुळेही पुस्तक विक्रीवर काहीसा परिणाम होत आहे.
- सुनील मेहता, प्रकाशक, मेहता प्रकाशन
ऐतिहासिक पुस्तके, चरित्रांना मागणी
मेहता प्रकाशनचे सुनील मेहता यांनी सांगितले, की मंदीतून व्यवसाय सावरत आहे; पण अशा काळात नवे प्रयोग करावे लागतात, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्या दृष्टीने प्रकाशकांनी प्रयत्नही केले. महाविद्यालये, उद्योगांपर्यंत पोचून तेथील वाचकांपर्यंत पुस्तके पोचवावी लागतील. सध्या ऐतिहासिक, चरित्रे अशा पुस्तकांना चांगली मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.