दृष्टिक्षेपात
दिग्विजय पाटील
यांच्याविरुद्ध आरोपपत्र
पुणे : कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात यापूर्वी शीतल तेजवानीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात दिग्विजय पाटील यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मात्र, तपासात मिळालेली माहिती, तसेच दस्तऐवजाची पाहणी केल्यानंतर या प्रकरणातील आरोपपत्रात पाटील यांचे नाव समाविष्ट करण्यात आले.
बालिकेवर अत्याचार;
जनआक्रोश मोर्चा
पुणे : येवलेवाडी परिसरात आजोबांकडूनच चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना पुणे शहराच्या वतीने कोंढवा येथील खडीमशीन चौक येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नसरापूर, पर्वती आणि आता येवलेवाडीत घडलेल्या या सलग घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बनावट मृत्यू दाखला;
वाढवणला एकास अटक
तारापूर : डहाणू तालुक्यातील वरोर येथील जमीन फेरफार प्रकरणात बनावट मृत्यू दाखला तयार केला होता. त्यावरून वारस नोंद करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनोहर बाबुराव चौधरीविरुद्ध वाणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्यांना नुकतीच अटक केली. जिल्हा प्रशासन, पोलिसांनी वाढवण बंदर परिसरात असे गैरप्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
‘एटीएम’ मशीन
घेऊन चोरटे पसार
सोलापूर : विडी घरकुल परिसरातील सग्गम नगरातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रातील मशीनच शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली. मशीनमध्ये एक लाख ७९ हजार १०० रुपये होते. चोरट्यांनी त्यांच्याकडील मालवाहतूक वाहनात मशीन भरली आणि मुळेगाव रोडवरून दहिटणेमार्गे पुढे मार्डीपर्यंत गेले. पोलिसांचा तपास सुरू आहे.
------
साताऱ्यात बालकांवर
मोफत शस्त्रक्रिया
सातारा : अजिंक्यतारा उद्योग समूहाचे संस्थापक अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमित्त कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने जिल्ह्यातील शून्य ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी मोफत आरोग्य व शस्त्रक्रिया शिबिर झाले. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हे शिबिर घेण्यात आले. या उपक्रमातून १०१ बालकांवर विविध प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
--------------
दीड लाखाचे
गोमांस जप्त
नेवासे शहर : शहरातील आतारगल्लीत परिसरात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून मांसविक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीसह चार जण पसार झाले आहेत. या कारवाईत ५०० किलो अवैध गोमांस जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे.
---------
बस खड्ड्यात
कोसळून दोन जखमी
अहमदपूर (जि. लातूर) : नागठाणा येथून अहमदपूरकडे येणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या वाळूच्या टेम्पोने हुलकावणी दिल्याने अन् रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस चालकाचा ताबा सुटून बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. तांबट सांगवीजवळ रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अन्य प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
दागिने चोरणारी
टोळी जेरबंद
धाराशिव : श्री तुळजाभवानी माता मंदिरात गर्दीचा फायदा घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि मणीमंगळसूत्र लांबवणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. वाशीजवळील पारगाव टोल नाक्यावर दोन महिलांसह चार जणांना ताब्यात घेतले. संशयितांकडून २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि जीप असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.