राजकारणात डिजिटल क्रांती तरुणांच्या फायद्याची
सोशल मीडियामुळे नेटकरी युवकांना मिळतोय नवा रोजगार
सकाळ वृत्तसेवा ः वसंत कांबळे
कुर्डू, ता. ४ ः सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचाराचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. प्रचारासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम म्हणून पुढे आले आहे. सभा, दौरे, विकासकामे, जनतेशी संवाद अशा प्रत्येक घडामोडी आता लहान-लहान व्हिडिओ, रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून उमेदवार थेट जनतेपर्यंत पोचत आहेत. यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये प्राविण्य असलेल्या युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी सोशल मीडियावर कंटेंट तयार करण्यासाठी विशेष युवकांची नियुक्ती केली जात असून हे युवक आता थेट नेत्यांच्या गाडीतूनच दौऱ्यावर फिरताना दिसत आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचे क्षणोक्षणी चित्रीकरण, व्हिडिओ एडिटिंग, तत्काळ अपलोडिंग आणि जनतेपर्यंत पोचवण्याची जबाबदारी या युवकांकडे असते. त्यामुळे त्यांचे महत्त्व वाढले असून त्यांच्याशिवाय नेत्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोचणे कठीण झाले आहे.
या डिजिटल बदलामुळे केवळ राजकीय प्रचाराला गती मिळालेली नाही, तर ग्रामीण व शहरी भागातील अनेक नेटकरी युवकांना स्थिर उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. मोबाईल कॅमेरा, इंटरनेट आणि कौशल्याच्या जोरावर अनेक युवकांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही युवकांना मासिक मानधन मिळत असून तर काहींना कार्यक्रमनिहाय मानधन दिले जाते.
विशेष म्हणजे ही संधी शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन कौशल्यावर आधारित रोजगार देणारी ठरत आहे. सोशल मीडिया हँडलिंग, व्हिडिओ एडिटिंग, कॅप्शन लेखन, लाईव्ह स्ट्रीमिंग अशा विविध कौशल्यांना आता मागणी वाढली आहे.
एकूणच, बदलत्या राजकारणासोबत सोशल मीडियाचा प्रभाव वाढत असून, त्यातून नेटकरी युवकांसाठी रोजगार, अनुभव आणि भविष्याच्या दृष्टीने नवे दालन खुले झाले आहे. ही डिजिटल वाटचाल युवकांना आत्मनिर्भर बनवणारी ठरत आहे.
इमेज बिल्डिंगसाठी महत्त्वाचे
सध्याचा सोशल मीडियावर सर्व प्रचार चालू असून व्हिडिओ शुटिंग व रिल तयार करण्यासाठी प्रत्येक दिवसाला दोन ते तीन हजार रुपये मानधन दिले जाते. आता जिल्हा परिषद निवडणुका संपल्या तरी नंतर इमेज बिल्डिंगसाठी रिल क्रिएटर व व्हिडिओ मेकर यांना कामांची संधी असेल असे मत कुर्डूतील रिल क्रिएटर ऋषीकेश मुंगसे यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.