परवडणारी, दर्जेदार डिजिटल सेवा हे मिशन
आकाश अंबानी यांची ग्वाही
मुंबई, ता. १५ ः ‘‘देशातील प्रत्येक व्यक्तीला सर्वोत्तम, दर्जेदार आणि परवडणारी व प्रत्येक घराला जोडणारी डिजिटल सेवा देणे हे आपले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मिशन आहे,’’ अशी ग्वाही जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी आज कंपनीच्या ‘आयपीओ’च्या घोषणेच्या वेळी दिली.
आकाश अंबानी यांनी आपली बहीण आणि कंपनीच्या संचालक ईशा अंबानी तसेच कंपनीचे ‘सीईओ’ पंकज पवार व कोटक इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांच्यासह जिओ प्लॅटफॉर्म्सच्या ‘आयपीओ’ची माहिती पत्रकारांना नवी मुंबईतील ‘जिओ’च्या मुख्यालयात दिली.
‘‘भारतातील ६० टक्के ‘डेटा ट्रॅफिक’ सध्या जिओ हाताळत आहे. तीन वर्षांपूर्वी ‘जिओ’ने फाईव्ह जी सेवा सुरू केल्यानंतर आता चीन नंतर जगात सर्वांत मोठा फाईव्ह जी चा पसारा ‘जिओ’चाच आहे. ‘जिओ’ ही भारतासाठी, भारतातून आलेली, मात्र दर्जाचा विचार करता जगात आघाडीवर असलेली डिजिटल व्यवस्था आहे, असेही त्यांनी नमूद केले. २०१६ मध्ये इंटरनेट डेटा ची किंमत प्रत्येक जीबी मागे २२८ रुपये होती. ती आता आम्ही साडेसात रुपयांवर आणली आहे. तर तेव्हा डाउनलोड स्पीड केवळ अडीच एमबीपीएस होता. तो आता आम्ही ६८ एमबीपीएस वर नेला आहे. आमच्या कुशल अभियंत्यांनी ‘डिजिटल टेक्नॉलॉजी’चे ७,२२० पेटंट मिळवले आहेत,’’ असेही त्यांनी सांगितले.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिओचा महसूल एक लाख ४६ हजार ८८५ कोटी रुपये झाला. २०२४ मध्ये तो एक लाख ९५८ कोटी रुपये होता. देशात जिओचे तीन लाख ६० हजार ५३७ टॉवर असून दहा लाख रुट किलोमीटर फायबर यंत्रणा आहे. देशातील बँकांच्या ६५ हजार शाखांमध्ये जिओचे हाय स्पीड नेटवर्क आहे. विविध आस्थापनांमध्ये जिओच्या एकूण साडेतीन लाख कनेक्शन्स आहेत, असेही ते म्हणाले.
‘‘आम्ही २००९ मध्ये अमेरिकेच्या कॉलेजमधून मुंबईत आलो असता अत्यंत संथ इंटरनेटमुळे मला माझी असाइनमेंट देता आली नाही. त्यावेळी आकाश बरोबर झालेल्या चर्चेतूनच जिओचा जन्म झाला,’’ असे ईशा अंबानी यांनी सांगितले. प्रत्येकाला भारताच्या विकासात सहभागी होण्याची संधी मिळावी हे धीरूभाई अंबानी यांचे स्वप्न रिलायन्स पूर्ण करीत आहे, असेही त्या म्हणाल्या.
-----------------------
तीस हजार कोटी रुपयांचा इश्यू
भांडवली बाजारमूल्य दहा लाखकोटी
मुंबई, ता. १५ : ‘जिओ प्लॅटफॉर्म’चा आयपीओ हा भारतीय शेअर बाजाराच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठा म्हणजे ३०,१८८ कोटी रुपयांचा असल्याचे कोटक इन्व्हेस्टमेंट बँकेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी ‘आयपीओ’ची माहिती देताना सांगितले.
या शेअर साठी १०६५ ते १११९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. त्यात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणूक करता येईल आणि शेअर बाजारात हा शेअर २८ ऑक्टोबर रोजी नोंदणीकृत होईल. यातील ५० टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना, ३५ टक्के वाटा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तर १५ टक्के वाटा बड्या बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना मिळेल. यातील अडीच हजार कोटी रुपयांच्या शेअरचे आरक्षण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी असेल. तर ५०० कोटी रुपये कंपनीच्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील व त्यांना किमतीत पाच टक्के सूट मिळेल.
‘आयपीओ’ मधील शेअरच्या वरच्या पट्ट्यातील किमतीला सध्या या कंपनीचे भांडवली बाजारमूल्य दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल असेही कोटक यांनी सांगितले. ‘आयपीओ’ मधील बहुतांश रक्कम ही कंपनीची कर्जे पूर्णतः किंवा अंशतः फेडण्यासाठी वापरली जाईल, असे आकाश अंबानी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.