विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. २१ ः महापालिकेकडून विविध कल्याणकारी योजनांची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जाते. मात्र, अर्जांच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना छायांकित प्रती (हार्ड कॉपी) सादर कराव्या लागत असल्याने अर्ज दाखल केल्यापासून लाभार्थी दिव्यांग व्यक्तीला प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत चार ते पाच महिन्यांचा कालावधी जात आहे. मग, या ऑनलाइन पद्धतीचा फायदा काय ? असा सवाल दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून दिव्यांग, विशेष (गतिमंद), महिला व बालकल्याण, मागासवर्गीय तसेच कुष्ठरोग पिडीत व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कार्यप्रणाली सुलभ आणि पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब केला जातो. मात्र, ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जांच्या छाननीच्यावेळी मंजूर अर्जदारांना मूळ कागदपत्रांचे दोन झेरॉक्स संच प्रभाग कार्यालयात सादर करावे लागतात. त्यामुळे दिव्यांगांना शारीरिक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
घरभेटीकडे दुर्लभ
दिव्यांग कल्याणकारी योजनेतील लाभार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांत काही संभ्रम असल्यास प्रभागातील समाज विकास विभागाच्या समूह संघटकांनी संबंधित दिव्यांग व्यक्तीच्या घरी भेट देणे आवश्यक आहे. मात्र, समूह संघटक दिव्यांगांना फोन करून प्रभाग कार्यालयात बोलावतात. त्याने विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या योजनेच्या कार्यपद्धतीत बदल होण्याची गरज असल्याचे दिव्यांग लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.
दिव्यांगांसाठी काही योजना
- पं. दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी (अर्थसाहाय्य) योजना - प्रति माह रक्कम रुपये २,५००.
- दिव्यांग विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वीनंतरचे (प्रथम वर्ष) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी शुल्काची रक्कम. परंतु जास्तीत जास्त रक्कम रुपये एक लाख.
- उपयुक्त साधन घेणेकामी दिव्यांगत्वानुसार उपयुक्त साधनाच्या रक्कमेसाठी एकदाच जास्तीत जास्त १ लाख रुपयांची मदत.
- व्यवसायासाठी बँकेकडील मंजूर कर्जाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त रक्कम रुपये १ लाख अर्थसाहाय्य.
- संत गाडगे महाराज दिव्यांग, अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर १ लाखांचे अर्थसाहाय्य.
- प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनेअंतर्गत घर खरेदीकामी १ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य.
- फिरत्या वाहनांवरील (तीन चाकी ई-वाहन) दुकान उपलब्ध करून देणेकरीता जास्तीत जास्त १ लाख ७३ हजार २५० रुपये
- पं. दीनदयाल उपाध्याय शिष्यवृत्ती योजना (पहिली ते चौथीचे विद्यार्थी) - वार्षिक रक्कम रुपये ३६,०००.
- पं. दीनदयाल उपाध्याय - दिव्यांगामुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुला/मुलींना अर्थसाहाय्य - वार्षिक रक्कम रुपये ३६,०००.
दिव्यांग कल्याणकारी योजनेतील कर्जप्रकरणे व सहाय्यक उपायुक्त साधन खरेदीसाठी अर्थसाहाय्य या दोन योजनांसाठी दिव्यांगांना प्रत्यक्ष बोलावण्यात येते. इतर योजनांसाठी बोलावले जात नाही.
- निवेदिता घार्गे, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग कक्ष, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना खूप चांगल्या आहेत. परंतु ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जांची छाननी करण्यासाठी विनाकारण विलंब होत असल्याने प्रत्यक्ष लाभ वेळेवर मिळत नाही. या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा झाली तर अनेक दिव्यांगांना फायदेशीर होईल.
- हरिदास शिंदे, दिव्यांग पुनर्वसन क्षेत्रातील कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.