घोडेगाव (पुणे) : जिल्हा परिषदेने आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्यांना बोलाविण्यात आले होते, मात्र पंचायत समिती सदस्यांना बोलाविण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना जाब विचारत गदारोळ घातला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी यापुढे बैठकांना पंचायत समितीच्या सदस्यांना बोलाविण्याचे आश्वासन दिल्यानंतर बैठकीचे कामकाज सुरू झाले.
या बैठकीला जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते. मात्र, बैठकीला न बोलाविल्यामुळे पंचायत समिती सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. तालुक्याचे प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेत आणि पंचायत समिती सदस्यांनी पंचायत समितीत मांडावेत, असा नियम आहे. मात्र, संबंधित अधिकारी तालुक्यातील बैठकांचे निमंत्रण देत नाहीत. आढावा बैठकांना आठही पंचायत समिती सदस्यांना बोलाविणे अपेक्षित असल्याचे सदस्य रवींद्र करंजखिले व राजाराम बाणखेले यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या पुढील बैठकांना पंचायत समिती सदस्यांना बोलाविण्यात येईल, असे सांगितल्यानंतर आढावा बैठक अखेर सुरू झाली.
पंचायत समिती आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण, महिला बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, छोटे पाटबंधारे, पशुसंवर्धन, बांधकाम आदी विभागांच्या कामकाजाचा या वेळी आढावा घेण्यात आला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात, रूपाली जगदाळे, तुलसी भोर, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदी या वेळी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व उपसभापतींनी उपस्थित राहण्याचे पत्र काढले होते. मात्र, पंचायत समिती सदस्यांनादेखील या बैठकीत सहभागी करून घेण्यात आले.
- संजय गवारी, सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.