जिल्हा बँकेच्या ९ जागांसाठी रंगणार सामना
सहकार पॅनेलविरोधात ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’; २३ उमेदवार रिंगणात
ॲग्रोवन वृत्तसेवा
बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार झाली आहे. २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘सहकार’ पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदरा मनोज कायंदे यांनी ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ मैदानात उतरविल्याने बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले आहेत. उर्वरित जागांसाठी रविवारी (ता. २३) मतदान होणार आहे.
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनेल विरोधात हे पॅनेल निवडणूक लढवत आहे. आमदार कायंदे यांनी पत्रकार परिषदेत पॅनेलची घोषणा केली. जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिल्याने बँकेला उभारी मिळाली. सध्या बँक सुमारे २४ कोटी रुपयांच्या नफ्यात आली असतानाही अजित पवार यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व नाकारण्यात आल्याची खंत कायंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
नऊ जागांसाठी २३ उमेदवार
महिला राखीव दोन जागांसाठी पाच, ओबीसी एका जागेसाठी चार, अनुसूचित जाती एका जागेसाठी दोन आणि इतर संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. वैयक्तिक मतदारसंघात विद्यमान आमदार चैनसूख संचेती विरुद्ध ज्ञानेश्वरदादा ऊर्फ नाना पाटील अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे. लोणार ग्रामसेवा मतदारसंघात दोन, संग्रामपूरमध्ये तीन, तर मलकापूर ग्रामसेवा मतदारसंघात तीन उमेदवार आमनेसामने आहेत. यात काही बंडखोर तसेच अजित पवार गटाशी संबंधित उमेदवारांचाही समावेश आहे.
१२ उमेदवार बिनविरोध
मेहकर ग्रामसेवा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पणन मतदारसंघातून कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंदखेडराजा ग्रामसेवा मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे, मोताळा ग्रामसेवा मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच बुलडाणा येथून मयूर बाहेकार, चिखलीतून अंकुशराव पाटील, शेगावमधून पांडुरंगदादा पाटील, देऊळगावराजा येथून कावेरी सोनसळे, जळगाव जामोद येथून प्रसेनजीत पाटील, खामगाव येथून दिनेश काळणे, नांदुरा येथून राजेश देशमुख आणि व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.