जिल्हा बँक निवडणुकीत छाननीत
१२ उमेदवारी अर्ज अवैध
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान मोठ्या घडामोडी घडल्या असून, विविध त्रुटींमुळे तब्बल १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे आता २१ जागांसाठी रिंगणात २२४ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भातील तक्रारींवर वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या तक्रारी फेटाळल्याने संबंधित संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या छाननी प्रक्रियेत गृहनिर्माण व दूध संस्था मतदारसंघातून डी. के. पवार यांनी माघार घेतली, तर वाई सोसायटी मतदारसंघातून प्रतिस्पर्धी दीपक ननावरे थकबाकीदार असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. परिणामी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांची बिनविरोध निवडीकडे वाटचाल सुरू झाली आहे. अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कायदेशीर त्रुटी राहिल्याने एकूण १२ जणांचे अर्ज बाद झाले.
यात कऱ्हाड सोसायटीतून जगदीश जगताप यांचा अर्ज कर्ज थकबाकीमुळे, तर दीपाली साळुंखे यांचा अर्ज समिती सदस्यांच्या यादीअभावी अवैध ठरला. खंडाळा सोसायटीतून संतोष साळुंखे यांच्या भाडे सोसायटीतील दोन वर्षांच्या सदस्यत्वाच्या मुदतीवर उमेदवार नितीन भरगुडे-पाटील यांनी घेतलेली हरकत ग्राह्य धरण्यात आली. इतर मागास प्रवर्गातून बाळकृष्ण माळी व अनुसूचित प्रवर्गातून बाळकृष्ण काळे यांचे अर्ज जातीचा दाखला नसल्याने, तर सचिन माळी यांचा थकबाकीमुळे अर्ज बाद झाला. कृषी प्रक्रियेतून प्रकाश बडेकर यांचा अर्ज सूचक-अनुमोदक दुसऱ्या मतदारसंघातील असल्याने अवैध ठरला. विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातून भीमदेव बुरुंगले, लहुराज जाधव, रामचंद्र ढेकळे आणि अनुसूचित जाती प्रवर्गातून पराग रामगुडे यांचे अर्ज संचालक मंडळाची यादी न जोडल्याने फेटाळण्यात आले. याशिवाय प्रकाश बडेकर,सुरभी भोसले व कांताबाई ढेकळे यांचे अर्जही बाद झाले असले अन्य मतदार संघातील अर्ज वैध ठरल्याने ते निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. अर्ज मागे घेण्या दिवशी निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.