जिल्हा बॅंकेत ठरावांच्या
प्रमाणात जागा वाटपाचे सूत्र
शंभूराज देसाई; छाननीनंतर एकत्र बसून निर्णय
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. ३ : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. जिल्ह्यातील आम्ही चारही मंत्री, दोन आमदार व दोन खासदार एकत्रच आहोत. बॅंकेतील अकरा सोसायटीच्या जागेत कोणालाही मागे घ्या, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे उर्वरित राखीव दहा जागांच्या वाटपाचे सूत्र ठरविताना कोणत्या पक्षाचे किती ठराव त्या प्रमाणात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नेते अर्जांच्या छाननीनंतर एकत्र बसूनच यावर चर्चा करून निर्णय घेणार आहोत, अशी माहिती शिवसेनेचे नेते व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथे खलबते झाली. याबाबत मंत्री देसाई म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेतील जागा वाटपाबाबत काल आमची प्राथमिक चर्चा झाली. राज्यस्तरीय नेत्यांनी आमच्यासह आमच्या सर्व खासदार व आमदारांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जिल्हास्तरावर एकत्र बसू महायुती म्हणूनच निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. जिल्हा बॅंकेतील अकरा विकास सेवा सोसायटींच्या अकरा जागांवर कोणी कोणाला मागे घ्या, असे म्हणू शकत नाही. त्यामुळे उरलेल्या राखीव दहा जागा राहतात. त्या कशापद्धतीने लढायच्या त्याचे सूत्र ठरविले आहे. त्यामध्ये ज्या प्रमाणात ठराव आहेत, त्या प्रमाणात जागा वाटप होईल. यामध्ये भाजपचे ठराव किती, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठराव किती, शिवसेनेचे ठराव किती याची आकडेवारीनुसार त्याप्रमाणात या राखीव जागांचे सूत्र ठरवायचे आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या ठरावांची आकडेवारी माजी सभापती रामराजे निंबाळकर काढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावाचा आकडा मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, तसेच भाजपच्या ठरावांचा आकडा मंत्री शिवेंद्रसिंहराजे काढणार आहेत. काल ठरल्याप्रमाणे उमेदवारी अर्जांची छाननी सोमवारी आहे. त्यानंतर एकत्र बसून आकडेवारीनुसार कोणाचे किती ठराव याची चर्चा केली जाणार आहे. त्यातून एकत्र बसून जागांचे वाटप कसे करायचे हे ठरविले जाणार आहे.’’
जिल्ह्यातील चार मंत्री, दोन आमदार व दोन खासदार जागा वाटपाची एक बेसलाईन ठरवून राखीव दहा जागांचा तिढा सोडवायचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
.........................
चौकट
-------
गोरे दुष्काळ उपाययोजनांत
...
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना जाणूनबुजून लांब ठेवले जात आहे का, या प्रश्नावर मंत्री देसाई म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा झाल्यानंतर उपाययोजना चांगल्या व्हाव्यात, टॅंकरची चांगली व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार मंत्री गोरे हे रोजच्या रोज तेथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ते जिल्ह्यात उपलब्ध नाहीत.’’
........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.