आळंदी, ता. ५: विनर्स अकॅडमीच्या सहलीत दिवेआगर समुद्रात बुडून आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. क्लास चालकाचा हलगर्जीपणा आणि स्थानिक प्रशासनाची अक्षम्य अनास्था याला जबाबदार असल्याचा आरोप करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी केली आहे.
विनर्स अकॅडमीने गुरुवारी (ता. १) आयोजित केलेल्या सहलीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत विद्यार्थी तन्मय दत्तात्रय वहिले आणि राजवीर युवराज वहिले यांचे पालक दत्तात्रेय व युवराज वहिले यांनी सांगितले की, मुलांना आधी रायगड किल्ला दाखवून दमवले आणि त्यानंतर थेट धोकादायक समुद्रात उतरवले. भरती-ओहोटीची कोणतीही माहिती न घेता किंवा मुलांना कोणतीही सुरक्षा न पुरवता क्लास चालक अमर आदक यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला. मुळात श्रीवर्धनला जाणारी सहल परस्पर दिवेआगरला का नेली, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
ही दुर्घटना म्हणजे निव्वळ अपघात नसून, कोचिंग क्लासचा निष्काळजीपणा आणि प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणाचा बळी आहे, अशी तीव्र भावना पालकांनी व्यक्त केली. केळगाव येथील मृत विद्यार्थी सोहम भांडवलकर याचे वडील तुकाराम भांडवलकर यांनी प्रशासनाच्या बेजबाबदारपणावर ताशेरे ओढले. एवढी मोठी दुर्घटना घडूनही दुसऱ्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, यावरूनच प्रशासनाची अनास्था सिद्ध होते, असे ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणाची शासनाने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात असे जीव जाणार नाहीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पालक म्हणाले की...
पालकांना न कळवता सहलीचे ठिकाण परस्पर बदलले.
रायगडच्या ट्रेकनंतर थकलेल्या मुलांना थेट समुद्रावर नेले.
भरती-ओहोटीच्या वेळेची किंवा समुद्राच्या धोक्याची माहिती घेतली नाही.
विद्यार्थ्यांसोबत पाण्यात उतरताना कोणतीही सुरक्षात्मक खबरदारी घेतली नाही.
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर जीवरक्षक तैनात नव्हते.
धोकादायक जागा किंवा खड्डे दर्शवणारे कोणतेही सूचना फलक नव्हते.
तातडीच्या मदतीसाठी रुग्णवाहिका किंवा पोलिस यंत्रणा घटनास्थळी उपलब्ध नव्हती.
आठ मुलांचा जीव गेल्यानंतरही दुसऱ्या दिवशी किनाऱ्यावर सुरक्षेचा अभाव होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.