दिवाळी अंक संपादकीय
चला लावू अक्षरांचा दीप!
आनंदी कसं रहावं, आनंदी जीवन कसं जगावं, याबद्दल आपण बरंच काही ऐकलेलं, वाचलेलं असतं. आनंदाची व्याख्या तशी व्यक्तिपरत्त्वे बदलत जाते. आपल्या संतांनीही आनंदी जगण्याबद्दल बरंच काही लिहून ठेवलंय.
संत तुकाराम महाराज म्हणतात,
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदचि अंग आनंदाचे ॥१॥
काय सांगो जाले काहीचियाबाही । पुढे चाली नाही आवडीने ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथेचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
या अभंगाइतके समर्पक विवेचन अन्य कुणी केले नसावे. एकंदरीत संत तुकारामांनी आनंदी जगण्याविषयी उपरोक्त अभंगातून आपल्याला एकप्रकारे पासवर्डच देऊन टाकलाय. आनंद कुठे बाहेर मिळत नाही. तो आतच शोधावा लागतो. हा मंत्र हाती आला की उणे काही उरतच नाही. खरे तर इतरांनाही आनंद देण्यात आनंद असतो. हे ज्याला समजलं त्याला सारं काही गवसलं. हे ज्ञान कुठून येतं तर पुस्तकांतून, ग्रंथांतून.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, इये मऱ्हाटिचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी।
पसायदानात म्हणतात,
“आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये।
दृष्टादृष्ट विजयी । होआवे जी॥”
ज्याचं पुस्तकांशी मैत्र, त्याच्या आयुष्यात न्यून ते काय? साहित्य माणसाला समृद्ध करतं, नव्हे सुखाचा समृद्धी महामार्ग पुस्तक, ग्रंथातूनच जातो. प्रत्येकाच्या घरात पुस्तकांचं समृद्ध दालन असावं, यासाठी दैनिक ‘सकाळ’ने नेहमीच प्रयत्न केले. दैनिकातून, विशेष पुरवण्यांतून हा ज्ञानयज्ञ अव्याहत तेवत ठेवला. नगरकरांसाठी पुस्तक महोत्सव आयोजित करून तो व्यापक केला. लाखो पुस्तके या नगरीत आली, कोट्यवधींची खरेदी झाली. ती पुस्तके वाचून मिळालेले ज्ञान आकड्यात थोडेच मोजता येईल, ते अनमोलच!
भारतीय संस्कृतीत साजरा होणारा प्रत्येक सण-उत्सव आनंद देऊन जातो, नव्हे त्याचा सांधा आनंदाशीच जोडलेला आहे. दीपावली तर आनंदाची पर्वणी. गोडाधोडासह काही सकस साहित्यिक फराळ मिळावा, अशी वाचकांची नेहमीच अपेक्षा असते. दिवाळी अंकांनी ती भूक भागवली. दैनिक ‘सकाळ’ने नेहमीच सकस साहित्यिक फराळ देण्याचा प्रयत्न केला. यंदाही ‘अक्षरदीप’ या नावाने तो वाचकांच्या भेटीला येत आहे.
या अंकात जिल्ह्यातील साहित्यिकांना लिहितं केलंय. काही अनुभवी, तर काही नवखे, असा मेळ घातलाय. ज्येष्ठांसोबत नवख्यांनाही संधी देत वर्तमानाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केलाय. निखळ साहित्याला वाहिलेला यंदाचा ‘अक्षरदीप’ हा दिवाळी अंक वाचकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, यात शंका नाही.
आनंदाचा, दिव्यांचा सण. हा सण अंधार दूर करून प्रकाश किरण घेऊन येतो. यंदाच्या ‘अक्षरदी’पमध्ये त्यात काव्य, कथा, नाट्य, ललित, कादंबरी असा सर्वांगीण साहित्यपट मांडला आहे. इथल्या सारस्वतांनी नियतकालीकांच्या, पुस्तकांच्या, ग्रंथांच्या माध्यमातून नेहमीच मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. तोच वारसा ‘अक्षरदीप’च्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न.
दिवाळी अंकासाठी जिल्ह्यातील जाहिरातदार नेहमीच सहकार्य करीत असतात. संपादकीय, जाहिरात, वितरण विभागांतील सहकारी तर यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. नेहमीप्रमाणे यंदाही अशोक निंबाळकर यांनी संपादनाची धुरा सांभाळली. वितरण विभाग तसेच विक्रेत्यांचे नेहमी सहकार्य असते. वाचकांच्या हाती हा अक्षरांचा दीप देताना आनंद होत आहे.
यंदाच्या दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. मात्र, ही इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो... यासाठी आपण सर्वच प्रार्थना करूया...
वाचक, साहित्यिक, दैनिक ‘सकाळ’वर स्नेह असलेल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
- प्रकाश पाटील,
सहसंपादक, अहिल्यानगर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.