उत्तर अमेरिका
‘दिवाळी दिन’ जाहीर
वॉशिंग्टन ः कॅलिफोर्निया विधानसभेत ८ नोव्हेंबर हा दिवस ‘दिवाळी दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर झाल्याचे शनिवारी सांगण्यात आले. या ठरावाद्वारे राज्यातील नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदस्या दर्शना पटेल आणि ॲश कालरा यांनी हा ठराव मांडला होता. या ठरावानुसार, विधानसभेने आठ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी साजरी करण्यास मान्यता दिली आहे.
---
रामस्वामींना समर्थन
वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी ओहयोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत त्यांचे सहकारी विवेक रामस्वामी यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भारतीय वंशाचे उद्योजक आणि राजकारणी असलेले रामास्वामी हे एक उत्तम गव्हर्नर सिद्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सिनसिनाटी येथील ‘यंग अमेरिकन्स फॉर लिबर्टी’ या परिषदेत रामास्वामी यांच्या वक्तव्यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली होती.
---
आठ जणांचा मृत्यू
जुनो : अलास्का येथील एका दुर्गम भागातील लष्करी विमानतळावर दाट धुक्यात एक लहान विमान उतरताना अपघात होऊन सर्व आठ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती ‘ नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्डा’ने शनिवारी दिली.केप न्यूवेनहॅम लाँग रेंज रडार साइट विमानतळावर शुक्रवारी (ता.२१) विमान उतरविण्याचा प्रयत्न सुरू होता. पण वैमानिकांना धावपट्टी न दिसल्याने हा अपघात झाला.
---
मार्टिन यांचा राजीनामा
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निष्ठावान सहकारी एड मार्टिन यांनी प्रशासनातील पदाचा राजीनामा दिला आहे. न्याय विभागात विविध पदांवर कार्यरत असताना मार्टिन यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ अनेकदा नाराज असायचे. मार्टिन आता प्रशासनातून बाहेर पडत असून न्याय विभागातील ‘पार्डन ॲटर्नी’ पदाचा ते राजीनामा देत आहेत, असे ट्रम्प यांनी शनिवारी जाहीर केले.
---
बॉलरूमला तूर्त परवानगी
वॉशिंग्टन ः व्हाइट हाउसमधील ४० कोटी डॉलर खर्चाचे बॉलरूमचे बांधकाम सुरू ठेवण्यास अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शनिवारी परवानगी दिली. या प्रकल्पाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय विचार करत असून, तोपर्यंत ट्रम्प प्रशासनाची तातडीची विनंती मान्य करण्यात आली आहे. नियोजित बॉलरूमचे ६५ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनाने दिली आहे.
---
गुरुद्वारामध्ये हल्ला
टोरांटो ः कॅनडातील एडमंटन येथील नानकसर शीख गुरुद्वारामध्ये एका युवकाने स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी प्रार्थनास्थळाकडे जात असताना तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. यावेळी झालेल्या वादातून त्याने दोघांवर हल्ला केला. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
--------
युरोप
शाळेत तलवारीने हल्ला
जीनिव्हा ः स्वीडनमध्ये एका शाळेत १८ वर्षांच्या तरुणाने तलवारीने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून किमान दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्य स्वीडनमधील फागेर्स्टा शहरात शनिवारी ही घटना घडली. वेळी शाळेत सुमारे ४०० ते ५०० विद्यार्थी उपस्थित होते. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. हल्ल्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
---
हल्ल्यात दोन ठार
कीव्ह ः युक्रेनमधील शॉपिंग मॉलवर झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रशियाने केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनच्या रेल्वे विभागाचे प्रमुख अलेक्झांडर पेर्टसोव्हस्की यांनी शनिवारी माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.