दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट
शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्याने व्यापारी चिंतेत
अकोले, ता. ३० : दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असतानाही अकोले तालुक्यातील अकोले, राजूर, कोतूळ आणि समशेरपूर येथील बाजारपेठांमध्ये अपेक्षित खरेदीचा उत्साह दिसत नाही. दिवाळीसाठी व्यापाऱ्यांनी कपडे, भांडी, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, आकाशकंदील आणि फटाक्यांचा मोठा साठा केला आहे. मात्र, ग्राहकांची बाजारपेठेकडे पाठ असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याचा थेट परिणाम दिवाळीच्या खरेदीवर झाला आहे.
दिवाळीच्या काळात दरवर्षी कापड दुकाने, किराणा आणि भांड्यांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी असते. यंदा मात्र ग्राहक दुकानात येऊन वस्तूंचे भाव विचारत आहेत; परंतु प्रत्यक्ष खरेदी टाळत असल्याचे चित्र आहे.
राजूर येथील कापड व्यावसायिक योगेश वाकचौरे म्हणाले, "दिवाळीसाठी मोठ्या प्रमाणात कपड्यांचा स्टॉक आणला आहे. मात्र, ग्राहक येतात, भाव विचारतात आणि निघून जातात. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने खरेदीवर मर्यादा आल्या आहेत."
कोतूळ येथील किराणा व्यावसायिक संतोष कोते यांनीही यंदा उलाढाल घटल्याचे सांगितले. दरवर्षी दिवाळीत व्यवसाय दुप्पट होत असे; मात्र यंदा अपेक्षित खरेदी होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अकोले तालुक्यात अनियमित पाऊस, खरीप पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि रब्बी हंगामाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. शेतीचे उत्पन्न घटल्याने शेतमजूर आणि ग्रामीण व्यावसायिकांनाही त्याची झळ बसत आहे. मुलांचे कपडे, फराळाचे साहित्य आणि घरगुती वस्तूंच्या खरेदीवर अनेक कुटुंबांनी मर्यादा आणल्या आहेत.
दुष्काळी मदत, पीकविम्याची भरपाई आणि नमो शेतकरी सन्मान निधीचे प्रलंबित हप्ते मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. काही ठिकाणी उधारीवर खरेदी वाढल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. दिवाळीच्या शेवटच्या दिवसांत ग्राहक खरेदीसाठी बाहेर पडतील, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात पैसा आल्याशिवाय बाजारपेठेला उभारी मिळणे कठीण असल्याचे चित्र आहे.
---------
चौकट हेडिंग ः शेतकऱ्यांच्या खिशात पैसा कधी येणार?
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान
विहिरी आणि तलावांतील पाणीसाठ्यात घट
रब्बी हंगामाबाबत अनिश्चितता
पीकविमा आणि शासकीय मदतीची प्रतीक्षा
ग्राहकांची खरेदी घटल्याने व्यापाऱ्यांची चिंता
उधारी वाढल्याने स्थानिक बाजारपेठेवर आर्थिक ताण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.