समाजहिताची भूमिकाच कायम ठेवणार
ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे आज (बुधवार) वयाच्या ८५ व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाकडून त्यांना नुकतीच मानद डी. लिट पदवी देण्यात आली. त्यानिमित्त डॉ. साळुंखे यांच्याशी साधलेला संवाद...
---------
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
------------------
विद्यापीठाने केलेल्या सन्मानाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?
- महात्मा गांधी मिशन विद्यापीठाने डी. लिट ही मानद पदवी देऊन माझा गौरव केला. त्याचा अर्थातच मला आनंद आहे. तरीही एका गोष्टीची मला जाणीव आहे आणि ती म्हणजे हा गौरव आ. ह. साळुंखे या व्यक्तीचा नाही, तर मी आतापर्यंत जी भूमिका घेतली, जे विचार मांडले, इतिहासावर जे भाष्य केले, अशा सर्व गोष्टींना मनोबल देण्याचा भाग म्हणून मी या गौरवाकडे पाहतो. माझ्या कार्याची अशी दखल घेऊन मला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय अंकुशराव कदम आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याविषयी थोडक्यात म्हणजे विद्यापीठाविषयी मी अत्यंत कृतज्ञ आहे. या पदवीमुळे माझ्यावर एक जबाबदारीही आलेली आहे. यापुढेही मी समाजहिताची भूमिकाच घ्यावी. ही ती जबाबदारी आहे आणि मी माझ्यापरीने ही जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या समाजात उपयुक्तता काय आहे?
- या महामानवांनी जो मार्ग दाखवला आहे, जे कार्य केलेले आहे, ते स्थलकालाच्या पलीकडे जाणारे आहे. त्यामुळेच आता त्यांच्या विचारांचा स्वीकार आणि गौरव जगभर होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे काळ कितीही लोटला, तरीही त्यांचे मार्गदर्शन शिळे वा कालबाह्य झालेले नाही. मानवांचे परस्परांतील व्यवहार निकोप पद्धतीने राहिले, तर समाज अधिक स्थिर आणि परिपूर्ण होतो. हे या सर्वांच्या चरित्रातून स्पष्ट झाले आहे. म्हणून त्यांचे विचार आपल्या समाजासाठी कालही उपयुक्त होते. आजही उपयुक्त आहेत आणि उद्याही उपयुक्त असतील.
माणसामाणसांतील वाढता द्वेष संपविण्यासाठी काय केले पाहिजे?
- समाजव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या जातींमधील, धर्मांमधील अथवा विचारसरणींमधील मतभेदांनी द्वेषाचे रूप इतक्या विघातक पद्धतीने मला तरी प्रथमच जाणवत आहे. ते पाहून मन अतिशय व्यथित होते. या द्वेषाकडे आपण केवळ आध्यात्मिक क्षेत्रातील उपदेश म्हणून न पाहता वस्तुस्थितीमधील व्यावहारिक जीवनातील एक घटना म्हणून पाहणे मला महत्त्वाचे वाटते. ज्याच्याशी आपले काही मतभेद होतात, तेव्हा सांस्कृतिक वगैरे बाबींतील वेगळेपण जाणवते. त्यातून वेगळेपणा असलेल्या व्यक्तींविषयी किंवा जनसमूहांविषयी काही अपरिपक्व व्यक्तींच्या मनात संताप निर्माण होतो. तिरस्कार निर्माण होतो आणि त्याचे टोक गाठले जाते ते द्वेषामध्ये. त्याचा पहिला परिणाम स्वतःवर होतो. आपल्या मनात निर्माण होणारा द्वेष हे एकप्रकारचे विष असते. आपण जेव्हा कोणाचा तरी द्वेष करू लागतो. तेव्हा ते विष प्रथम आपल्या संपूर्ण अस्तित्वावर विघातक परिणाम करते. याचा अर्थ द्वेषाचा पहिला आघात द्वेष करणाऱ्या व्यक्तीवरच होतो. आपल्याला आपल्या मुलाबाळांची व्यक्तिमत्त्वे निकोप, परिपक्व आणि संतुलित बनवायची असतील तर त्यांच्या मनात कोणाविषयीही द्वेष निर्माण होणार नाही, असे संस्कार त्यांच्यावर केले पाहिजेत.
जगाला शांततेच्या मार्गावर नेण्यासाठी कोणती मूल्ये स्वीकारली पाहिजेत?
- वर्धमान महावीर आणि तथागत बुद्ध यांच्यापासून मध्ययुगातून गुरुनानक आणि संत कबीर, वारकरी संत यांच्याप्रमाणेच आधुनिक काळातील संत गाडगेबाबांपर्यंत सर्वांनी जो मानवतेचा संदेश दिला आहे, तोच शांततेचा मार्ग दाखवणारा आहे. त्यामध्ये अहिंसा आणि करुणा हे दोन फार महत्त्वाचे घटक आहेत.
विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात कसा रुजवता येईल?
- आपल्या जीवनात भल्याबुऱ्या, खऱ्याखोट्या, हिताच्या अहिताच्या गोष्टी एकमेकींमध्ये मिसळून येतात. अशावेळी विवेक आवश्यक असतो. विवेक म्हणजे वेचून घेणे. जे चांगले असते, जे खरे असते आणि जे हिताचे असते. ते घ्यायचे आणि त्याविरुद्ध असलेले नाकारायचे हाच विवेक होय. हा विवेकच माणसाला कल्याणाचा मार्ग दाखवतो. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक अशा सर्वप्रकारच्या जीवनात हा विवेक माणसाला आनंद देतो आणि उन्नत करतो. हे आपल्या कुवतीप्रमाणे शक्य तितक्या लोकांना पटवून देणे, त्यासाठी लोकांच्या मनात स्थान मिळवणे, त्यांच्या सुख, दुःखात सामील होणे हे केल्यास त्यांच्या मनात विवेकवाद रुजविणे सोपे होऊ शकते.
विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे एका दृष्टीने एकाच नाण्याचे दोन पैलू असतात. सृष्टीतील कारणकार्य आपल्या बुद्धीने समजून घेणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया असतो. कोणतीही गोष्ट आंधळेपणाने ऐकीव माहितीवरून, कोणीतरी काहीतरी सांगितले म्हणून कोणी मुद्दाम चाहडी केली म्हणून स्वीकारू नये, तर आपली बुद्धी वापरून विशिष्ट गोष्ट निर्दोष आहे की नाही हिताची आहे का नाही, हे पाहावे, मग ती स्वीकारायची की नाकारायची, हे ठरवावे. त्याचा अर्थ अशाप्रकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात उपयोगी नसतो. तर तो आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये देखील तो आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करीत असतो, म्हणून लहानपणापासूनच हा वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या मनात रुजविणे आवश्यक असते. खासकरून मुलींच्या बाबतीत तसे करणे ही मोठी जबाबदारी मानली पाहिजे. आपले कर्तव्य मानले पाहिजे. कारण आपल्या समाजात अजूनही बहुसंख्य महिला अंधश्रद्धांच्या वाहक बनतात आणि त्यामुळे त्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन नकोसा वाटतो; पण ही घटना व्यक्तिमत्त्वाच्या निर्दोष विकासाला घातक ठरते. माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्व अंगांनी परिपूर्ण रितीने फुलण्यासाठी लहानपणापासून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार करणे गरजेचे आहे. पालक, शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
आयुष्याच्या प्रवासात काही करायचे राहून गेले का?
- तसे पाहिले तर मला बऱ्यापैकी दीर्घायुष्य मिळाले आहे. आयुष्याच्या प्रवासात मला जे अभिप्रेत होते. ते साध्य करण्याचा शक्य तितका प्रयत्न मी केलेला आहे. त्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे. तृप्त आहे. अर्थात जोपर्यंत श्वास चालू आहे, तोपर्यंत आपल्या हातून काहीतरी नवे घडावे, असे माणसाला वाटत राहतेच. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहताना, सिंहावलोकन करताना काही गोष्टी अपुऱ्या राहिल्या, असे जरूर वाटते. एकच गोष्ट सांगतो. ती गोष्ट माझ्या आईच्या संदर्भातील आहे. माझ्या आईची स्मरणशक्ती आणि बौद्धिक क्षमता माझ्यापेक्षाही कितीतरी पटींनी अधिक होती. तिला पाठ असलेल्या ओव्या, गाण्यांचे एक प्रचंड भांडारच तिच्या डोक्यात होते. असंख्य कथा आणि संतचरित्रे तिला मुखोद्गत होती; पण नवे तंत्रज्ञान उपलब्ध झालेले असतानाही माझ्याकडून या गोष्टींचे दस्तावेजीकरण झाले नाही. आज मला त्या गोष्टीचा खूप पश्चात्ताप होतोय. एका समृद्ध इतिहासाची नोंद मी केली नाही. त्याची आठवण झाली की खूप मनस्ताप होतो आणि हे जे काही घडले, त्याबद्दल मी कोणतेही आत्मसमर्थन देणार नाही.
--------------------
फोटो-
डॉ. आ. ह. साळुंखे - ५७९०३, ५७९०२
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.