डोंगरकिन्हीच्या डॉ. हेमंत देशमुख
यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’ पुरस्कार
अॅग्रोवन वृत्तसेवा
वाशीम : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सन २०२३ च्या प्रतिष्ठेच्या ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’ पुरस्कारासाठी मालेगाव तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी डॉ. हेमंत वसंतराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कृषी क्षेत्रासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यातील कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे दरवर्षी विविध पुरस्कार प्रदान केले जातात. त्याअंतर्गत सन २०२३ या वर्षासाठी अमरावती विभागातून डॉ. देशमुख यांची ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
डॉ. देशमुख यांनी पारंपरिक शेतीबरोबरच फलोत्पादन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी आपल्या शेतात अत्याधुनिक सिंचन व्यवस्था उभारली. जिल्ह्यात सर्वप्रथम आधुनिक सिंचन सुविधा विकसित करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी संपूर्ण शेतात ऑटोमेशन प्रणाली कार्यान्वित केली असून, त्याद्वारे पिकांना आवश्यकतेनुसार पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. यामुळे उत्पादनवाढीसह पाणी आणि खतांची बचत साध्य झाली आहे.
डॉ. देशमुख यांच्या यशस्वी प्रयोगांमुळे परिसरातील अनेक शेतकरी प्रेरित झाले असून त्यांनी आधुनिक शेती पद्धतींचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
येत्या काळात आयोजित विशेष सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत डॉ. हेमंत देशमुख यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
छायाचित्र ओळ :
वाशीम : ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मालेगाव तालुका कृषी विभागातर्फे डॉ. हेमंत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.