संजीवक सेवाव्रताचा प्रवास...
मानवतेचा सुगंध दरवळवणारे आरोग्योपासक डॉ. महेश मेणबुदले
...................................
रुग्णाच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा पुसून, त्याच्या मनामध्ये आरोग्यलाभाची भावना जागविणारा डॉक्टर हा केवळ चिकित्सक नसतो; तो असतो विश्वासाचा सखा, दुःखाचा सहचर आणि जीवन संघर्षातील आशेचा दीपस्तंभ... अशाच विश्वासार्हतेचा, सेवाभावाचा आणि संवेदनशील मानवतेचा प्रत्यय देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजीवक, आरोग्यसाधक डॉ. महेश मेणबुदले.
....................................
डॉक्टर..! हे केवळ एक पदनाम नव्हे, तर विश्वासाचे अधिष्ठान, आश्वासकतेचे प्रतीक आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित असलेले एक पवित्र व्रत. समाजमनाने डॉक्टरांकडे सदैव परमेश्वराचा प्रतिनिधी म्हणून पाहिले आहे. कारण, वेदनेने विव्हळणाऱ्या देहाला आरोग्याची नवसंजीवनी देतानाच, निराशेने मलूल झालेल्या मनाला आशेचा किरण दाखविण्याचे सामर्थ्य या व्यवसायात सामावलेले आहे.
अशा मानवतेच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या डॉ. मेणबुदले यांच्या सहवासात आश्वासन असते. त्यांच्या शब्दांत धीर असतो आणि त्यांच्या उपचारपद्धतीत रुग्णाविषयीची आत्मीयता असते. ‘आपण निश्चित बरे होऊ,’ ही भावना रुग्णाच्या मनात जागविण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. शरीराच्या व्याधींचे निवारण करतानाच मनाच्या जखमांवर मायेची फुंकर घालणारे, आरोग्यविज्ञानाची उपासना करतानाच मानवता धर्माची साधना करणारे आणि व्यवसायाच्या चौकटीपलीकडे जाऊन सेवेलाच जीवनध्येय अन् साध्य मानणारे डॉ. महेश म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक संवेदनशील, प्रगल्भ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व.
सेवा हेच कर्म, मानवता हाच धर्म
जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये माणूस आपले कर्तृत्व सिद्ध करतो; परंतु आरोग्यसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला एक वेगळेच परिमाण लाभलेले असते. कारण, येथे केवळ औषधांचा व्यवहार नसतो, तर विश्वासाचा असतो. येथे उपचार केवळ शरीराचे नसतात, तर आशा, आत्मविश्वास आणि जीवनप्रेरणेचेही असतात. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था आणि सामान्य जनमानस यांच्यामधील विश्वासाचा सशक्त दुवा म्हणून डॉक्टर महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
डॉ. महेश मेणबुदले यांच्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेली श्रद्धा ही त्यांच्या ज्ञानाची, अनुभवाची आणि सेवाभावाची फलश्रुती आहे. या विश्वासाचे जतन करणे, वैद्यकीय व्यवसायात सचोटीचे अधिष्ठान कायम ठेवणे आणि रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हेच त्यांनी आपल्या आचरणातून अधोरेखित केले आहे.
‘रुग्णसेवा ही साधना, सेवा ही प्रार्थना आणि मानवसेवा हाच परमेश्वराचा साक्षात्कार!’ ही भावना केवळ शब्दांत व्यक्त न करता कृतीतून साकार करणाऱ्या या शिवभक्त डॉक्टरांनी कोविडच्या अभूतपूर्व संकटकाळात रुग्णसेवेचे व्रत विलक्षण निष्ठेने जपले. त्याग, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकी यांचा संगम असलेल्या त्यांच्या या कार्याचे मूल्यमापन म्हणजे, एका सेवाव्रती जीवनप्रवासाचा गौरव करणे होय.
सामान्यांतून असामान्य कर्तृत्वाकडे
प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या पाठीशी संघर्षाची एक कहाणी असते. काही कहाण्यांना संपत्तीचा वारसा लाभतो, काहींना अनुकूल परिस्थितीचे पाठबळ मिळते; परंतु काही व्यक्तिमत्त्वे प्रतिकूलतेच्या खडकावर कर्तृत्वाची अक्षरे कोरतात.
डॉ. महेश मेणबुदले यांचा जीवनप्रवास अशाच जिद्दीचा, परिश्रमांचा आणि संस्कारसमृद्धतेचा प्रत्यय देणारा आहे. मातोश्री गृहिणी आणि एसटी महामंडळात वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत असलेले पिता, अशा साध्या कुटुंबात महेश यांचा जन्म झाला. दत्तात्रय आणि कमल यांच्याकडून मिळालेल्या संस्कारसंपन्न सहवासात तिन्ही भावांचे व्यक्तिमत्त्व घडले. थोरले विनायक यांनी विधीक्षेत्रात वकिलीची वाट निवडली, महेश यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केला, तर धाकटे विश्वजित यांनी अभियांत्रिकीचे क्षेत्र आपल्या कर्तृत्वासाठी निवडले. एका सामान्य कुटुंबातील तिन्ही भावांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या, परिश्रमांच्या आणि जिद्दीच्या बळावर स्वतंत्र व्यावसायिक ओळख निर्माण केली, ही निश्चितच अभिमानास्पद बाब.
सरकारी शाळा- महाविद्यालयांमधून शिक्षण घेताना त्यांनी परिस्थितीच्या मर्यादांना आपल्या स्वप्नांच्या मर्यादा होऊ दिल्या नाहीत. अल्प आर्थिक साधने, साधी राहणी आणि शिक्षणाविषयीची आंतरिक तळमळ यांच्या बळावर त्यांनी भविष्याचा विस्तीर्ण पट उलगडला. या प्रवासात दत्तात्रय यांची कर्तव्यकठोरता, कमल यांची वात्सल्यपूर्ण प्रेरणा आणि घरातील धार्मिक, सात्त्विक वातावरण यांचा मोलाचा वाटा राहिला.
बावधन या महत्त्वपूर्ण गावात या कुटुंबाचा संसार फुलला. घरात संपन्नतेचा झगमगाट नसला, तरी संस्कारांचे वैभव होते. ऐश्वर्याची रेलचेल नसली, तरी आनंदाची समृद्धी होती. परमेश्वराची आराधना, सात्त्विक आहार, परस्परांबद्दलचा आदर आणि शिक्षणाविषयीची आस्था या गोष्टी घरातील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होत्या. मुलांनी शिकावे, स्वकर्तृत्वावर उभे राहावे आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळवावे, ही पित्याची मनस्वी आकांक्षा होती.
महेश यांच्या आयुष्यातील आव्हान अधिक वेगळे होते. त्यांच्या पायांतील दिव्यांगत्वामुळे शारीरिक मर्यादांचा सामना करावा लागत होता. आर्थिक परिस्थितीही बेताची होती.
तीन मुलांचे शिक्षण, संसाराचा गाडा आणि भविष्याविषयीच्या असंख्य चिंता यांचा भार पेलताना माता-पित्यांनी मात्र आशावादाची ज्योत मात्र कायम तेवती ठेवली. कारण, त्यांचा विश्वास होता, स्वप्नांना साकार करण्यासाठी परिस्थितीपेक्षा प्रयत्न मोठे असतात आणि मर्यादांपेक्षा मनातील जिद्द अधिक सामर्थ्यवान असते..! याच प्रेरणाबळावर महेश यांनी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार केले.
वडिलांचा करारी सातारी बाणा, शिक्षणासाठीचा आग्रह आणि मुलांच्या भविष्याविषयीची अविचल निष्ठा यांमुळे एमबीबीएसच्या प्रवेशापर्यंतचा मार्ग सुकर झाला. या यशामागे केवळ एका विद्यार्थ्याची गुणवत्ता नव्हती; तर एका पित्याचा संघर्ष, एका मातेची माया आणि एका कुटुंबाच्या स्वप्नांची तपश्चर्या होती. म्हणूनच आज डॉक्टर म्हणून लाभलेल्या प्रतिष्ठेमध्ये महेश यांना आपल्या माता-पित्यांच्या कर्तृत्वाचेच प्रतिबिंब दिसते. त्यांच्या दृष्टीने मातापिता हे केवळ जन्मदाते नसून जीवनदृष्टी देणारे, संघर्षाची प्रेरणा देणारे आणि माणूसपणाचा अर्थ शिकविणारे आद्यगुरू आहेत.
तापोळ्याच्या दुर्गमतेत
उमललेली सेवासाधना
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉ. महेश यांनी केवळ शहरातील सोयीसुविधांनी संपन्न वातावरणाचा मार्ग स्वीकारला नाही. अनुभवांचे संचित मिळविण्यासाठी, सामान्य माणसाच्या वेदना समजून घेण्यासाठी आणि आरोग्यसेवेचा व्यापक अर्थ जाणून घेण्यासाठी त्यांनी जावळी तालुक्यातील तापोळा येथील शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा स्वीकारली.
तापोळा! निसर्गसौंदर्याने नटलेला, कोयना जलाशयाच्या विशाल जलविस्ताराने आणि सह्याद्रीच्या दुर्गम डोंगररांगांनी वेढलेला परिसर; परंतु या निसर्गरम्य प्रदेशातील अनेक नागरिकांसाठी आरोग्यसेवेपर्यंत पोहोचणे हीच एक मोठी परीक्षा होती. डोंगरदऱ्या, चिखलमय वाटा, पाण्याचे अडथळे आणि वाहतुकीच्या मर्यादा अशा प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणे म्हणजे खऱ्या अर्थाने सेवाधर्माची कसोटी! या परिस्थितीविषयी तक्रारींचा सूर आळविण्याऐवजी डॉ. महेश यांनी स्वीकाराचा, सहकार्याचा आणि सकारात्मकतेचा मार्ग निवडला.
सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध प्रस्थापित केले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आरोग्यसेवेविषयी विश्वास निर्माण केला. संपर्क, सातत्य, संयम आणि समजूतदारपणा यांच्या बळावर त्यांनी दुर्गम भागातील जनतेच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण केले.
काही प्रसंगी अंथरुणाला खिळलेल्या, वृद्ध रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांना डॉक्टरांना अक्षरशः पाठीवर घेऊन चिखल-पाण्यातून, होडीतून आणि दुर्गम पायवाटांवरून न्यावे लागे. अशा खडतर परिस्थितीतही रुग्णसेवेचा धागा तुटू न देणारा डॉक्टर म्हणजे केवळ वैद्यकीय अधिकारी नव्हे, तर संकटसमयी आधार देणारा जीवनदूतच.
या अनुभवांनी डॉ. महेश यांच्या ज्ञानाला व्यवहाराची जोड दिली, चिकित्सक बुद्धीला अनुभवांची धार दिली आणि सेवाभावाला अधिक व्यापक परिमाण प्राप्त करून दिले. प्रतिकूलतेच्या भट्टीतून तावून-सुलाखून निघताना त्यांचे वैद्यकीय कौशल्य अधिक प्रगल्भ झाले. रुग्णाच्या वेदनेपलीकडे त्याची सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती समजून घेण्याची दृष्टी विकसित झाली. तापोळ्यातील हा सेवाकाळ म्हणजे त्यांच्या व्यावसायिक जीवनातील केवळ एक टप्पा नव्हता; ती होती मानवतेच्या विद्यापीठातील अनुभवसमृद्ध पदवी.
कवठ्यात फुललेली रुग्णसेवेची उज्ज्वल कारकीर्द..!
तापोळा आणि महाबळेश्वर परिसरातील सेवाकाळानंतर डॉ. महेश मेणबुदले यांची नियुक्ती कवठे-वाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली. येथे त्यांच्या रुग्णसेवेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र असूनही दररोज सुमारे २५० ते ३०० रुग्ण उपचारांसाठी येऊ लागले. हा आकडा केवळ रुग्णसंख्येचा निर्देशांक नव्हता; तो डॉक्टरांच्या कार्याविषयी निर्माण झालेल्या विश्वासाचा, त्यांच्या चिकित्सक कौशल्याचा आणि आत्मीयतापूर्ण व्यवहाराचा परिचय होता.
गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अल्पशिक्षित, ग्रामीण-शहरी अशा कोणत्याही भेदभावाविना प्रत्येक रुग्णाच्या वेदनेला महत्त्व देणे, त्यांची व्यथा शांतपणे ऐकून घेणे आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या मर्यादेत शक्य तितकी उत्तम सेवा देणे, हा त्यांच्या कार्यशैलीचा स्थायिभाव बनला. रुग्णालय म्हणजे केवळ भिंती, उपकरणे आणि औषधांचा संच नव्हे, तर तेथे निर्माण होणारे विश्वासाचे वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते, याची त्यांना जाणीव होती. रुग्णांच्या गरजांचा विचार, सहकाऱ्यांचा सहभाग आणि समाजाच्या सहकार्याची सांगड घालून त्यांनी आरोग्य केंद्राला अधिक लोकाभिमुख बनविले. त्यांच्या या कार्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, वैद्यकीय क्षेत्रातील यश हे केवळ व्यक्तिगत कौशल्यातून नव्हे, तर सामूहिक प्रयत्नांतूनही साकार होत असते.
कोविडकाळात
माणुसकीचा जागर
मानवतेच्या इतिहासात काही काळ असे येतात, जेव्हा माणसाच्या ज्ञानाची, धैर्याची, कर्तव्यनिष्ठेची आणि नैतिकतेची कठोर परीक्षा घेतली जाते. कोविडचा काळ हा असाच एक अभूतपूर्व संकटकाळ होता. संपूर्ण जग भयभीत झाले होते. अनिश्चिततेचे सावट सर्वदूर पसरले होते. रुग्णालयांमध्ये खाटा अपुऱ्या पडत होत्या, आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता आणि संसर्गाच्या भीतीने अनेकांच्या मनात अस्वस्थतेचे वादळ घोंघावत होते.
अशा काळात साताऱ्याच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात एमडी डॉक्टरांची आवश्यकता निर्माण झाली. अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा विस्कळित होत असताना डॉ. महेश यांच्यासमोरही वैयक्तिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांची आव्हाने होती. त्यांच्या स्वतःच्या स्पंदन हेल्थ केअरमध्येही रुग्णसेवेचा ताण कमी नव्हता. तरीही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि अंतर्मनातील कर्तव्यबुद्धीला साद दिली.
सद्सद्विवेकबुद्धीचा कौल स्वीकारून त्यांनी जिल्हा रुग्णालयात विनामानधन, विनामोबदला सेवा देण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या सुरक्षिततेची चिंता आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांच्यापलीकडे जाऊन त्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य दिले. हा निर्णय केवळ धाडसाचा नव्हता; तो वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिक अधिष्ठानावर असलेल्या त्यांच्या अविचल श्रद्धेचा प्रत्यय होता.
समर्पणाची वृत्ती
एका सामान्य वाईकर डॉक्टरने असामान्य परिस्थितीत दाखविलेली ही जिद्द, समर्पणाची ही वृत्ती आणि माणुसकीचा हा जागर निश्चितच प्रेरणादायी आहे. कोविडकाळात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विशेष कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनात त्यांनी वैद्यकीय अधीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. गंभीर रुग्णांना उपचारांसाठी खाटा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांची अंमलबजावणी, रुग्णालयीन व्यवस्थेतील समन्वय आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
संकटाच्या काळात केवळ रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणे पुरेसे नसते, तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्याची आणि कार्यक्षमतेची काळजी घेणेही आवश्यक असते. ही जाणीव ठेवून डॉ. महेश यांनी आपल्या सहकाऱ्यांना पाठबळ दिले, त्यांना प्रोत्साहित केले आणि सामूहिक जबाबदारीची भावना दृढ केली.
संकटकाळात माणसाचे खरे व्यक्तिमत्त्व उजळून निघते, असे म्हणतात. कोविडच्या काळात डॉ. महेश यांनी जपलेला सेवाभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीचा तेजस्वी आविष्कार ठरला.
स्पंदन हेल्थकेअर : विश्वासाचे आरोग्यधाम
शासकीय सेवेतून मिळालेले अनुभव, ग्रामीण जनतेच्या वेदनांचे केलेले निरीक्षण, वैद्यकीय कौशल्याचा वाढता आवाका आणि रुग्णांच्या मनातील विश्वास यांचा समन्वय साधत डॉ. महेश यांनी स्पंदन हेल्थ केअरच्या माध्यमातून आरोग्यसेवेचे स्वतंत्र विश्व उभे केले.
कवठे येथे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी वाईच्या रुग्णसेवेची समृद्ध परंपरा लाभलेल्या मिशन हॉस्पिटलमध्येही वैद्यकीय सेवा दिली. सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचा अनुभव आणि विविध संस्थांमधील कार्याचा परिचय यामुळे रुग्णसेवेविषयीची त्यांची दृष्टी अधिक व्यापक होत गेली.
स्पंदन हेल्थकेअरची स्थापना करताना त्यांच्या पाठीशी माता, पिता, पत्नी सौ. पल्लवी, मामा सूर्यकांत वालेकर आणि मेहुणे श्रीकांत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोणत्याही महत्त्वाकांक्षी कार्याच्या पायाभरणीत कुटुंबीयांच्या विश्वासाचा आणि सहकार्याचा मोठा वाटा असतो. स्पंदन हेल्थकेअरच्या प्रवासातही हे कौटुंबिक पाठबळ प्रेरणाशक्ती ठरले.
रुग्णाला केंद्रस्थानी ठेवून उत्तम, जबाबदार आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्यसुविधा निर्माण करणे, पायाभूत सुविधा सक्षम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, कुशल वैद्यकीय पथक उभे करणे आणि रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, या तत्त्वांवर स्पंदन हेल्थकेअरची वाटचाल सुरू झाली.
आरोग्यसेवेतील प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो. रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तीला केवळ औषधोपचारांची गरज नसते; तर तिला समजून घेणाऱ्या संवादाची, विश्वास देणाऱ्या शब्दांची आणि आपुलकीने वागणाऱ्या हातांचीही आवश्यकता असते. म्हणूनच स्पंदन हेल्थ केअरमध्ये रुग्ण आणि रुग्णालय यांच्यातील नाते केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता विश्वासाच्या बंधनात गुंफले जावे, हा प्रयत्न राहिला आहे.
वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा आणि कोरेगाव परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आरोग्यसेवेचे उपयुक्त केंद्र ठरले आहे. रुग्णांच्या गरजांप्रती संवेदनशीलता, वेळेवर प्रतिसाद देण्याची तत्परता आणि उपचारांमध्ये आत्मीयतेचा स्पर्श ही त्याच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत.
स्पंदन हेल्थकेअर हे नाव केवळ हृदयाच्या स्पंदनांची आठवण करून देत नाही; तर जीवनाविषयीच्या आशेचे, विश्वासाचे आणि संवेदनशील सेवेचेही प्रतीक बनते.
चिकित्सक ज्ञानाला मानवतेची जोड
वैद्यकीय ज्ञान हे सतत विकसित होणारे शास्त्र आहे. नवनवीन संशोधन, बदलती उपचारपद्धती, आधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्यविषयक अद्ययावत माहिती यांचा चिकित्सकाने सातत्याने अभ्यास करणे आवश्यक असते. डॉ. महेश या जाणिवेतून आपल्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारण्याचा प्रयत्न करतात.
स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळूनही शासकीय आरोग्यसेवेतील विविध उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि समाजोपयोगी कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केल्यामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे महत्त्व, तिच्या मर्यादा आणि तिच्यातील सुधारणांच्या संधी यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे.
आरोग्यविषयक जनजागृती, समाजाचे आरोग्यशिक्षण, रुग्णकल्याण, उपचारांतील सुरक्षितता, वैद्यकीय नैतिकता आणि नियमांचे पालन या सर्व बाबींना ते महत्त्व देतात. नवीन उपचारपद्धतींची माहिती जाणून घेणे, आवश्यक त्या तपासण्यांच्या आधारे योग्य चिकित्सक निर्णय घेणे आणि रुग्णाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही त्यांची व्यावसायिक बांधिलकी आहे. त्यांच्या दृष्टीने डॉक्टरचे सामर्थ्य केवळ पदवीत नसते, तर ज्ञानाचा विनियोग कसा केला जातो यात असते; प्रतिष्ठा केवळ नावात नसते, तर रुग्णाच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासात असते आणि यश केवळ आर्थिक समृद्धीत नसते, तर समाजाच्या वेदना कमी करण्यासाठी केलेल्या योगदानात असते.
त्यांच्या कार्यशैलीतील एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे रुग्णाशी संवाद साधण्याची आत्मीय पद्धत. उपचारांसाठी आलेल्या रुग्णाला ते आपुलकीने सांगतात, ‘‘तू टेन्शन मत ले, सब कुछ ठीक हो जायेगा!’’
या शब्दांतून रुग्णाच्या मनाला धीर मिळतो, भयाचे सावट हलके होते आणि उपचारांविषयी सकारात्मकता निर्माण होते. अर्थात, प्रत्येक आजाराचा परिणाम वेगवेगळा असतो. मात्र, उपचारप्रक्रियेत विश्वास, संवाद आणि मानसिक आधार यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. डॉ. महेश यांच्या व्यक्तिमत्त्वात या गोष्टींचा सुंदर संगम दिसतो. रुग्णाला आवश्यक असेल तेव्हा घरी जाऊन उपचार करण्याची तत्परता, वृद्धांच्या अडचणींची जाण आणि त्यांच्या नातेवाइकांशी जिव्हाळ्याने संवाद साधण्याची वृत्ती यामुळे अनेक कुटुंबांशी त्यांचे भावनिक नाते निर्माण झाले आहे. रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा संस्थेच्या कार्यक्षमतेचा महत्त्वाचा घटक आहे, या विश्वासातून ते सहकाऱ्यांनाही आपुलकीने जोडून घेतात. त्यांच्यासाठी रुग्णसेवा ही केवळ व्यवसायाची व्याख्या नाही, ती माणुसकीचे ऋण फेडण्याची एक संधी आहे.
मातृभूमीशी नाळ जपणारे शिवभक्त
माणूस कितीही मोठा झाला, कितीही उंचीवर पोहोचला, तरी त्याच्या अस्तित्वाच्या मुळाशी त्याची जन्मभूमी आणि त्याचे संस्कार असतात. डॉ. महेश यांच्या मनातही जन्मगाव बावधनविषयी नितांत आत्मीयता आहे. गावाशी असलेले नाते, माता-पित्यांच्या आकांक्षांविषयीची कृतज्ञता आणि धार्मिक श्रद्धेचा वारसा यांचा संगम त्यांच्या सामाजिक कार्यात दिसून येतो. ‘देवा, मला थोडीशी माती दे आणि त्या मातीसाठी झटणारी नाती दे,’ या भावनेशी सुसंगत अशी त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे. बंधूंच्या सहकार्याने जन्मगाव बावधन येथील श्री रेवणसिद्ध महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांनी माता-पित्यांचे स्वप्न साकार केले. या कार्यातून त्यांना धार्मिक श्रद्धा, कौटुंबिक समन्वय आणि सामाजिक बांधिलकी यांचा आनंद अनुभवता आला. त्यांच्या जीवनात अध्यात्म म्हणजे केवळ पूजाअर्चा नसून आचरणातील शुद्धता, विचारांतील सात्त्विकता आणि कृतीतील परोपकार आहे. म्हणूनच शिवभक्ती आणि मानवसेवा यांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सुंदर समन्वय साधलेला दिसतो.
सामाजिक बांधिलकीचा ज्ञानदीप
समाजाच्या प्रगतीसाठी आरोग्य जितके आवश्यक आहे, तितकेच शिक्षण, संस्कार, विचारप्रबोधन आणि सांस्कृतिक जाणीवही महत्त्वाची आहे. डॉ. महेश यांनी या व्यापक सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रमांना हातभार लावला आहे.
वडिलांच्या नावाने स्थापन केलेल्या दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या माता-पित्यांचाही सन्मान राशी व पालक-पाल्य पुरस्कार देऊन ते गौरव करतात. सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात समयदान, योगदान देतात.
विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धांचेही नियमित आयोजन करतात. वेळोवेळी रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदानाने जीव जोडतात. अशा शिबिरांमुळे गंभीर रुग्णाला आवश्यक तेव्हा रक्त उपलब्ध होते. कोणाचे तरी प्राण वाचल्याचे कुणाचा तरी संसार सावरल्याचे आपल्यालाही समाधान मिळते, ही डॉक्टरांची शिबिर आयोजनामागची प्रांजळ भूमिका. मोफत आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून, स्वतःच्या सहभागातून, आपले चिकित्सा कौशल्य, बहुमूल्य वेळ आणि अर्थबळ समाजोपयोगी सेवा कार्यासाठी वापरतात. मोफत आरोग्य शिबिरांमधून चिकित्सा करतात, सल्ला देतात व उपचार उपचार करतात.
सर्वांना परवडणाऱ्या दारात आवश्यक त्या उपचार सुविधा मिळाल्या पाहिजेत, हे ध्येय असणाऱ्या डॉ. महेश यांनी जम बसल्यानंतर गरीब रुग्णांवर संवेदनशीलतेने उपचार केले आहेत. आधीच उत्तम असलेली रुग्णसेवा आणखी उत्तम करण्याचे डॉक्टरांचे लक्ष्य आहे. संकटात रुग्णांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे, एका छताखाली चांगल्या दर्जाच्या अनेक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. वेगवेगळ्या आजारावरील प्रगत उपचारांच्या सुविधा स्पंदन हेल्थकेअरमध्ये उपलब्ध व्हाव्यात आणि वेगवेगळ्या स्पेशालिटी तज्ज्ञांना एक व्यासपीठ निर्माण करणे आणि जबाबदार आरोग्य व्यवस्था उभारणे, वंचित वर्गातील रुग्णांसाठी समर्पित हॉस्पिटल अशी ओळख निर्माण करण्याचा, पायाभूत सुविधा सुधारण्याचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानावर भर देण्याचा डॉ. मेणबुदले यांचा मानस आहे, तसेच एक कुटुंब अशी संस्कृती जपणारी रुग्णसेवा संस्था अशी हॉस्पिटलची ओळख निर्माण करण्याचाही निश्चय आहे.
कोणत्याही हॉस्पिटलची संस्कृती ही त्यांच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे. येथे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्यात वरिष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव नसतो. म्हणूनच हॉस्पिटलच्या यशात डॉक्टरांची भूमिका ३० टक्के, तर उर्वरित स्टाफची भूमिका ७० टक्के असते, यावर स्पंदन हेल्थकेअरचा विश्वास आहे.
गेल्या अवघ्या काही वर्षांतील हॉस्पिटलची कामगिरी पाहता आरोग्य सेवा क्षेत्रात अशी ख्याती मिळवणे, हे आजच्या काळात अतिशय आव्हानात्मक आहे. तालुक्यातील, उत्तर- पश्चिम सातारा जिल्ह्यातील आरोग्यसेवेला एक प्रगत आणि बहुआयामी चेहरा देण्यात स्पंदन हेल्थकेअरचा वाटा मोठा आहे. आज हे हॉस्पिटल वाई तालुक्याच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील महत्त्वाचे आणि आघाडीचे केंद्र बनले आहे.
PNE26W58193
सौ. पल्लवी व डॉ. महेश मेणबुदले
PNE26W58194
डॉ. मेणबुदले यांचे हॉस्पिटल
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.