बहुआयामी शास्त्रज्ञ
.........................
डॉ. मायदे यांनी शेती क्षेत्रातील शास्त्रीय दृष्टिकोन आणि तांत्रिक विचार कधी सोडला नाही. त्यामुळेच शेती समस्यांची व्यवहार्य आणि वास्तववादी उत्तरे त्यांना मिळत होती.
.........................
प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. व्यंकटराव मायंदे यांच्या निधनाची बातमी शेतकरी, शास्त्रज्ञ आणि त्यांना जे जे जाणतात अशा सर्वांसाठी धक्कादायक तसेच मनाला चटका लावणारी आहे. विविध संस्थांमध्ये कार्यरत असताना शेतीतील अनेक समस्यांवर त्यांनी व्यवहार्य, वास्तववादी उत्तरे शोधली. त्यामुळेच शेती क्षेत्रातील चालू घडामोडींवर तत्काळ भाष्य हवे असल्यास प्रथम डोळ्यासमोर डॉ. मायंदे यांचेच नाव येत होते. ते कृषी अभियंते होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होण्याआधी त्यांनी इक्रीसॅट आणि क्रीडा अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्थातून आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला होता. इक्रिसॅटमध्ये कृषी अवजारांवरील त्यांचे काम उल्लेखनीय असून, देशभरातील शेतकऱ्यांना ते आता उपयुक्त ठरत आहे. तिथे त्यांचा भर कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त यंत्रे अवजारे विकसित करण्यावर होता. त्यात प्रामुख्याने बीबीएफ - रीजर, बीबीएफ प्लांटर याशिवाय पीक लागवडीसाठीची काही छोटी यंत्रे अवजारेही त्यांनी विकसित केली. यासाठी त्यांना त्यावेळी दहा पेटंट देखील मिळाले होते. त्यानंतर ‘क्रीडा’मध्ये ते प्रिन्सिपल सायंटिस्ट आणि पुढे ते झोनल कोऑर्डीनेटर झाले. या वेळी त्यांच्याकडे तेंव्हांचे संयुक्त आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील कृषी विज्ञान केंद्रांच्या एकंदरीतच कामकाजाच्या आढाव्याचे काम होते. या कामातही वस्तुनिष्ठ आढावा आणि अहवालातून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. या वेळी त्यांनी केव्हीकेच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना अनुरोध अनेक सुधारणा सुचविल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीवर भर दिला.
पुढे ते अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू झाले. कुलगुरू पदावर असताना त्यांच्यातील एक उत्तम प्रशासक सर्वांनी अनुभवला. विशेष म्हणजे कृषी विद्यापीठांचे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार असे प्रामुख्याने तीन पातळ्यांवर काम चालते. या तिन्ही पातळ्यांमध्ये त्यांनी सुधारणा केल्या. कृषी विद्यापीठामध्ये संशोधनासाठी विविध प्रकल्प त्यांनी आणले आणि उत्तम राबविले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये सध्या पन्नास टक्केहून कमी मनुष्यबळ आहे. अनेक पदे रिक्त आहेत तर काही पदांवर अतिरिक्त भार सोपविलेला आहे. त्यामुळे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार असे कुठलेच काम नीट होताना दिसत नाही. त्यांच्या कार्यकाळात मात्र त्यांनी अनेक अडथळे पार करून विद्यापीठांमध्ये नियमित पद भरती केली आणि सर्वच कारभार सुरळीत चालेल ही दक्षता देखील घेतली.
कृषी विद्यापीठामधून सेवानिवृतीनंतरही ते अनेक संस्थांमध्ये विविध समित्यांमध्ये कार्यरत होते. कृषी विद्यापीठामधून निवृतीनंतर २०१० मध्ये ते ‘अफार्म’ या कृषी तसेच सेवाभावी संस्थांशी संबंधित कार्य करणाऱ्या संस्थेचे मानद सदस्य झाले. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांची अफार्मच्या कार्यकारणी मंडळात सदस्य म्हणून निवड झाली. आणि २०२३ पासून ते अफार्मचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मागील दीड दशकांपासून अफार्मच्या माध्यमातून या संस्थेशी जोडलेल्या १००हून अधिक संस्थांना डॉ. मायंदे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत होते. डॉ. मायंदे यांचा शेतीमधील शास्त्रीय दृष्टिकोन आणि तांत्रिक विचार अफार्मच्या कामांत प्रतिबिंबीत व्हावा असा त्यांचा आग्रह असायचा. डॉ. मायदे यांचे काम राज्य, देशापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी इस्त्राईल, अमेरिका, चीन येथील शेतीचा देखील विविध प्रकल्पांच्या माध्यमातून अभ्यास केला होता. ओमान या देशाच्या कृषी व मत्स्यसंपदा मंत्रालयाचे सल्लागार म्हणून देखील काम केले होते. या दोन्ही क्षेत्रासाठीचे धोरण विकसित करण्यात देखील त्यांनी मोलाचे योगदाग दिले. अशा बहुआयामी कृषी शास्त्रज्ञाच्या अचानक निधनाने देशातील शेती, शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
.......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.