चाऱ्यासाठी पाच कोटींची तरतूद
पालकमंत्री देसाई; शहरी भागात होणार पाणी कपात
कऱ्हाड, ता. २४ ः जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद होऊ लागली आहे. पाण्याचे आटत निघाललेले साठे आणि चाऱ्याचा निर्माण झालेला भीषण प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील जनावरे जगवण्यासाठी व त्यांना वेळेवर मुबलक चारा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने पाच कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
जिल्ह्यातील धरणांमध्ये ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी राखीव ठेवणार आहोत. त्यासाठी पाण्याचे सूक्ष्म नियोजन करत आहोत. यंदा जिल्ह्यातील शहरी भागातही पाणी कपात होण्याची शक्यता आहे. त्याचेही स्वतंत्र नियोजन करत आहोत.
मंत्री देसाई यांनी काल रात्री माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘‘आचारसंहितेमुळे दुष्काळाच्या बैठका घेण्यात अडसर येत आहे. पिण्याचे व शेतीचे पाणी आणि जनावरांचा चारा या गोष्टींना शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने विहिरी, कूपनलिका व नद्यांतील पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. सातारा, कऱ्हाडसह जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांच्या क्षेत्रातही यंदा दहा टक्के पाणी कपात करावी लागेल. साताऱ्यात कृष्णा, तर कऱ्हाडला कोयना नदीचे पाणी देतो. त्या दोन्ही नद्यांचे बाष्पीभवन लक्षात घेता. विविध भागांत नदीपात्रातच पाणी कमी होत आहे. त्यामुळे शहरी भागात पाणीपुरवठा सुरळीत करणे आव्हान ठरत आहे. त्यावर उपाय म्हणून पाणी कपात करून उपलब्ध साठ्याचे नियोजन केले जात आहे. दुष्काळाची पाहणी, उपायांसाठी बैठका आवश्यक असतानाही आचारसंहितेमुळे अडसर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाकडे विशेष परवानगी मागितली आहे. ती मिळताच तातडीने बैठक घेऊन आढावा घेतली जाईल. पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि जनावरांचा चाऱ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.
.........
कोट
.........
जिल्ह्यात जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पाच कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. जिल्ह्यातील उपलब्ध साठ्यांतून हमीभावाने चारा खरेदी करून तो टंचाईग्रस्त भागात वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले जातील.
- शंभूराज देसाई,
पालकमंत्री, सातारा
..............