तलाव प्रकल्पाच्या गाळपेरा
जमिनीवर चारा लागवड
-----
दुष्काळात चारा उत्पादन वाढीसाठी जिल्हाधिकारी पुजार यांची संकल्पना
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी तलाव व प्रकल्प परिसरातील सरकारकडून संपादित जमिनीचा अर्थात गाळपेरा जमिनीचा वापर केला जाणार आहे. चारा उत्पादन वाढीसाठी या जमिनीचा वापर करण्यात येणार असून चाऱ्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रीतसर परवानगी जलसंपदा विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासोबत चारा पिकांचे बियाणेही पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची ही संकल्पना असून यात शेतकरी स्वतःच्या पशुधनासाठी आवश्यक चारा राखीव ठेऊन उर्वरित चारा दुसऱ्या शेतकऱ्यांना उपलब्ध करू शकणार आहेत.
दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पावसाअभावी शेतातील पिके बाधित झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा प्रभावी वापर करून चारा उत्पादन वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी पुजार यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुजार यांनी गुरुवारी (ता. २२) कळंब तालुक्यातील खडकी गावाजवळील मांजरा सिंचन प्रकल्पाच्या जलाशयालगतच्या गाळपेरा जमिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून गाळपेरा जमिनीवर चारा लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. कळंब उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व कळंब तहसीलदार हेमंत ढोकले यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. गाळपेरा जमिनीवर चारा पिकांची लागवड केल्यास उपलब्ध जमिनीचा उत्पादक वापर होण्याबरोबरच पशुधनासाठी आवश्यक चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होईल, असे पुजार यांनी सांगितले. गाळपेरा जमिनीवर चारा उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक चारा पिकांचे बियाणे पशुसंवर्धन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे .तसेच चारा पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक पाण्याच्या वापरास जलसंपदा विभागामार्फत परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पुजार यांनी केले आहे.
फोटो ओळी agnltr_२३october२०२६_१.jpg
धाराशिव : खडकी (ता. कळंब) शिवारातील मांजरा प्रकल्पाच्या गाळपेरा जमिनीची पाहणी करताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार. याप्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे व कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.