दुष्काळाचा चटका आता स्वयंपाकघरात
गहू, ज्वारी, बाजरी, डाळींचे दर कडाडले ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
अकोले, ता. ३० : आधी शेतात पिकले नाही आणि आता बाजारात धान्यही स्वस्त मिळत नाही, अशी अवस्था अकोले तालुक्यातील सर्वसामान्यांची झाली आहे. दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटले असतानाच गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि डाळींच्या दरांत वाढ झाली आहे. अकोले, राजूर आणि कोतूळ परिसरातील बाजारपेठांमध्ये धान्य महागल्याने दिवाळीच्या तोंडावर गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील उत्पादनावर परिणाम झाला. स्थानिक बाजारात धान्याची आवक कमी झाल्याने बाहेरील राज्यातून धान्य मागवावे लागत आहे. त्यात वाहतूक खर्च आणि बाजारातील वाढती मागणी यांची भर पडल्याने किरकोळ दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्थानिक बाजारात गव्हाचे दर पूर्वी ३६ ते ३७ रुपये किलो होते. आता ते ४२ ते ४४ रुपयांवर पोहोचले आहेत. देशी ज्वारी ६७ ते ९५ रुपये, बार्शी ज्वारी ६७ ते ७० रुपये, तर बाजरी ३५ ते ३७ रुपये किलोने विकली जात आहे. कोलम तांदळाचे दर ७५ ते ८० रुपयांवर गेले आहेत.
डाळींच्या दरवाढीनेही ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. तूरडाळ १३२ रुपये, तर चणाडाळ ९० ते ९४ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मक्याचे दरही ३५ ते ३७ रुपये किलो झाले आहेत.
-----------
फराळाचा खर्चही वाढला
दिवाळीत फराळ, गोडधोड आणि पाहुणचारासाठी गृहिणींना अतिरिक्त खर्च करावा लागतो. मात्र, धान्य आणि डाळींच्या दरवाढीमुळे घरखर्चाचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे.
कोतूळ येथील गृहिणी सुषमा समुद्र म्हणाल्या, "दिवाळीसाठी मुलांचा फराळ, गोडधोड आणि पाहुणचार करायचा आहे. मात्र, तूरडाळ १३२ रुपये किलो झाली असून इतर किराणा साहित्याचे दरही वाढले आहेत. घरखर्च भागवायचा की सणासाठी पैसे ठेवायचे, असा प्रश्न पडला आहे."
----------
पुढील आठ महिने दर चढे राहण्याची शक्यता
स्थानिक बाजारात ज्वारी-बाजरीची आवक कमी झाल्याने काही व्यापाऱ्यांना कर्नाटकातून ज्वारी मागवावी लागत आहे. पुढील पीक बाजारात येईपर्यंत दर चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न नाही, तर दुसरीकडे त्यांनाच महाग धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळाचा चटका आता शेतापुरता मर्यादित न राहता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी आनंदापेक्षा आर्थिक कसोटी ठरत आहे.
------
चौकट :
धान्याचे दर (प्रति किलो)
धान्य आधीचे दर सध्याचे दर
गहू ३६-३७ ४२-४४
देशी ज्वारी ४५-७० ६७–९५
बाजरी ३०-३२ ३५–३७
कोलम तांदूळ ५५-६० ७५-८०
तूरडाळ ११६ १३२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.