GHR26A09686
संगमनेर ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना मका बियाण्याचे वाटप करताना पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी.
--------------
दुष्काळात चाऱ्यासाठी प्रशासनाचे नियोजन
साडेचार हजार शेतकऱ्यांना २२ टन मका बियाणे वाटप
संगमनेर, ता. ९ ः संगमनेर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन संगमनेर तालुक्यात असल्याने आगामी काळात जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी तालुका पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागामार्फत तालुक्यातील जवळपास साडेचार हजार शेतकऱ्यांना २२ टन मका बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रदीप खंडेराव यांनी दिली.
यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. या दुष्काळी परिस्थितीचा परिणाम शेतीबरोबरच पशुधनावरही होत आहे. तालुक्यात लहान-मोठ्या पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना केल्या जात आहेत.
तहसीलदार धीरज मांजरे यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागप्रमुखांची एकत्रित मोट बांधून टंचाई आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. दुष्काळाच्या काळात संकटावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जात आहे.
दरम्यान, पशुसंवर्धन विभागानेही पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. शेतकऱ्यांना मका बियाणे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना स्वतःच्या शेतात हिरवा चारा पिकविता येणार आहे. यामुळे आगामी काळातील चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.
-------
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन संगमनेर तालुक्यात आहे. त्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाला चारा उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी आहे. आगामी काळात चारा टंचाई निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने तालुक्यातील जवळपास साडेचार हजार शेतकऱ्यांना २२ टन मका बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. पशुधनाचे संगोपन व्यवस्थित व्हावे आणि कोणत्याही परिस्थितीत जनावरांचे नुकसान होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने लक्ष ठेवून आहे.
- प्रदीप खंडेराव, सहाय्यक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.