गुरुवार पेस्टिंग
पाणी नव्हे जीवन!, सतीश खाडे, दुष्काळी स्थितीत पौष्टिक चारा मिळविण्याची तंत्रे, लेख ५४
-------------------------------
दुष्काळी स्थितीत पौष्टिक चारा मिळविण्याची तंत्रे
दुष्काळामध्ये पाणी व चाऱ्याचे दुर्भिक्ष स्थितीमुळे पशुधन वाचवणे हे सर्वात मोठे आव्हान ठरते. अत्यंत दुष्काळी स्थितीमध्ये चारा छावण्यांचा पर्याय वापरला जातो. पूर्वी पंचक्रोशीतील एका गावामध्ये एकत्रित शेकडो जनावरांना सांभाळले जाते. मात्र यात मोठ्या प्रमाणात चारा व पाण्याचे नियोजन करावे लागत असल्याने सरकारवरील अवलंबित्व वाढते. त्यावरही पर्याय म्हणून गावातच तीन ते चार ठिकाणी विभागवार छावण्या केल्यास नियोजन अधिक सुकर व तुलनेने कमी खर्चात होऊ शकते. अशा छोट्या छावण्यांसाठी किमान पाण्यामध्ये जागेवरच चाऱ्याची निर्मिती करता आल्यास वाहतुकीच्या खर्चातही बचत साधता येईल. किमान पाण्यामध्ये चाऱ्याची निर्मिती करण्यासाठी गावांच्या गायराने, सामायिक जमिनी उपयोगात आणता येतील. जिथे त्या उपलब्ध नाहीत, तिथे एखाद्या शेतकऱ्याचे शेत भाडेतत्त्वावर घेऊनही अझोला आणि हायड्रोपिनिक्स तंत्राने हिरवा चारा उपलब्ध करता येईल. यासाठी पशुपालक, दूध संस्था, खासगी कंपन्याचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधी, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत, स्थानिक बँका, पतपेढ्या, मंदिर देवस्थाने ट्रस्ट हेही मदत करू शकतील. हा लेख लिहिताना पशुआहारविषयक तज्ज्ञ रूपेश चंदनशिव (संपर्क ः ९३७३२ २८८४४) यांची मोलाची मदत झाली आहे.
मोठ्या जनावरांना गाय, म्हैस यांनी सामान्यतः तीन प्रकारचा आहार आवश्यक असतो.
१. वाळलेला चारा (Dry Fodder) - उदा. गहू, भात, ज्वारीचा कडबा, मक्याचे सरमाड इ. हा रुमेनचे आरोग्य, पचन आणि रवंथासाठी अत्यावश्यक असून, एकूण आहाराच्या ४०-५० टक्के प्रमाणात देणे गरजेचे असते. प्रत्यक्ष वजनानुसार ५-७ किलो प्रति दिन या प्रमाणात चर्वण आणि रवंथ प्रक्रियेसाठी दिला पाहिजे. अन्यथा, गाय आजारी पडते, तिला अपचन होते.
२. हिरवा चारा (Green Fodder) - उदा. हिरव्या स्वरूपात मका, लसूण घास, नेपियर, ज्वारी इ. हिरवा चारा एकूण शुष्क आहाराच्या (DM) ३०-३५ टक्के (प्रत्यक्ष वजनाने १५-२० किलो, कारण यात पाण्याचे प्रमाण ८०-८५ टक्के असते) देणे शरीरासाठी आवश्यक असते. हायड्रोपोनिक्स चारा या गटात येतो.
३. खुराक / सांद्रा (Concentrate) उदा. सरकी पेंड, मका भरडा, सोयाबीन पेंड, मिनरल मिक्श्चर इ. - एकूण आहाराच्या २०-३० टक्के आवश्यक. दुधासाठी ऊर्जा आणि प्रथिने जनावरांना मिळण्यासाठी दिवसाला दुधाच्या १/३ - म्हणजे १० लिटर दूध असेल तर ३.५-४ किलो खुराक देणे आवश्यक.
या आहारामध्ये अझोला आणि हायड्रोपोनिक कुठे बसते?
१) अझोला : खुराकामधील महागडी सोयाबीन पेंड किंवा सरकी पेंडच्या जागी
- दिवसाला १.५ ते २ किलो ताजा अझोला दिल्यास ३०० ग्रॅम पेंड वाचते.
- जास्त दिले (३ किलोपेक्षा जास्त) तर पातळ शेण बाहेर पडून, त्याद्वारे अधिकचे प्रथिन वाया जाते.
२) हायड्रोपोनिक : हिरव्या चाऱ्याच्या जागी
- दिवसाला ५-८ किलो
--------------
१० लिटर दुधाच्या गाईसाठी आदर्श दिवसभराचा आहार
- वाळलेला कडबा : ६ किलो
- हिरवा चारा / हायड्रोपोनिक : १५ किलो
- खुराक (कन्सन्ट्रेट) : ३ किलो (त्यात मिनरल मिक्श्चर ५० ग्रॅम अधिक मीठ ३० ग्रॅम)
- अझोला : १.५ किलो (धुऊन)
- स्वच्छ पाणी : ७०-८० लिटर
हा समतोल ठेवला तर तुमचा खुराकाचा खर्च ३०-४० टक्के कमी होतो, दूध १ ते १.५ लिटर वाढते, आणि तुमच्या डीपीआर नुसार फायदा होतो.
काय अजिबात देऊ नये?
- फक्त अझोला किंवा फक्त हायड्रोपोनिक वर जनावरे ठेवू नयेत. कारण तसे केल्यास तंतुमय घटक (फायबर) व कॅल्शिअम कमी पडू शकते. अशा जनावरांना अपचन, ॲसिडोसिस व खुरांचे आजार होऊन जनावरे लंगडू शकतात.
- अझोला कधीही न धुता देऊ नका. ज्या पाण्यात ते वाढते, त्यात मिसळलेल्या शेणाच्या वासाने गाय खात नाही.
- अझोलाचे प्रमाण ५०० ग्रॅमपासून वाढवत हळूहळू ३-४ किलोपर्यंत न्यावे. एकदम ३-४ किलो अझोला देऊ नका.
अझोलाचे घाऊक उत्पादन
चारा छावणीसाठी अझोलाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणे गरजेचे असेल. त्यसाठी एक एकर जागेत १८० चौ. फूट व एक फूट खोलीचे १४७ खड्डे होतात. त्याच्या बाजूने येण्या जाण्यासाठी रस्ते सोडावेत. या सर्व खड्ड्यात प्लॅस्टिक कागद अंथरावा. सर्व मिळून ३ लाख लिटर पाणी भरावे. त्यात खत म्हणून शेण मिसळून अझोला बीज टाकावेत. त्याची वाढ होऊन पाचव्या दिवसापासून अझोलाचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. खड्ड्यातील पाणी बाष्पीभवनामुळे कमी होते. तेवढी भर दररोज किंवा दिवसाआड करावी. सर्व खड्डे मिळून ६-७ हजार लिटर पाणी लागते. आठवड्यातून दोनदा खत म्हणून शेणही मिसळावे लागते. पाण्यातून अझोला काढल्यावर जनावरांना देण्यापूर्वी अझोला धुवून घेणे आवश्यक आहे. कारण त्याला शेणाचा वास आल्यास जनावरे खात नाही.
एक एकर क्षेत्रावर अझोला जैव-प्रथिन उत्पादन प्रकल्पाचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल
१. दैनंदिन व वार्षिक उत्पादन आकडेवारी
- दुधाळ जनावरांसाठी चारा साहाय्य (१.५ किलो/गाय/दिवस) : ६४७ गाई
- ताजा अझोला कापणी (१४५ खड्डे @ ६.७० किलो) : ०.९७१ मे. टन /दिवस = ३३० मे. टन/वर्ष
- शुष्क पदार्थ (८ टक्के शुष्क पदार्थ) : २६.४० मे. टन/वर्ष
- शुद्ध कच्चे प्रथिन (२४ टक्के ) : ६.३३६ मे. टन = ६,३३६ किलो/वर्ष
- वार्षिक कार्य दिवस : ३४० दिवस
- निव्वळ जल-क्षेत्र : २६,१०० चौ.फू. (१ एकरच्या ६० टक्के)
२. भांडवली खर्च = एकूण रु. ६,६९,३७५
- अ) जमीन तयारी : रु. ५१,२५० (साफसफाई रु.१५,००० + १४५ खड्ड्याचे खोदकाम रु.३६,२५०)
- ब) तळ अस्तरीकरण (सिपोलीन किंवा एचडीपीई अस्तरीकरण) ३८,००० चौ.फू. @ रु.५.५०) : रु.२,६१,०००
- क) हवामान नियंत्रण व शेड नेट रचना (जीआय फ्रेम + ५० टक्के शेड नेट) : रु.१,९७,५००
- ड) सिंचन, पाणीपुरवठा व स्लरी टाक्या (पीव्हीसी पाइपलाइन, १० हजार लि. टाकी, २ एचपी पंप) : रु.१,१२,०००
- इ) अझोला बीज (२,१७५ किलो @ रु.१५) व कापणी उपकरणे : रु.४७,६२५
३. देखभाल व दैनंदिन खर्च = वार्षिक रु. ५,३६,२९६
- अ) पीक पोषण: रु.१,१५,३२० (शेण ५१ मे. टन रु.५१,००० + एसएसपी रु.३१,३२० + लाल माती रु.१८,००० + कडुनिंब फवारणी रु.१५,०००)
- ब) मनुष्यबळ : रु.२,९५,५०० (२ मजूर @ रु.१२ हजार + पर्यवेक्षक २५ टक्के)
- क) ओव्हरहेड : रु. १,२५,४७६ (वीज रु.२७,२०० + आकस्मिक रु.८,०३२ + घसारा रु.४०,१६२ + देखभाल रु.२०,०८१ + जमीन भाडे रु. ३०,०००)
- मासिक : रु.४४,६९१ | त्रैमासिक: रु.१,३४,०७४
४. उत्पादन खर्च व प्रथिन अर्थशास्त्र
- वार्षिक ताजा जैवभार : ३३० MT (३,३०,००० किलो)
- एकूण कार्यशील गुंतवणूक (भांडवली खर्च + तिमाही देखभाल खर्च) : रु.८,०३,४४९
- उत्पादन खर्च : रु.१,६२५/मे. टन = रु.१.६३/किलो
- वार्षिक शुद्ध प्रथिन : ६,३३६ किलो
- प्रति किलो प्रथिन खर्च : रु.८४.६४
- बाजारातील खाद्य बेंचमार्क (२० टक्के शुद्ध कच्चे प्रथिन @ रु.२६/किलो): रु.१३०/किलो शुद्ध कच्चा प्रथिन
- म्हणजेच अझोला ३५ टक्के स्वस्त पडतो.
५. गुंतवणूक परतावा (ROI)
- परिस्थिती १ (खाद्य बदली @ रु.२.५०/किलो) : वार्षिक मूल्य रु.८,२३,६८०, निव्वळ नफा रु.२,८७,३८३, परतावा २.३३ वर्षे
- परिस्थिती २ (थेट विक्री @ रु.३.५०/किलो) : वार्षिक विक्री रु.११,५५,०००, निव्वळ नफा रु.६,१८,७०३, परतावा १.०८ वर्षे (१३ महिने)
६. पाणी, जमीन व सुविधा
- एकूण क्षेत्र : १ एकर (४३,५६० चौ.फू.) - १४५ खड्डे (३०×६×१ फूट)
- प्रारंभिक पाणी : ३,५०,००० लिटर (एकदाच)
- दैनंदिन : ४,५०० - ५,५०० लि. बाष्पीभवन + १,५००-२,००० लि. धुलाई = ६,००० - ७,५०० लि./दिवस
- १ किलो अझोलासाठी फक्त २.१२ लिटर पाणी (शेतातील चाऱ्यापेक्षा ९८ टक्के बचत)
- वीज : ३ एचपी (२.२५ किलो वॉट)
- शेण गरज : १५० किलो/दिवस (२,००० गायींच्या गोशाळेच्या शेणाच्या फक्त १ टक्का)
निष्कर्ष : १ एकरातून ६४७ गाईंना पूरक चारा, कमी खर्चात जास्त प्रथिन, गुंतवणूक १३ महिन्यांत परत. यात बाष्पीभवनाने काही प्रमाणात पाणी जात असले तरी एकदा अझोला पूर्ण खड्डाभर वाढल्यास आपोआप बाष्पीभवनाचा दर कमी होतो. मात्र यातून जनावरांना हिरवा चारा दुष्काळी स्थितीतही उपलब्ध करणे शक्य आहे. विशेषतः दुधातल्या जनावरांपासून दूध योग्य प्रमाणात मिळू शकते.
=======================
हायड्रोपोनिक चारा -
मातीविना फक्त पाण्यावर ७-८ दिवसांत हिरवा चारा तयार करण्याचे हे तंत्र आहे.
हायड्रोपोनिक चारा म्हणजे काय?
मका, गहू, ज्वारी, बाजरीचे बी उथळ अशा ट्रेमध्ये पाण्यावर अंकुरवून ७-८ दिवसात २०-३० सेमी उंच हिरवा चारा तयार करणे. १ किलो बियाण्यापासून ७-८ किलो चारा मिळतो.
प्रकार
१. मका हायड्रोपोनिक : सर्वांत लोकप्रिय, दूध वाढीसाठी उत्तम, रु. ३.५ ते ४/किलो खर्च
२. गहू / ज्वारी : प्रथिन जास्त, पण बुरशीचा धोका जास्त.
अझोला आणि हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीतील फरक
बाब --- अझोला --- हायड्रोपोनिक मका
उत्पादन कालावधी --- रोज कापणी, ३४० दिवस --- प्रति ७-८ दिवसाला एक बॅच
उत्पादन खर्च --- रु.१.६३/किलो --- रु.३.५-५/किलो
शुद्ध कच्चे प्रथिन --- २४ टक्के --- १३-१५ टक्के
पाणी --- २.१२ लिटर/किलो --- २-३ लिटर/किलो
जागा --- १ एकर = ६४७ गाई --- १०x१० फूट युनिट = १०-१२ गाई
भांडवली खर्च --- रु.६.६९ लाख/एकर --- रु.२-३ लाख (५०० किलो/दिवस युनिट)
टिकाऊपणा --- कमी देखभाल, शेणावर चालते. --- रोज बियाणे, वीज व फॉगिंग सिस्टिम यामुळे अधिक देखभाल लागते.
हायड्रोपोनिकचे फायदे
- जलद : ७ दिवसांत चारा तयार
- जागा कमी : शेडमध्येच उत्पादन
- स्वच्छ : माती, तण, कीटकनाशक नाही.
- पचन : ९० टक्के पचनीय, गाई आवडीने खातात.
तोटे / काळजी
- खर्च जास्त : अझोलापेक्षा दुप्पट महाग, रोज बियाणे विकत घ्यावे लागते.
- बुरशी : पावसाळ्यात बुरशी लागून चारा खराब होतो. त्यात २० टक्के नुकसान होऊ शकते.
- वीज लागते : पाणी फवारणी, तापमान नियंत्रणासाठी २४ तास वीज आवश्यक.
- साठवण नाही : ७ व्या दिवशी वापरावाच लागतो. तो साठवता येत नाही.
- गोठा व जागा लहान असलेल्या आणि ५ ते २० जनावरांसाठी चारा हवा आहे, अशा परिस्थितीत हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.
अनेक प्रगत डेअरी फार्म अझोला व हायड्रोपोनिक्स तंत्र दोहोंचा वापर करतात. सामान्यत ७० टक्के अझोला (स्वस्त प्रथिन) + ३० टक्के हायड्रोपोनिक मका (ऊर्जा आणि हिरवेपणा) चाऱ्यामुळे दुधाचे फॅट आणि उत्पादन दोन्ही वाढते.
संपर्क ः सतीश खाडे, ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
---------------
PNE25V42055 दुष्काळी स्थितीमध्ये हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी अझोला निर्मिती करणे फायदेशीर ठरू शकते.
PNE20Q74856 लहान गोठा व कमी जनावरे असलेल्यांसाठी चारा उत्पादनाची हायड्रोपोनिक्स पद्धत उपयोगी ठरू शकते.
-----------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.