पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन करपू लागले
फुलोरा अन् शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला ओलाव्याची गरज
वाळूज, ता. १२ : मोहोळ तालुक्यातील वाळूज परिसरात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परिसरातील अनेक शेतांमध्ये उभे असलेले सोयाबीनचे पीक पाण्याअभावी सुकू लागले असून, काही ठिकाणी पाने पिवळी पडून करपण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात वाळूज परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकाची उगवण चांगली झाली. मात्र, त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने सध्या पिकाला ओलाव्याची नितांत गरज भासत आहे.
विशेषतः फुलोरा अन् शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनला पाण्याची गरज असताना पाऊस लांबल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पाऊस आणखी लांबल्यास पिकाची वाढ खुंटण्याबरोबरच शेंगांची संख्या अन् दाण्यांची भर यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
वाळूज परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसातील खंडाचा थेट परिणाम खरीप पिकांवर होत आहे. यापूर्वी अतिवृष्टीच्या काळातही वाळूज परिसरातील सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची ओढ, अशा बदलत्या हवामानामुळे शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत.
आता पाऊस झाला तर पीक वाचण्याची आशा आहे. मात्र, आणखी काही दिवस पाऊस लांबला तर केलेला खर्चही निघणे कठीण होईल, अशी चिंता परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
कोट :
- सोयाबीन चांगलं आलं होतं म्हणून यंदा उत्पादनाची अपेक्षा होती. पण आता पावसाने पाठ फिरवल्याने शेतातील पीक अक्षरशः करपू लागलं आहे. औषधं, बियाणं, मशागत यासाठी मोठा खर्च केला आहे. आता शेवटच्या टप्प्यात पाऊस मिळाला नाही तर सगळं कष्ट वाया जाण्याची भीती आहे.
- मच्छिंद्र राक्षे, शेतकरी, वाळूज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.