दुःखांचा पाठलाग
--------------------
त्या मुलीचं चित्त स्थिर नव्हतं. ती कुणाला तरी शोधत होती, जणू तिचे प्राण डोळ्यात आले होते. तितक्यात एक सोळा सतरा वर्षांचा श्यामसावळा पोर दाराच्या दिशेने झेपावला. त्याला पाहताच बसमधल्या शोकाकुल स्त्रीने त्याच्या अंगावर स्वतःला झोकून दिले. तिच्या तोंडून ‘आईऽऽऽ’ अशी आर्त किंकाळी बाहेर पडली!
---------------------
समीर गायकवाड
-----------------------
बीड जिल्ह्यातील माजलगावला आलो होतो. काम उरकेपर्यंत उन्हं कलली नि घरी परत निघालो. वाटेत एसटी येरमाळ्याला थांबली. येडाई देवीचे हे गाव हायवे लगत असल्याने आताशा अंगावर छोट्यामोठ्या शहरखुणा वागवू लागलेय. रस्त्यानजीक असणाऱ्या टपरीवजा मोबाईल दुकानांची आणि चहा, भजी विक्री करणाऱ्या लहान सहान टपऱ्यांची रांग क्रॉस करून बस स्टॅण्डमध्ये शिरली तेव्हा प्रचंड गरम होत होतं.
बाहेरच्या रस्त्यावरून बस वळवून आत आणण्यासाठी स्टँडच्या आवारात बऱ्यापैकी विस्तीर्ण मैदान होतं, काही लहान-मोठी दुकाने होती आणि पत्र्याच्या शेडमधले कंट्रोल रूम होतं, ज्याच्यावर येरमाळा बस स्थानकाचा बोर्ड लटकत होता. ओम साई नावाचं कटिंग दुकान, त्याला लागून एक चहा कँटिन, फळाची हातगाडी आणि असलंच बरंच काही आजूबाजूला होतं. प्लॅटफॉर्मवर बस थांबण्याआधीच काकडी विकणारी केस विस्कटलेली मळक्या कपड्यातली तेज तर्रार किशोरवयीन पोर खिडकीत बसलेल्या प्रवाशांकडे पाहत “काकडी घ्या काकडी” म्हणत मागे पळत आली आणि तिच्या मागोमाग उसाचा रस घेऊन एक वयस्क उदास चेहऱ्याचा इसम घाईने बसकडे येताना दिसला. लिमलेटच्या गोळ्या, तिखट शेंगदाणे, गुळाची चिक्की, खारे फुटाणे असलं रसाळ गबाळ ट्रेमध्ये हाती घेऊन एक शाळकरी पोरगा, बस जिथे उभी राहणार होती तिथे आपली मोक्याची जागा हेरून उभा होता. त्या सर्वांना बसमध्ये यायचे होते, त्यांना आपला ‘माल’ विकायचा होता हे उघड होतं. जेमतेम काही मिनिटं बस थांबणार होती.
बाहेरच्या लोकांचा गलका सरण्याआधीच बसमध्ये मागच्या सीटवरची एक हडकुळ्या अंगाची विशी पंचविशीतली अशक्त विवाहिता हुंदके देतच उभी राहिली. हातातली कापडी पिशवी सांभाळत कंडक्टरच्या जवळ दारासमोर तोंड करून उभी राहिली. ती थरथर कापत होती. तिचे डोळे रडून सुजलेले होते. गळ्यातल्या काळ्या मण्याच्या माळेखेरीज तिच्या अंगावर काहीच दागदागिना नव्हता. अंगावरची साडीही अगदी साधी नेसूची होती. पोलकं विटून गेलेलं होतं. हातात बहुधा कचकड्याच्या बांगड्या होत्या. तिची नजर पाखरासारखी भिरभिरत होती. ती कुणाला तरी शोधत होती. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. ती बहुधा एकटीच होती, खेरीज तिच्याशिवाय तिथं उतरणारं कुणीच नव्हतं. खालून वरती चढणारे दोन-तीन प्रवासी असावेत, कारण काही लोक बसच्या मागे धावत आत आले होते. त्या महिलेला तसं अगतिक अवस्थेत रडताना पाहून लगतच्या सीटवरची म्हातारी कावरीबावरी झाली. ‘‘रडू नगं गं माजी माय! काय झालं माज्या हरणीला! काय फायजेल सांग, मी देतो तुला!’’ म्हातारीने बोलत बोलत तिच्या पाठीवरून हात फिरवला तसं त्या मुलीला भरून आलं.
त्यासरशी ती तरुणी त्या म्हातारीच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागली. करकचून ब्रेक दाबत एसटी बस थांबली. बसमध्ये आता साऱ्यांनाच गहिवरून आलं होतं. काहीतरी अप्रिय घडलंय याचा अंदाज आला होता. तितक्यात एका शिकल्यासवरत्या बाईंनी आपल्या जवळची पाण्याची बाटली तिच्या पुढ्यात धरली, “काय झालंय? काही मदत हवीय का?” त्या बाईंचा स्वर कापरा झाला होता.
इतक्यात बसचं दार उघडलं. कंडक्टरनं बाहेरच्या लोकांना दम भरला, “आतली माणसं उतरल्याबिगर कुणी आत चढू नये!” हे सांगतच त्यानं डोळ्यानेच त्या मुलीला इशारा केला, परंतु त्या मुलीचं चित्त स्थिर नव्हतं. ती कुणाला तरी शोधत होती, जणू तिचे प्राण डोळ्यात आले होते. तितक्यात एक सोळा सतरा वर्षांचा श्यामसावळा पोर दाराच्या दिशेने झेपावला. त्याला पाहताच बसमधल्या शोकाकुल स्त्रीने त्याच्या अंगावर स्वतःला झोकून दिले. तिच्या तोंडून ‘आईऽऽऽऽ’ अशी आर्त किंकाळी बाहेर पडली!
ते दोघंही आता धाय मोकलून रडत होते. त्यांना पाहणाऱ्या बायाबापड्या ओळखपाळख नसूनही डोळ्याला पदर लावू लावू रडू लागल्या! सगळेच दिग्मूढ झाले. कंट्रोल रूममध्ये नोंद द्यायला गेलेला बसचा ड्रायव्हरही मागे फिरून दारापाशी आला. तेवढ्यात मध्यम वयाची तीन-चार पुरुष मंडळी तिथं आली. त्यांनी त्या दोघांना बाजूला सारलं. ते सगळेच फाटके दीनवाणे होते. “आईऽऽ आईऽऽ’ करून दोघेही रडत होते, त्यांच्यासाठी आलेली पुरुष मंडळीही रडवेली झाली होती. ते सारेच गळ्यात पडून एकमेकांचे दुःख हलके करत होते.
कंडक्टरसह एक दोघे खाली उतरले नि काय झालेय याचा चाखाचोळा घेऊ लागले. बसमध्ये पिनड्रॉप सायलेन्स होता. काही केल्या त्या दुःखी तरुणीचा भेदरलेला चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. दरम्यान, दोन प्रवासी आत शिरले आणि मागच्या सीटवर जाऊन बसले. त्यांचे लक्ष देखील बाहेरच्या करुण दृश्याकडंच होते. मघाशी आत शिरण्यासाठी घाई करणारे ते तिघे मात्र बाहेरच रेंगाळत होते. उसाच्या रसाचे ग्लास घेऊन आलेला कळकट कपड्यातला इसम आपल्या डोळ्यातलं पाणी लपवत तिथंच खाली उभा होता. लिम्लेटच्या गोळ्या विकणारा शाळकरी पोरगा तर अगदी रडायच्या बेतात आला होता. काकडी विकणारी पोर त्या तरुणीजवळ गेली. दंड घातलेल्या मळकट परकराने डोळे पुसून तिने तिला मिठी मारली. तिचा हात हाती धरून तिचे सांत्वन करून तिच्या मूळ जागेवर परतली. तो कारुण्यावेग मागे सारून ती बसमध्ये शिरलीदेखील.
मात्र मघाशी जे तेज तिच्या चेहऱ्यावर होते ते आता लोपलं होते. उदास चेहऱ्याने ती आत शिरली, सीटच्या लोखंडी साठ्याला हातातल्या चाकूने बडवत पुढच्या सीटपर्यंत आली.
तिला म्हटलं, “सगळ्या काकड्या किती रुपयांच्या आहेत?”
“दीडशे रुपये”, तिचं उत्तर.
तिला काही पैसे दिले मात्र काकडी विकत घेतली नाही कारण प्रवासात काकडी खाल्ली की मला मळमळते. त्या बदल्यात तिला चार गोष्टी विचारल्या. माझा मोबाइल नंबर कागदावर लिहून दिला. बोलता बोलता ती रडवेली झाली. इतक्या वेळ तिने आवरलेले अश्रूंचे दोन थेंब तिच्या गालावरून खाली ओघळले. आणखी काही न बोलता ती झपकन बसच्या दाराकडे गेली नि विजेच्या वेगाने खाली उतरली. बसमधून उतरून रडत उभी असलेली मघाची ती विवाहिता घासलेटवर चालणाऱ्या एका डबड्या मोटारसायकलवर बसून रवाना झाली होती. बाकी माणसंही निघून गेली होती. स्टॅण्डवरची गर्दी पांगली होती, पालं उठावी तशी.
जिज्ञासेपोटी बसमधून उतरलेले बाकी प्रवासी बसमध्ये आपापल्या जागेवर परतले, कंडक्टरच्या पाठोपाठ ड्रायव्हर आला नि खड्रखड खड्ड असा अगम्य आवाज करत बस निघाली. मघाशी त्या विवाहितेच्या पाठीवरून हात फिरवणारी माऊली जपमाळ हाती घेऊन कसले तरी नामस्मरण करत होती. तिचा चेहरा अजूनही उदासच होता. बाकी प्रवासीही मौन होते. त्या पोरीची आई गेली याचे दुःख त्या उसाच्या रसवाल्यालाही झालं होतं, त्याने मालकाच्या शिव्या नक्की खाल्ल्या असतील. लिमलेट गोळ्यावाल्या मुलाला गाडीत शिरण्याची इच्छाही झाली नव्हती. एक प्रकारे तिच्या दुःखात त्याची सहवेदना होती. बसनं वेग पकडला नि मुख्य रस्त्याला आली.
काकडीवाल्या पोरीची नजर माझा पाठलाग करत होती. त्या सासुरवाशिणीला ती ओळखत होती. ती तिच्याच गल्लीत राहते. तिचे लग्न झाल्यानंतर ती एकदाच माहेरी आली होती. तिच्या पाठच्या तीन बहिणी आणि भाऊ मागे टाकून कालच्या रात्रीला तिची आई वारली होती. आई फार महिन्यांपासून आजारी होती. तिला आईला भेटता आलं नव्हतं. लग्नात कबूल केलेला मानपान वडील देऊ शकले नव्हते. डोंगरगाव लाडनांद्रयाच्या दरम्यान एका वाडीवर तिला दिलेलं. तिचं माहेर जसं फाटकं तुटकं होतं तसंच सासरही होतं. तिची दुःखं सांगायला नि ऐकायला एक माणूसदेखील तिच्याजवळ नव्हता. लग्नात दिलेल्या मानपानाशिवाय सासरच्या लोकांच्या आणखी काही मागण्या होत्या, त्याचा तिला जाच होता. मारझोड व्हायची, गुरासारखं काम लावले जायचे. माहेरी बोलण्यास बंदी होती. तिला माहेरी पाठवलं जात नसे, अगदी सणावारीला देखील! आईसाठी तिचा जीव तीळतीळ तुटत होता. आता काही वेळापूर्वी एसटी स्टँडवर तिला न्यायला आलेला तिचाच सख्खा लहान भाऊ होता, नंतर आलेले तिचे चुलते काके होते. गरिबाच्या पाठीशी कुणी उभं राहत नसतं, गावकी असो वा भावकी; सारे पैसेवाल्याच्या पुढे गोंडा घॊळत असतात. त्या मुलीच्या वडिलांच्या बाजूने कुणीच नव्हते नि तिला सासरी जाच सोसण्यावाचून काही गत्यंतर नव्हतं. ती आईची अखेरची भेट घेऊ शकली नाही याचा दोष नेमक्या किती लोकांच्या मस्तकी मारायचा, याचं उत्तर ‘अगणित माणसं'' असंच होतं.
काकडी विकणारी ती कोवळी पोर शाळेत जाऊन आल्यावर घरच्या जबाबदारीसाठी दुपारनंतर रोज स्टॅण्डवर यायची. तिला खूप शिकून मोठं व्हायचंय पण लग्न करायचं नाही. तिच्या नजरेत एक अजब कश्मकश होती, काही सवाल होते. अशांच्या वेदना-यातना पाहिल्यावर लक्षात येतं, की आपली दुःखं काहीच नाहीत, जग अपार असीम दुःखांनी भरलेले आहे, आपले डोळे मिटलेले असल्याने ते आपल्या नजरेस पडत नाही! अन्यथा अशा पाठलाग करणाऱ्या नजरांनी आपण कमालीचे बेचैन झालो असतो!
----------------
- समीर गायकवाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.