विकत घेताना ‘भाव’, फुकट मिळताना ‘धाव’!
झेंडूच्या फुलांची वेदना; शेतकऱ्यांच्या कष्टाची अवहेलना
ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : विजयादशमीच्या सणाला झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. घर, देवघर आणि वाहनांच्या सजावटीसाठी श्रद्धेने खरेदी केली जाणारी हीच फुले उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंगळवारी (ता.२०) मात्र आर्थिक निराशेचे कारण ठरली. दिवसभर फुले विकूनही अपेक्षित पैसे हाती न पडल्याने एका वयोवृद्ध शेतकरी महिलेने विक्री न झालेली फुले रस्त्यावरच सोडून दिली. मात्र, तीच फुले फुकट मिळताच उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे हृदयस्पर्शी चित्र पाहायला मिळाले.
दसऱ्याच्या सणासाठी शेतकरी वर्षभर कष्ट करून झेंडूचे पीक घेतात. फुलांची लागवड, मशागत, पाणी, खते आणि मजुरी यासाठी खर्च करून सणाच्या काळात चांगला दर मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, बाजारात अपेक्षित भाव न मिळाल्याने अनेकदा उत्पादनखर्चही भरून निघत नाही. सणाच्या दिवशी कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी आणि लेकराबाळांच्या तोंडी सुखाचा घास पडावा, या आशेने शेतकरी मिळेल त्या दरात फुले विकण्याचा प्रयत्न करतात.
दसऱ्याच्या दिवशी दिवसभर झेंडूची फुले विकल्यानंतर एका वयोवृद्ध महिलेने उरलेली फुले घेऊन आपला व्यवसाय आवरता घेतला. दिवसभराच्या कष्टानंतरही अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने तिने विक्री न झालेली फुले रस्त्यावरच सोडून दिली आणि निराश मनाने तेथून निघून गेली. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते. मात्र, त्यानंतर रस्त्यावर पडलेली तीच फुले उचलण्यासाठी नागरिकांची घाई सुरू झाली. मोठ्या गाड्यांतून आलेले काही श्रीमंत नागरिकही खाली उतरून फुकटची फुले गोळा करताना दिसले. ज्या फुलांना विक्रीच्या वेळी योग्य भाव मिळाला नाही, त्याच फुलांसाठी ती मोफत उपलब्ध होताच धावपळ सुरू झाली. या विरोधाभासाने समाजातील संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला.
-- घामाची किंमत कधी कळणार ---
एका बाजूला सण-उत्सावांवर मोठ्या प्रमाणात खर्च करणारा वर्ग, तर दुसऱ्या बाजूला दिवसभर कष्ट करूनही दोन पैसे पदरात पडावेत म्हणून धडपडणारा शेतकरी, असे परस्परविरोधी चित्र दिसते. शेतकऱ्यांच्या कष्टातून निर्माण झालेल्या उत्पादनाला खरेदी करताना योग्य किंमत देण्याची मानसिकता समाजात निर्माण होणे गरजेचे आहे. रस्त्यावर पडलेली फुले फुकट उचलण्यापेक्षा ती विकणाऱ्या शेतकऱ्याला योग्य मोबदला देऊन खरेदी केली असती, तर कदाचित त्या वयोवृद्ध महिलेवर उरलेली फुले रस्त्यावर सोडून जाण्याची वेळ आली नसती. दसऱ्याच्या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून झेंडूची पूजा करताना, त्या फुलांमागील शेतकऱ्यांच्या घामाची आणि कष्टांचीही जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
- कोट---
विकत घेताना भाव पाडायचा आणि फुकट मिळताना धाव घ्यायची, हा विरोधाभास बदलल्याशिवाय कष्टकऱ्यांच्या श्रमांना खरा सन्मान मिळणार नाही.
- सोनू दरेगावकर, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड.
---फोटो --- B05507
नांदेड : एका वयोवृद्ध महिलेने विक्री न झालेली फुले रस्त्यावरच सोडून दिली. तीच फुले उचलण्यासाठी नागरिकांची घाई सुरू झाली. मोठ्या गाड्यांतून आलेले काही श्रीमंत नागरिकही खाली उतरून फुकटची फुले गोळा करताना दिसले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.