डीवायएसपींच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच
गर्भलिंगनिदान प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी मागणी; साडेपाच लाख घेताना दोन दलालांना अटक
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. २९ : अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासह ‘पीसीपीएनडीटी’चे कलम न लावण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावाने २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात दोन खासगी दलालांना पाच लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (ता. २८) दुपारी अडीचच्या सुमारास माळशिरस येथील पालखी महामार्गावरील पिलीव रोडच्या पुलाखाली, जानकर प्लॉटजवळ करण्यात आली.
आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) अशी पकडलेल्या खासगी दलालांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे (ब. नं. १६५९, नेमणूक नातेपुते पोलिस ठाणे, सध्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, अकलूज) आणि पोलिस हवालदार राहुल मारुती वाघ (माळशिरस पोलिस ठाणे) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळकुंदे व माने यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदाराने २१ ऑगस्ट रोजी तक्रार दिली होती. त्यांच्या भावाविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी हवालदार अनिल शिंदे याने स्वतःसाठी व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
त्यानंतर शिंदे यांनी खासगी व्यक्ती आबा वळकुंदे याच्या मोबाईलवरून तक्रारदाराशी संपर्क साधला. दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी आणि ‘पीसीपीएनडीटी’चे कलम न लावण्यासाठी तपास अधिकारी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख रुपये, तर काम झाल्यानंतर स्वतःसाठी पाच लाख रुपये, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी निता मिसाळ, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण सतीश वाळके, पोलिस उपअधीक्षक, पुणे यांनी केले. मिथुन म्हात्रे, राजेश बाटे, प्रवीण तावरे, अश्विन कुमकर, दगडू सोनावणे आणि चंद्रकांत कदम या पथकातील अधिकाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.
चौकट
दोन हवालदार फरार
२७ ऑगस्ट रोजी वळकुंदे व माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी व बीएनएसएस कलम ३५ (३) अन्वये नोटीस देण्यासाठी डीवायएसपी संतोष वाळके यांच्यासाठी पाच लाख आणि पोलिस राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजार, अशी एकूण पाच लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी सापळा रचून दोघांना पकडण्यात आले. दोन हवालदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
चौकट
यापूर्वीचा प्रकार
अकलूज परिसरात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी रचलेला सापळा उधळण्याचा प्रयत्न १८ ऑगस्ट रोजी झाला होता. डमी ग्राहक म्हणून गेलेल्या दोन महिला पोलिसांना आरोपींनी मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणला आणि गोंधळाचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. याप्रकरणी हवालदार अलका कदम यांच्या फिर्यादीवरून अकलूज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.