सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.२ ः देशाची राजधानी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात हरित फटाके फोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली आहे. सात आणि आठ नोव्हेंबर रोजी निर्धारित वेळेत म्हणजे सकाळी सहा ते सात आणि रात्री आठ ते दहा या वेळेत लोकांना हरित फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या वेळेशिवाय अन्य वेळी फटाके उडविण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे.
हवेचे प्रदूषण आणि सण यामध्ये संतुलन ठेवण्यासाठी हरित फटाक्यांना परवानगी दिली जात असल्याची टिप्पणी न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिसूचित केलेले शांतता क्षेत्र, रुग्णालये, नर्सिंग होम, प्राथमिक आणि जिल्हा आरोग्य केंद्रे, वृद्धाश्रम अशा संस्थांच्या तीनशे मीटर परिघात फटाके उडवण्यास बंदी राहील. सर्व संवेदनशील स्थळे व शिक्षण संस्थांचा परिसर फटाके मुक्त म्हणून घोषित करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. या भागांत योग्य बॅरिकेड उभारावेत व अधिसूचित केले जावे, त्यादृष्टीने लोकांमध्ये उचित असा प्रचार आणि प्रसार केला जावा, असे न्या. सुंदरेश यांनी सांगितले.
नियम तोडल्यास अनामत जप्त
बेरियमयुक्त फटाके, गैर प्रमाणित फटाके, फटाक्यांच्या लडी व माळा यावर प्रतिबंध राहणार आहे. नियम तोडणारे निर्माते आणि दुकानदारांच्या विरोधात कोठे तक्रार करायची याची माहिती सार्वजनिक करणे गरजेचे आहे. ज्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यांचे परवाने चार ते सहा नोव्हेंबर या काळासाठी अस्थायी स्वरूपात बहाल केले जातील. फटाका व्यावसायिक आणि निर्मात्यांना प्रशासनाकडे अनामत रक्कम जमा करावी लागेल. नियम तोडल्यास ही रक्कम जप्त केली जाईल. पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकांनी दुकाने आणि विक्री केंद्राची तपासणी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
खंडपीठाचे निर्देश
- दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अवैध फटाक्यांचे वितरण रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक कारवाई करावी
- वाहनांची तपासणी केली जावी
- हरित फटाक्यांची विक्री प्रशासनाने निर्धारित केलेली दुकाने व जागेवरच केली जावी
- ई कॉमर्स किंवा अन्य ऑनलाइन माध्यमातून फटाक्यांची विक्री केली जाऊ नये
- हरित फटाक्यांच्या प्रत्येक पाकिटावर वेगळा ‘क्यूआर कोड’ आवश्यक
- हरित फटाके ‘सीएसआयआर’-''निरी’ तसेच ‘पीईएसओ’ संस्थेकडून प्रमाणित असणे गरजेचे
- दुकानदारांना अशा फटाक्यांची विक्री पूर्णपणे सीलबंद डब्यांतून करावी लागेल
- हरित फटाक्यांची ओळख, विक्रीची तारीख आणि वापराचा वेळ याची माहिती असणारे फलक दुकानदारांनी लावावेत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.