लोणावळा, ता. ३ : ‘‘शिक्षणातून राष्ट्रनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नोकरशाहीचे जोखड दूर करून शैक्षणिक संस्थांना अधिक स्वायत्तता देणे आवश्यक आहे. तसेच शहरी विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून शिक्षणातील नवनवीन प्रयोगांना चालना देण्याची गरज आहे,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
लोणावळ्यातील मनःशक्ती केंद्रातर्फे आयोजित तिसऱ्या तीन दिवसीय शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, मनःशक्ती प्रयोग केंद्राचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे आणि विश्वस्त तथा संशोधन प्रमुख गजानन केळकर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘राष्ट्राचे सामर्थ्य मोजताना तेथील संस्था किती सक्षम आणि स्वायत्त आहेत, याला महत्त्व असते. भारतातील विद्यापीठांना मोठी परंपरा असूनही जागतिक क्रमवारीत त्यांची अपेक्षित छाप दिसत नाही. यामागे केवळ अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धती कारणीभूत नसून सामाजिक व सांस्कृतिक घटकांचाही विचार आवश्यक आहे. एआयसारखी नवी आव्हाने समोर असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी.’’
निवृत्त न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या शिक्षणविषयक विचारांची प्रासंगिकता अधोरेखित केली. कुवळेकर यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. मनःशक्ती केंद्राच्या स्मरणिकेसह ‘समर्थ पिढी घडविण्यासाठी’ पुस्तक आणि निवडक १५ शोधनिबंधांचा समावेश असलेल्या ‘शिक्षणशोध निबंध’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिक्षण परिषदेच्या बोधचिन्हाचेही अनावरण झाले. महाराष्ट्र साहित्य परिषद, कार्यवाह प्रसाद मिरासदार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले, तर दीपक आलरकर यांनी आभार मानले.
छायाचित्र: LON26B06086
छायाचित्र: LON26B06085
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.