शैक्षणिक पानासाठी (बुधवार ता. १३ मे साठी)
लोगो ः शिक्षण चिंतन
डॉ. मिलिंद नाईक
जीवनाशी जोडलेले शिक्षण
विनोबा भावे त्यांच्या बालपणातील एक प्रसंग सांगतात. लहानपणी त्यांनी वैदिक संध्या अवघ्या आठ दिवसांत पाठ केली होती. त्यांच्या आईला त्याचे खूप कौतुक वाटत असे. परंतु विनोबांनी शांतपणे आईला सांगितले की, ‘‘मी ती आठ दिवसांत शिकलो खरा; पण त्याहीपेक्षा कमी दिवसांत विसरलो देखील.’’ आजच्या शिक्षणव्यवस्थेचे हे अत्यंत नेमके चित्र आहे. विद्यार्थी परीक्षेपर्यंत माहिती लक्षात ठेवतात आणि परीक्षा संपताच ती विसरून जातात. अनेकदा तर या माहितीचे वजा अभ्यासाचे करायचे काय हे न कळल्यामुळे मुद्दाम ‘अभ्यास विसरण्याचा’ प्रयत्न करतात. याचा अर्थ असा की शिक्षण विद्यार्थ्यांच्या मनात खोलवर रुजत नाही, कारण ते जीवनाशी जोडलेले नसते. परिणामी विद्यार्थ्यांवर परीक्षेचा उगाचच प्रचंड मानसिक ताण निर्माण होतो.
आजची शिक्षणपद्धती जीवनातल्या काळाचे दोन वेगळे तुकडे करते. पहिली पंधरा-वीस वर्षे केवळ शिक्षण घ्यायचे आणि नंतर अचानक शिक्षण बाजूला ठेवून पूर्णपणे वेगळ्याच क्षमतांची अपेक्षा करणाऱ्या जगण्याच्या जबाबदाऱ्या स्वीकारायच्या. ही रचना नैसर्गिक वाढीच्या विरोधात आहे. शिक्षण घेत असताना त्याचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध जोडला गेला नाही तर विद्यार्थ्यांना ‘हे शिकायचे तरी कशासाठी?’ हा प्रश्न पडतो. प्रत्यक्ष जीवनात पुस्तकातील ज्ञान जसाच्या तसे वापरता येत नाही; परिस्थितीनुसार त्याचे रूपांतर करावे लागते. प्रत्यक्ष जीवनात केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून चिकाटी, जबाबदारी, संवादकौशल्य, सहकार्य, नियोजन यांसारख्या गुणांचीही आवश्यकता असते. परंतु पारंपरिक शिक्षणात या गुणांचा विकास होत नाही. त्यामुळे शिक्षण कंटाळवाणे तर होतेच आणि पुढे जीवनात त्याचा उपयोगही कमी होतो.
विनोबांचे मत होते की, शिक्षण हे प्रत्यक्ष जीवन जगताना घडले पाहिजे. त्यासाठी त्यांनी भगवद्गीतेचे उदाहरण दिले आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर सांगितली; आधी वर्ग घेऊन नंतर युद्धात ढकलले नाही. प्रत्यक्ष कर्तव्य करताना अर्जुनास प्रश्न पडले आणि त्यातून ज्ञान निर्माण झाले. खरे शिक्षण हे असेच असते. आधी काम आणि मग काम करता करता शिक्षण!
आजच्या काळात विद्यार्थ्यांना शेतात काम करू द्यावे, यंत्रांवर प्रयोग करू द्यावेत, लोकांबरोबर सेवाकार्य करू द्यावे. त्या प्रक्रियेत जे प्रश्न निर्माण होतील त्यांची उत्तरे म्हणून जीवशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन किंवा इतर विषय शिकवावेत. विद्यार्थी परसबाग तयार करताना जीवशास्त्र शिकतील, मधमाशी पालनातून पर्यावरण आणि उत्पादनशास्त्र समजून घेतील, स्वयंपाक करताना रसायनशास्त्र व पाककला शिकतील. अशा प्रकारे ‘जीवन जगता जगता शिक्षण’ घडेल. आणि यातूनच राष्ट्रीय शिक्षण धोरणात व्यवसाय शिक्षणाचा अंतर्भाव अभ्यासक्रमात केलं गेला.
व्यवसाय शिक्षणात कामाचे तीन महत्त्वाचे प्रकार सांगितले आहेत - जीवनप्रकारांशी संबंधित काम, यंत्रे व साहित्याशी संबंधित काम आणि मानवी सेवांशी संबंधित काम. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण, तांत्रिक कौशल्ये, संवाद, नेतृत्व, सहकार्य, समस्या सोडविणे, सर्जनशीलता आणि जबाबदारी यांसारखी जीवनोपयोगी कौशल्ये विकसित होतील.
व्यवसाय शिक्षण देणारे नियुक्त शिक्षक म्हणूनच ते काम स्वत: करू शकणारे तर हवेतच, शिवाय त्या त्या संदर्भात पारंगतही हवेत! विनोबांनी सांगितलेला एका पदवीधर तरुणाचा प्रसंगही विचार करायला लावणारा आहे. विनोबाजी म्हणतात, ‘तो तरुण शिक्षणाचे काम करू शकत होता, मात्र त्याला कातणे, विणणे, शिवणकाम, सुतारकाम, स्वयंपाक किंवा गोठा सांभाळणे यांपैकी काहीच येत नव्हते. त्याला फक्त मराठी, इंग्रजी आणि भूगोल शिकवता येत होते.’ यावरून शिक्षण आणि जीवन यातील दरी लक्षात येते. म्हणूनच जीवनोपयोगी परिश्रमाला शिक्षणात स्थान मिळणे आवश्यक आहे. शिक्षण आणि जीवन वेगळे नाहीत, ही गांधीजीच्या ‘नई तालीम’ची भूमिका आज अधिक महत्त्वाची ठरते. पाबळ येथील विज्ञान आश्रमासारखे प्रयोग या दिशेने आशादायी आहेत.
----------
लोगो ः मानसवेध
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
झोपेची काळजी
कार्यक्षम, उत्साही राहण्यासाठी व भावनिक समतोलासाठी, एकूणच शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी शांत झोप अत्यावश्यक आहे. विद्यार्थीदशेत तसेच युवावस्थेत पुरेशा प्रमाणात झोपेची नितांत आवश्यकता असते. मेंदूची कार्यक्षमता, संप्रेरकांची, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये झोपेशी संबंधित आहेत. सध्या महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये उशिरापर्यंत जागरणाचा ट्रेंड दिसत आहे. त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
पुरेशा झोपेमुळे
१. हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
२. ताणतणाव कमी होतो.
३. स्मरणशक्ती व एकाग्रता चांगली रहाते. शरीर झोपलेले असले तरीही मेंदू, दिवसभरातील व पूर्वीच्या घटना, भावना, स्मृती, अनुभव वगैरेंची सांगड घालून स्मृतींच्या फाइल्स तयार करण्याचे महत्त्वाचे काम करत असतो.
४. चांगली झोप उत्साही, सजग बनवते.
५. झोपेमध्ये पेशी जास्त प्रथिने निर्माण करतात. त्याचा उपयोग नादुरुस्त पेशींची, स्नायूंची दुरुस्ती व जोपासना यासाठी होतो.
६. मेंदूत सेरोटोनीन हे संप्रेरक योग्य प्रमाणात स्रवल्यामुळे नैराश्याची शक्यता किंवा नैराश्य कमी होण्यास मदत होते. उत्साह वाढतो.
७. निद्रानाशामुळे स्ट्रेस संप्रेरकांमुळे होणाऱ्या मानसिक तणावजन्य आजारांबरोबरच आर्थ्रायटीस, मधुमेह, हृदयरोग, पचनाच्या तक्रारी निर्माण होत असतात. शरीर लवकर थकते व वृद्धत्वाकडे वाटचाल करू लागते.
निद्रानाशाची लक्षणे
- मध्यरात्रीच उठून बसणे व पुन्हा झोप न येणे.
- सकाळी खूप लवकर जाग येणे.
- झ़ोपेतून जागे झाल्यावर अतिशय थकवा वाटणे.
- वेडीवाकडी, संदर्भ नसलेली स्वप्ने पडणे व सकाळी अस्वस्थता जाणवत रहाणे.
निद्रानाशाची कारणे
- आयुष्यातील महत्त्वाच्या तणावकारक घटना
- शारीरिक आजारपण व वेदना
- भावनात्मक ताणतणाव, नैराश्य, असुरक्षितता, भीती, व्यसन
- काही औषधांचे साइड इफेक्टस
- सततच्या नाइट शिफ्ट्स किंवा प्रवासामुळे झोपेचे बिघडलेले रूटीन
- मोबाइल किंवा इंटरनेटचा अतिरिक्त वापर
निद्रानाशाचा परिणाम
- दिवसभर ग्लानी, थकवा वाटणे, चिडचिड होणे.
- एकाग्रता न होणे. विस्मरण होऊन निर्णयक्षमता
- प्रतिकारशक्तीत घट
- मधुमेह, हृदयविकार, पचनाच्या तक्रारी
निद्रानाशाच्या मागील शारीरिक व मानसिक कारणे शोधून योग्य ते आवश्यक उपाय योजना करणे शक्य असते. औषधे तसेच, तणाव नियंत्रणाचे तंत्र, स्व-संमोहन थेरपी, स्लीप रेस्टरिक्शन थेरपी, रिकंडिशनिंग थेरपी, बिहेविअरल थेरपी असे अनेक उपचार उपयुक्त असतात.
निद्रानाश टाळण्यासाठी
- झोपण्याची व सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ ठरवावी.
- संध्याकाळनंतर चहा, कॉफी इ. पेये घेऊ नयेत.
- रोज भरपूर व्यायाम करावा. परंतु व्यायाम व रात्रीची झोप यामधील अंतर तीन ते चार तासांचे असावे.
- रात्री उशिरा व जड जेवण जेवू नये. रात्रीचे जेवण व झोपेची वेळ यात किमान दीड-दोन तासांचे अंतर असावे.
- झोपण्यापूर्वी ध्यान-धारणा, संगीत ऐकणे, शक्य असल्यास स्नान करणे उपयुक्त ठरते.
- मनात काळजीचे किंवा अस्वस्थतेचे विचार येत असतील तर त्यांची एक यादी बनवावी व स्वत:ला सांगावे की याबद्दल मी उद्या विशिष्ट वेळेमध्ये विचार करीन. सोयीने तसा दिवसातला वेळ ठरवून घ्यावा. त्यावेळी काळजीच्या प्रश्नांवर विवेकपूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. झोपेची वेळ ही प्राध्यान्याने महत्त्वाची आहे हे स्वतःशी ठरवून टाकावे व शांत राहावे. शरीराच्या व मनाच्या गरजेप्रमाणे आवश्यक अशी शांत आणि पुरेशी झोप हे चांगल्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे.
-----------
लोगो ः भविष्यवेध
विनायक द्रविड
यशाचे व्यवस्थापन....
कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे कधीच सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते व सातत्यपूर्ण प्रयत्न व कष्ट करावे लागतात. मिळालेल्या यशाचा आनंद उपभोगणे हे पण तितकेच महत्त्वाचे असते. परंतु हा आनंद घेताना आपला फोकस तर घालवत नाही ना याचे भान कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण आपण आपल्या ट्रॅकवरून घसरून फोकस घालून बसू हे लक्षात येत नाही आणि इथेच यश टिकवण्याची खरी कसरत सुरू होते. कदाचित अनेकदा मिळालेल्या यशाची परिसीमा कायम ठेवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. आत्मसंतुष्टता हा यशाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. अगदी आपल्या शालेय जीवनापासून ते राजकारण, समाजकारण, कोणताही खेळ, नोकरी सगळीकडे यश टिकवून ठेवणे सोपे नाही. यामागचे कारण शोधल्यास असे लक्षात येईल की, यशाच्या शिखरावर टिकून राहणे आणि एक घर खाली येणे यामध्ये एक अतिशय छोटी पायरी असते, ती म्हणजे अति आत्मविश्वास किंवा आत्मसंतुष्टता. आपण मोठ्या विश्वासाच्या मदतीनेच यश संपादन करतो; परंतु तोच विश्वास अजून जास्त झाला की तेच आपल्याला अपयशाच्या दिशेने नेते. यशाच्या शिखरावर जास्त काळ टिकून राहणे म्हणूनच अवघड आहे. आपण अनेकदा कॉर्पोरेट जगतात लहान वयातील कर्मचारी मोठ्या पदावर पोहोचताना पाहतो. मात्र त्यातल्या फार कमी लोकांना हे पद जास्त काळ टिकवता येते. कारण बाकीचे सगळे अति आत्मविश्वासामुळे व मिळालेले यश डोक्यात गेल्यामुळे अपयशी ठरतात.
खेळविश्वात तर हा विषय अजूनच अवघड आहे. कारण खेळात मिळणारी प्रसिद्धी, पैसे (क्रिकेटमध्ये जरा जास्तच) व ग्लॅमर यामुळे लक्ष विचलित होते व त्याचा परिणाम थेट खेळाडूंच्या कामगिरीवर होतो आणि तुम्ही या शर्यतीत मागे पडता. क्रिकेटमध्ये यश सांभाळण्यात अपयशी ठरलेले अनेक उदाहरणे आहेत. तुम्ही यशावर स्वार होता, तेव्हा तुमची मानसिकता, सद् सद् विवेकबुद्धी, मनावरचा ताबा, तुमची दिनचर्या, प्रलोभाने, शिस्त, व्यायाम व फिटनेस या सर्वांची खरी परीक्षा असते. कारण त्या काळात आपले लक्ष वरीलपैकी कोणतेही कारणाने सहज विचलित होण्याची खूप शक्यता असते, एकदा का तुम्ही ही परिस्थिती नीट हाताळल्यास यश जास्त काळ सांभाळू शकता. भारतीय खेळाडूंमध्ये लिएंडर पेस, सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, धोनी, राहुल द्रविड, गांगुली व असे अनेक दिग्गज खेळाडू आहेत की, ज्यांनी यशाच्या सर्वांत वरच्या स्तरावर अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने यश हाताळून ते त्या ठिकाणी उभे राहिले आहेत.
खेळामध्ये दीर्घकाळ यश टिकवणारी अनेक आहेत. आपण नुसते यशस्वी होऊन चालत नाही तर ते यश टिकवणे खरे मोठे आव्हान आहे. त्यासाठी तुमचा मनावरचा ताबा, तुमची वागणूक, तुम्ही कायम जमिनीवर असणे व शिस्त फार महत्त्वाची ठरते.
----------
लोगो ः प्रज्ञा विकासाचा राजमार्ग
जयवंत बोरसे
दृष्टी संशोधनाची...!
युद्धभूमीपासून दूर असूनही कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे संजयने धृतराष्ट्राला इंत्थभूत कथन केले. संजयला दिव्यदृष्टी लाभली होती असे मानले, तर परदेशात खेळल्या जाणारा एखादा सामना घरी बसून पाहता येण्याइतकी दिव्यदृष्टी आणि श्रवणशक्ती आता प्रत्येकाला लाभलेली आहे. पूर्वी एका कारखान्यासारखा असणारा संगणक. त्याच्या अनेक पिढ्यांनंतर तो हातातल्या मोबाइलमध्येही सामावतो. ही केवळ जादू नसून वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून साध्य होणारी बाब आहे. जसे थॉमस एडिसनने बल्बमधील फिलामेंटचा शोध लावण्यासाठी १००० वेळा प्रयोग केले. कोणताही शोध लहान किंवा मोठा नसतो. महत्त्वाची असते ती, त्या शोधाची उपयुक्तता. मग ती सेफ्टी पिनही का असेना. सेफ्टी पिनचा शोध १८४९च्या दरम्यान वॉल्टर हंटने लावला.
विज्ञानाच्या साह्याने जितके अधिक शोध लागताहेत, दुसरीकडे तितकीच अधिक अंधश्रद्धाळू माणसेदेखील पाहायला मिळतात. वर्तमानपत्र व दूरचित्रवाणीवरील बातम्या असोत की, फेसबुक आणि व्हॉटस्अपसारख्या सामाजिक माध्यमांवरील पोस्ट या सर्वांचा विचार करता असे जाणवायला लागते की, समाज अनेकदा अविचाराने वागतो का? याचा अर्थ तेव्हा नक्कीच तार्किक विचारांचा अभाव आढळतो. शिक्षण आणि अंधश्रद्धा यांचाही ताळमेळ लागताना दिसत नाही. फक्त शिक्षणातून ज्ञान मिळणे महत्त्वपूर्ण नसून, त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनव्यवहारात परिणामकारक उपयोजन करणे जास्त महत्त्वाचे ठरते. थोर वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलाम यांच्या स्वप्नातला गुणवत्तापूर्ण, उत्पादनक्षम व स्वंयपूर्ण भारत घडविण्यासाठी बालवयातच देशाचा भावी सक्षम (विज्ञाननिष्ठ) नागरिक तयार होणे गरजेचे आहे. मागील लेखातील आरोही आणि अथर्वसारख्या अनेक बालकांमध्ये उपजत क्षमता आहेत. फक्त गरज आहे, अशा बालकांचा नेमका शोध घेण्याची आणि त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा दिशा देण्याची. ‘मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ’ याच ध्येयाने प्रेरित होऊन विविध उपक्रम राबवीत असते. त्या अनेक उपक्रमांपैकी ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’ हा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. विज्ञान व पर्यावरण प्रसाराच्या चळवळीचा हा एक भाग आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विज्ञानाच्या संकल्पना समजतील. का? कसे? यांसारख्या प्रश्नांचे उत्तर शोधता-शोधता प्रयोगातून ज्ञान मिळेल व विज्ञानाची गोडीही वाढेल. पर्यावरणाचे महत्त्व पटेल. पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण होईल. त्यातूनच विज्ञान व पर्यावरणाचे प्रसारक तयार होतील आणि काही भावी शास्त्रज्ञ गवसतील. त्यांचा योग्य वेळी शोध घेतल्यामुळे त्यांच्या विकासासाठी पुरेसा अवधी मिळेल.
या भावी शास्त्रज्ञांचा शोध घेण्यासाठीची ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’ ही एक स्पर्धा परीक्षा आहे. तिचे स्वरुप, रचना, तयारी आणि त्या संबंधित अनेक बाबींची माहिती घेण्यासाठी आपण पुढील लेखात भेटणार आहोत. तोपर्यंत आपण दैनंदिन जीवनातील विज्ञान, ही जादू नसून त्यामागील हातचलाखी व तर्क किंवा शास्त्रीय कारणे तसेच विज्ञानातील गमतीजमती याविषयीची माहिती गोळा करू या.
-----------
लोगो ः विशेष
सीए प्रणव मंत्री
फायरफ्लाइज एआय ः
मीटिंग्सचे कृतीयोग्य माहितीमध्ये रूपांतर
सध्याच्या कामकाजाच्या पद्धतीत मीटिंग्स हा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसातील मोठा वेळ या मीटिंग्समध्ये जातो, पण त्यातून नेमके काय ठरले, कोणती जबाबदारी कोणावर आहे, हे लक्षात ठेवणे अनेकदा कठीण जाते. अशा वेळी ‘फायरफ्लाइज एआय’ हे साधन खूप उपयुक्त ठरते.
हे उत्तम मीटिंग असिस्टंट असून ते तुमच्या मीटिंग्सचे रेकॉर्ड करण्याबरोबरच त्याचे लिप्यंतरण (ट्रान्सक्रिप्शन) आणि विश्लेषणही करते. तुम्ही ते कॅलेंडरशी जोडल्यास झूम, गुगल मीट किंवा मायक्रोसॉफ्ट टिम्ससारख्या प्लॅटफॉर्मवरील मीटिंग्समध्ये आपोआप सहभागी होते. त्यामुळे नोट्स घेण्याची चिंता राहत नाही आणि तुम्ही पूर्ण लक्ष चर्चेकडे देऊ शकता.
याचे ट्रान्सक्रिप्शन फीचर विशेष उल्लेखनीय आहे. मीटिंगमधील संभाषण थेट व्यवस्थित लिखित स्वरूपात मिळते, आणि त्यात कोण काय बोलले हेही लक्षात येते. त्यामुळे नंतर मीटिंग पुन्हा पाहताना गोंधळ होत नाही आणि गैरसमज टाळता येतात. आणखी एक सोईस्कर बाब म्हणजे सर्च फीचर. लांबलचक रेकॉर्डिंग ऐकण्याऐवजी, तुम्ही थेट ट्रान्सक्रिप्टमध्ये हवे ते शब्द किंवा वाक्य शोधू शकता. व्यस्त कामकाजात हे खूप वेळ वाचवणारे ठरते.
‘फायरफ्लाइज एआय’ मीटिंगचे सारांशही तयार करते. यात महत्त्वाचे मुद्दे, घेतलेले निर्णय आणि पुढील कृती यांचा स्पष्ट आढावा मिळतो. त्यामुळे संपूर्ण ट्रान्सक्रिप्ट वाचण्याची गरज राहत नाही.
प्रमुख वैशिष्ट्ये
१) मीटिंग्स आपोआप रेकॉर्ड आणि ट्रान्सक्राइब करते
२) प्रमुख प्लॅटफॉर्म्ससोबत सहज इंटिग्रेशन
३) स्पीकर-टॅग केलेले, सर्च करण्यायोग्य ट्रान्सक्रिप्ट्स
४) एआय-आधारित सारांश आणि कृती मुद्दे
कोणासाठी उपयुक्त?
हे टूल केवळ कॉर्पोरेट क्षेत्रापुरते मर्यादित नाही. कंपन्यांना निर्णय आणि फॉलो-अप्स स्पष्टपणे ट्रॅक करता येतात. सेल्स टिम्स क्लायंट कॉल्सचे विश्लेषण करून आपली रणनीती सुधारू शकतात. शिक्षक आणि विद्यार्थी लेक्चर्स नंतर सहज रिव्ह्यू करू शकतात याशिवाय, हे विविध प्रॉडक्टिव्हिटी टूल्स आणि CRM सिस्टीम्ससोबतही काम करते, ज्यामुळे कामाचा प्रवाह अधिक सुलभ होतो.
मर्यादा
तरीही, काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पार्श्वभूमीतील आवाज, उच्चार किंवा एकाचवेळी दोन वेगवेगळे आवाज यामुळे ट्रान्सक्रिप्शनमध्ये थोडी चूक होऊ शकते. तसेच, काही प्रगत फीचर्स फक्त पेड व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत.
निष्कर्ष
काम करण्याच्या पद्धती झपाट्याने बदलत आहेत आणि त्यानुसार स्मार्ट टूल्सची गरजही वाढत आहे. फायरफ्लाइज एआय मीटिंग्सना फक्त रेकॉर्ड करण्यापुरते मर्यादित ठेवत नाही, तर त्यातून उपयुक्त आणि कृतीयोग्य माहिती तयार करते.
एकूणच, हे टूल वेळ वाचवते, स्पष्टता वाढवते आणि टीमला अधिक परिणामकारक बनवते. आजच्या घाईगडबडीच्या जगात, अशा प्रकारची साधने केवळ सोय नसून गरज बनत चालली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.