विजय, अधिकारी लिटमस चाचणी उत्तीर्ण
तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरीमध्ये सत्ताधारी पक्षांना पोटनिवडणुकीत कौल
नवी दिल्ली, ता. ९ : तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरीमध्ये विधानसभांच्या पाच जागांवर झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनाच विजय मिळाला आहे. या निकालामुळे तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री जोसेफ विजय आणि पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी लिटमस चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे तमिळनाडूतील दोन जागांवर अण्णा द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमबहुल रेजिनगर मतदारसंघही भाजपने प्रचंड बहुमतासह विजय मिळविला आहे.
तमिळनाडूतील मदुरंथगम आणि धारापुरम या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये टीव्हीकेचा विजय झाला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुकचे उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही आमदारांनी राजीनामा देत टीव्हीकेमध्ये प्रवेश केल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुक तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. धारापुरम येथे टीव्हीकेच्या उमेदवार व्ही. सत्यभामा यांनी द्रमुकच्या सुगन्या यांचा १० हजार मतांनी पराभव केला. या ठिकाणी अण्णा द्रमुकचा उमेदवार तिसऱ्या स्थानी राहिला. तर, मदुरंथगम येथे मरगथाम कुमारवेल यांनी द्रमुकचे उमेदवाराचा १८ हजार मतांनी पराभव केला. दोन्ही ठिकाणी अण्णा द्रमुकच्या मतांमध्ये मोठी घसरण झाली आहे. मुख्यमंत्री विजय यांनी या दोन्ही जागांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती आणि जोरदार प्रचार केला होता. टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी ढोलच्या तारांवर आणि मिठाई वाटत जल्लोष केला. या विजयानंतर टीव्हीकेच संख्याबळ १०९ वर पोहोचले असून, त्यांना स्वबळावरील बहुमतासाठी अजूनही नऊ जागांची आवश्यकता आहे. विजय यांनी त्रिची पूर्वच्या जागेवरून राजीनामा दिला आहे. त्यासह आणखी पाच जागांवर पोटनिवडणूक बाकी आहे.
पश्चिम बंगालमध्ये नंदिग्राम आणि रेजिनगर मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने विजय मिळविला असून, भाजपने चार महिन्यांपूर्वी मिळविलेली जनमतावरील पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या नंदिग्राम मतदारसंघामध्ये भाजपच्या हसिरानी रथ यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा ८१,०७९ मतांनी पराभव केला. अधिकारी यांचे स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांची निवडणुकीनंतर हत्या झाली होती, हसिरानी रथ या त्यांच्या आई आहेत. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. दुसऱ्या बाजूला मुस्लिमबहुल रेजिनगर मतदारसंघामध्ये भाजपच्या शंखारव सरकार यांनी आम जनता उन्नयम पक्षाचे गुलाम नबी आझाद यांचा ७५ हजार ८१६ मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराला ६,१६८ तर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला ३,८४७ मते मिळाली. रेजिनगरमध्ये भाजपला मिळालेल्या मतांचे प्रमाण २७ टक्क्यांवरून ६३ टक्क्यांवर गेले आहे. ‘अल्पसंख्याक समाजाला भाजपमध्ये आपलेपणा दिसत आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला मतदान केले,’ अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी दिली.
पुदुच्चेरीच्या थट्टनचावडी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी एआयएनआर काँग्रेसचे अशोक आनंद यांनी ८५०० मतांनी विजय मिळविला आहे. मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआर काँग्रेस हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष आहे. रंगास्वामी यांनी दोन मतदारसंघामध्ये विजय मिळविल्यामुळे थट्टनचावडी मतदारसंघातून राजीनामा दिला होता.
नागांवमध्ये भाजपला कौल
आसामच्या नागांव लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीत भाजपचे देवाशिष शर्मा यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. त्यांनी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांच्यावर १,५७,८०४ मतांनी आघाडी घेतली होती. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार शिबामनी बोरा तिसऱ्या क्रमांकावर होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.