पुणे - ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सांगितले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संसर्गापासून बचाव होत असला, तरी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरी थांबून काम करताना कुटुंब आणि कामासाठीचा वेळ वेगळा करताना त्यांची तारेवरील कसरत होत आहे. पुण्यातील आयटी क्षेत्रात सुमारे ६ लाख जण काम करत आहेत.
आयटी कंपन्या काम करताना सुरक्षित नेटवर्कमध्ये काम करतात. घरून काम करताना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित नेटवर्कचा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयटी कर्मचारी विशाखा गोस्वामी म्हणाल्या, ‘‘सध्या घरातील व कार्यालयाचे काम सोबत करत आहे. घरात असल्यामुळे आता घरच्यांना वेळ देता येतो, परंतु त्याचबरोबर इतर कर्मचाऱ्यांसोबत फक्त आता कॉल आणि व्हिडिओ कॉलिंगमार्फत संवाद होत आहे. ही परिस्थिती किती दिवस चालेल याची माहिती नाही.’’
आयटी कर्मचारी सारंग भोसले म्हणाले, ‘‘गेले दोन दिवस मी ‘वर्क फ्रॉम होम’ करतोय. मला ऑफिसमधून काम करण्याची सवय आहे. घरातून काम करताना मी कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे कामाचा वेग कमी झाला आहे. त्यात मुलालाही वेळ देत आहे. नेमके त्याच वेळेत महत्त्वाचे काम असल्यास काम आणि घरातील जबाबदारी यात ताळमेळ साधणे अवघड होते.’’
आयटी कर्मचारी आसीम अली म्हणाले, ‘‘आयटीमधील ‘एजाईल’ या प्रकारामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना एकत्रित काम करावे लागते. याचे मुख्य कारण आहे त्या कामाबाबतची नेटवर्क सुरक्षा. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अशा कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. तांत्रिक अडचणी कार्यालयात इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तत्काळ सोडविल्या जाऊ शकतात.
हिंजवडी आयटी क्षेत्रात सुमारे १७० लहान-मोठ्या कंपन्या आहेत. मोठ्या कंपन्यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास परवानगी दिली आहे. बहुतेक कंपन्यांचे विदेशी ग्राहक आहेत. त्यांनी मंजुरी दिल्यावरच ‘वर्क फ्रॉम होम’ केले जात आहे.
- योगेश जोशी, अध्यक्ष, सुरक्षा आणि दक्षता समिती, हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए)
वर्क फ्रॉम होम’ ही कायमस्वरूपी नव्हे, तर तात्पुरती संकल्पना आहे. त्यापैकी कंपन्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील माहिती निर्माण करण्याची कामे कंपनीतूनच करावी लागतात.
- सुधीर देशमुख, आयटी अभियंता
कंपन्यांमध्ये वापरण्यात येणारे नेटवर्क कायम सुरक्षित असते. परंतु सध्या ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अशा गोपनीय कामासाठी सुरक्षित नेटवर्कचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरात वापरण्यात येणाऱ्या इंटरनेटची क्षमता कमी जास्त होत असल्याने तांत्रिक अडचणी येतात.
- मनुष्यबळ विकास अधिकारी
गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आमच्या कंपनीतील कर्मचारी घरातून काम करीत आहेत. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षित नेटवर्क आणि सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कामात कोणताच अडथळा निर्माण होत नाही.
- एस. रामप्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, एक्स्पान्शन कंपनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.