सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ ः ‘‘भारतीय महिला केवळ परंपरेच्याच नव्हे तर परिवर्तनाच्या देखील वाहक आहेत. निर्णयक्षमता, धैर्य आणि परिश्रम यांना लिंगभेद नसतो,’’ असे गौरवोद्गार दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काढले. महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित ‘भारती - नारी ते नारायणी’ या दोन दिवसांच्या राष्ट्रीय महिला विचारक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय विद्वत परिषद, राष्ट्र सेविका समिती आणि शरण्या या संस्थांतर्फे ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ८) महिलादिनी या परिषदेचा समारोप होणार आहे.
गुप्ता म्हणाल्या की, निर्णयक्षमता, धैर्य आणि परिश्रम यांना लिंगभेद नसतो. आज भारतीय महिला विविध क्षेत्रांत पुरुषांपेक्षा अधिक प्रभावी काम करत आहेत. महिलांनी स्वतःची उद्दिष्टे स्वतः ठरवण्यास सुरुवात केली आहे. कुटुंब, समाज आणि देशाच्या अपेक्षा पूर्ण करताना महिलांनी स्वतःच्या आनंदासाठीही वेळ काढावा, तसेच कुटुंबाच्या आरोग्याबरोबर स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षस्थानी असलेल्या व्ही. शांता कुमारी यांनी भारतीय संस्कृतीत महिलेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगतानाच वेदाध्ययनापासून ते ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पराक्रम गाजविल्याचे नमूद केले.
या परिषदेत विविध विषयांवर महिला खासदार, विद्यापीठांचे कुलगुरू आणि साध्वी यांचे विशेष परिसंवादही आयोजित करण्यात आले आहेत. या चर्चांमधून मिळणाऱ्या सूचनांची माहिती केंद्र सरकारच्या संबंधित विभागांना पाठविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.