CKL26B03150
शेटफळ (ता. करमाळा) ः लेकीच्या हट्टापायी इंग्लंड वरून नाग दर्शनासाठी आलेले डॅरेन मुडी लेकीसह नागाचे फोटो घेताना.
लेकीच्या हट्टापायी ८ हजार किमीवरून ‘नागोबाच्या शेटफळा’मध्ये
इंग्लडच्या बाप-लेकीने अनुभवला नागपंचमीचा अनोखा उत्सव
चिखलठाण, ता. १९ : इंग्लंडच्या पर्यटकांना नागोबाच्या शेटफळाने भुरळ घातली. लेकीच्या नागदर्शनाच्या हट्टापायी इंग्लंडहून आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून आलेले डॅरेन मुडी यांनी लेक सौफियासह दोन दिवस शेटफळकरांचा पाहुणचार घेतला. नागपंचमी उत्सवात सहभागी होत नागराजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गावाचा निरोप घेतला.
इंग्लंडमधील इंटिरिअर डेकोरेटर व्यावसायिक डॅरेन मुडी यांची नऊ वर्षांची मुलगी सोफीया हिला सापांविषयी आकर्षण आहे. तिच्या घरीही एक साप पाळला आहे. सोशल मीडियावरून ती सापांविषयीची माहिती सातत्याने घेत असते. सोलापूर जिल्ह्यात सापाला देव मानून त्याची पूजा केली जाते, तसेच नागपंचमीला हमखास नागदर्शन होते, अशी माहिती तिला नागोबाचे शेटफळबाबत मिळाली. शेटफळला जाऊन नाग पाहण्याचा तिने वडिलांकडे हट्ट धरला.
डॅरेन यांनी गुगलवरून शेटफळची माहिती घेतली. नागपंचमीच्या उत्सवासाठी बाप-लेकीने आठ हजार किलोमीटरचा प्रवास करून १६ ऑगस्टला सकाळी शेटफळ गाठले. गावातील जानवी पोळ, सूरज लावंड अन् प्रशांत नाईकनवरे यांनी त्यांना गाव फिरवून दाखवले.
शेटफळ अन् परिसरात नागांची संख्या मोठी असली तरी ग्रामस्थ नाग शोधून पकडत नाहीत. नैसर्गिकरीत्या नाग बाहेर आल्यानंतर त्याला हात जोडून नमस्कार करून त्याची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी दिवसभर थांबूनही नागदर्शन झाले नाही. ग्रामस्थांनी ‘आज नाग दिसला नाही तरी उद्या नक्की दिसेल,’ असे सांगत त्यांना थांबण्याचा आग्रह केला. नागदर्शनाची तीव्र इच्छा असल्याने बाप-लेकीने जवळील शेलगाव येथील हॉटेलमध्ये मुक्काम केला.
त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास महावितरण कार्यालयाजवळ नाग दिसल्याची माहिती मिळाली. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आले. तासभर एका ठिकाणी शांतपणे थांबलेल्या नागाचे दर्शन सोफीयाला झाले अन् तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलला.
दुसऱ्या दिवशी सोफीयाने नऊवारी साडी नेसून नागपंचमी साजरी केली. फुगडी खेळली, गंगाधर पोळ यांच्या घरी मराठमोळ्या पुरणपोळीचा आस्वाद घेतला. प्रशांत नाईकनवरे अन् जिव्हाळा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पाहुणचार केला.
‘हा अविस्मरणीय अनुभव आयुष्यभर विसरणार नाही,’ असे सांगत डॅरेन यांनी गावकऱ्यांचे आभार मानले अन् बाप-लेकीने शेटफळचा निरोप घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.