करिअर विशेष
तंत्रज्ञान आणि जबाबदारीचा संगम
- ॲड. शालिनी दीपक शर्मा
---------------------------------------------------------
लीड
यशस्वी एथिकल हॅकर होण्यासाठी केवळ कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान असणे पुरेसे नाही. यासाठी जिज्ञासा, संयम, विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रबळ नैतिक जबाबदारी असणे आवश्यक आहे. सायबर धोके सतत बदलत असल्यामुळे या क्षेत्रात सतत शिकत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
---------------------------------------------------------
मध्यरात्रीची वेळ होती. एकाच शहराच्या दोन कोपऱ्यांत दोन तरुण आपल्या लॅपटॉपमध्ये एकाग्रतेने कोड टाइप करत बसले होते. रोहन बहुराष्ट्रीय कंपनीच्या सायबर सुरक्षा विभागात कार्यरत होता. एका आघाडीच्या बँकेने आपल्या ऑनलाइन प्रणाली खरोखरच सुरक्षित आहे का, हे तपासण्यासाठी त्याच्या टीमला नेमले होते. तासन् तास तो त्या बँकिंग ॲप्लिकेशनमधील त्रुटी शोधत होता. ग्राहकांचे खाते, पासवर्ड आणि पेमेंट सिस्टीम हॅक होऊ शकते का, हे तो तपासत होता. त्याला सापडलेल्या प्रत्येक त्रुटीचे काळजीपूर्वक दस्तावेजीकरण करून त्याचा अहवाल दिला जात होता, जेणेकरून प्रत्यक्षात हल्ला होण्यापूर्वी ती त्रुटी दुरुस्त करता येईल.
तिथूनच अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दुसऱ्या कोपऱ्यात आरव रोहनच्या अगदी उलट काम करत होता. आपल्या खोलीत एकटाच बसून लोकांना फसवून त्यांचे ओटीपी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी बनावट बँकिंग लिंक्स आणि फिशिंग संदेश तयार करत होता. काही मिनिटांतच कोणाची तरी आयुष्यभराची पुंजी नाहीशी होऊ शकत होती आणि तंत्रज्ञानावरील त्यांचा विश्वास उडू शकत होता.
यातील एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, रोहन आणि आरव या दोघांकडेही सारखेच तांत्रिक कौशल्य आहे. दोघांनाही सिस्टीम, नेटवर्क आणि त्यांच्यातील त्रुटी चांगल्या प्रकारे समजतात. तरीही एकजण लोकांच्या रक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत होता, तर दुसरा फसवणूक आणि शोषणासाठी त्याचा गैरवापर होता.
हा फरक समजून घेण्यासाठी ‘हॅकिंग’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणे गरजेचे ठरते. सोप्या शब्दांत सांगायचे, तर कॉम्प्युटर सिस्टीम, नेटवर्क किंवा डिजिटल उपकरणांचे कार्य कसे चालते आणि त्यामध्ये कुठे उणिवा आहेत का, हे समजून घेऊन त्या प्रणालींमध्ये प्रवेश करणे किंवा त्यांची चाचणी घेणे म्हणजेच हॅकिंग. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीनुसार, हॅकिंग म्हणजे एखाद्या सिस्टीममध्ये किंवा कॉम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविणे. एखाद्या कंपनीने सुरक्षा तपासून बघण्याच्या उद्देशाने यंत्रणेची केलेली अधिकृत चाचणीदेखील हॅकिंगमध्ये समाविष्ट होऊ शकते.
माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००अंतर्गत, कलम ६६ हे लबाडीने किंवा फसवणुकीच्या उद्देशाने केलेल्या डेटाबेसमधील अनधिकृत प्रवेशाशी संबंधित कॉम्प्युटर गुन्हे हाताळते; तर कलम ४३ हे अनधिकृतपणे डेटा डाउनलोड करणे, व्हायरस पसरविणे आणि कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अडथळा आणणे यांसारख्या बाबींशी संबंधित आहे. हॅकिंग नेहमीच बेकायदेशीर नसते, पण खरा फरक हेतू, परवानगी आणि उद्देश यांमध्ये दडलेला असतो.
जेव्हा डेटा चोरी करण्यासाठी, फसवणूक करण्यासाठी, मालवेअर पसरविण्यासाठी किंवा परवानगीशिवाय सिस्टीममध्ये अडथळा आणण्यासाठी तांत्रिक कौशल्यांचा गैरवापर केला जातो, तेव्हा त्याला ‘सायबर गुन्हे’ म्हटले जाते. सायबर गुन्हेगारांना सामान्यतः ‘ब्लॅक हॅट हॅकर्स’ म्हटले जाते. मात्र, जेव्हा याच तांत्रिक ज्ञानाचा वापर सुरक्षेतील त्रुटी शोधण्यासाठी आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी परवानगी घेऊन केला जातो, तेव्हा त्याला ‘एथिकल हॅकिंग’ (नैतिक हॅकिंग) म्हणतात. आजकाल सायबर गुन्हे केवळ मोठ्या कंपन्या किंवा तांत्रिक तज्ज्ञांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. सामान्य नागरिकही बनावट गुंतवणूक ॲप्स, क्यूआर कोड स्कॅम, ओटीपी फ्रॉड, सोशल मीडिया हॅकिंग, डीपफेक स्कॅम आणि एआय जनरेटेड फिशिंगसारख्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत.
जागतिक सायबर हेराफेरीच्या सर्वात प्रसिद्ध उदाहरणांपैकी एक म्हणजे, सन २०००मधील ‘आय लव्ह यू’ नावाचा व्हायरस हल्ला. फिलिपिन्सधून सुरू झालेले हे मालवेअर ‘आय लव्ह यू’ अशी सब्जेक्ट लाइन असलेल्या ईमेल्सद्वारे पसरले. हजारो लोकांनी उत्सुकतेपोटी आणि भावनेच्या भरात ती फाइल उघडली आणि नकळतपणे हा व्हायरस जगभरातील सिस्टीम्समध्ये पसरला. या हल्ल्यामुळे प्रचंड नुकसान आणि आर्थिक हानी झाली. त्यामुळे सायबर सुरक्षेबद्दल जगभरात मोठी जागरूकता निर्माण झाली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुसरी ऐतिहासिक केस म्हणजे १९९१मध्ये झालेली युनायटेड स्टेट्स विरुद्ध मॉरिस. यात ‘मॉरिस वर्म’ या पहिल्या प्रमुख इंटरनेट वर्मचा निर्माता रॉबर्ट मॉरिसचा समावेश होता. या घटनेने हजारो सिस्टिम्स ठप्प झाल्या. अमेरिकेच्या कॉम्प्युटर फ्रॉड ॲण्ड ॲब्यूज ॲक्ट, १९८६अंतर्गत ही पहिली मोठी शिक्षा ठरली. डिजिटल घुसखोरीचे जगावर काय व कसे परिणाम होऊ शकतात, हे या घटनेने दाखवून दिले.
-----------------------------चौकट इथे घ्यावी
आजच्या जगात एथिकल हॅकिंग केवळ तांत्रिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. बँका आपला डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठीही एथिकल हॅकर्सचा वापर केला जातो. सायबर ऑडिटद्वारे हॉस्पिटल्स रुग्णांचा डेटा सुरक्षित ठेवतात, ई-कॉमर्स कंपन्या पेमेंट गेटवे सुरक्षित करतात आणि सरकार सायबर धोक्यांपासून देशाच्या महत्त्वपूर्ण पायाभूत डिजिटल सुविधांचे रक्षण करते.
सायबर सुरक्षेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असताना, अनेक तरुणांना पडणारा प्रश्न म्हणजे, एथिकल हॅकिंग हे खरोखरच करिअर म्हणून निवडता येऊ शकते का? याचे उत्तर ‘होय’ असे आहे. एथिकल हॅकिंग हे विविध उद्योग आणि देशांमध्ये संधी देणारे प्रतिष्ठित जागतिक करिअर झाले आहे. यशस्वी एथिकल हॅकर होण्यासाठी केवळ कॉम्प्युटरचे प्राथमिक ज्ञान असणे पुरेसे नाही. यासाठी जिज्ञासा, संयम, विश्लेषणात्मक विचार, समस्या सोडविण्याची क्षमता, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रबळ नैतिक जबाबदारी असणे आवश्यक आहे. सायबर धोके सतत बदलत असल्यामुळे या क्षेत्रात सतत शिकत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
या क्षेत्राबद्दलचा मोठा गैरसमज म्हणजे, केवळ इंजिनिअरिंगचे पदवीधरच सायबर सुरक्षेमध्ये येऊ शकतात. प्रत्यक्षात कोणत्याही शैक्षणिक पार्श्वभूमीचे विद्यार्थी तांत्रिक आणि व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करून एथिकल हॅकिंगमध्ये प्रवेश करू शकतात. यासाठीच्या दीर्घकालीन शैक्षणिक पर्यायांमध्ये कॉम्प्युटर सायन्स किंवा सायबर सिक्युरिटीमध्ये बीटेक, बीसीए, एमसीए, बीएससी आणि विविध विशेष डिप्लोमा प्रोग्रॅम्सचा समावेश होतो. त्याचबरोबरच अल्पमुदतीचे सर्टिफिकेट कोर्सेसदेखील तितकेच आवश्यक ठरतात. सर्टिफाइड एथिकल हॅकर (सीईएच), CompTIA Security+, सर्टिफाइड इन्फॉर्मेशन सिस्टीम सिक्युरिटी प्रोफेशनल (सीआयएसएसपी), ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी सर्टिफाइड प्रोफेशनल (ओएससीपी) यांसारखे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळवून देण्यात मदत करतात.
एथिकल हॅकिंग पूर्णपणे कौशल्यावर आधारित क्षेत्र असल्यामुळे, केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक अनुभवाला जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा वर्कशॉप्स, इंटर्नशिप्स, कोडिंग चॅलेंजेस, सायबर लॅब्स, बग बाउंटी प्रोग्रॅम्स आणि कॅप्चर द फ्लॅग (सीटीएफ) स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. हे अनुभव विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यास मदत करतात. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हॅकिंगमधील प्रवास प्रत्यक्ष नोकरी मिळण्यापूर्वीच सुरू होतो. अनेकदा विद्यार्थी सेल्फ-लर्निंग प्लॅटफॉर्म्स, ओपन-सोर्स कम्युनिटीज आणि सायबर जागरूकता मोहिमांच्या माध्यमातून शिकण्यास सुरुवात करतात. काहीजण स्वतःहून शाळा, स्वयंसेवी संस्था किंवा लहान व्यवसायांना त्यांची डिजिटल सुरक्षा सुधारण्यासाठी मदत करतात. यातून त्यांना अनुभवाबरोबरच सामाजिक योगदानाचेही समाधान मिळते.
आजच्या काळात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त एक व्यावहारिक मार्ग म्हणजे बग बाउंटी प्रोग्रॅम्समधील सहभाग. गूगल, मेटा आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या सायबर सुरक्षाप्रेमींना त्यांच्या सिस्टीममधील त्रुटी शोधण्यासाठी आमंत्रित करतात. खऱ्या त्रुटी शोधल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक बक्षिसे, सन्मान आणि व्यावसायिक ओळख मिळते. या प्रवासात इंटर्नशिप हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आज सायबर सिक्युरिटी फर्म्स, फिनटेक कंपन्या, स्टार्टअप्स, आयटी कंपन्या आणि डिजिटल कन्सल्टिंग फर्म्स विद्यार्थ्यांना व्हल्नरेबिलिटी असेसमेंट, पेनिट्रेशन टेस्टिंग, डिजिटल फॉरेन्सिक, सायबर मॉनिटरिंग आणि सिक्युरिटी ऑपरेशन्समध्ये इंटर्नशिपच्या संधी देतात. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून सायबर घटना कशा हाताळल्या जातात, हे समजते.
अनुभव वाढल्यानंतर प्रोफेशनल्स अनेक क्षेत्रांमध्ये पूर्णवेळ काम करू शकतात. बँका ऑनलाइन बँकिंग सिस्टीम आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एथिकल हॅकर्सची भरती करतात. हॉस्पिटल्सना रुग्णांचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी आणि रॅन्समवेअर हल्ले रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची गरज भासते. सरकारी संस्था आणि संरक्षण क्षेत्र देशाच्या पायाभूत डिजिटल सुविधांच्या रक्षणासाठी सायबर तज्ज्ञांवर अवलंबून असतात. आयटी कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि फिनटेक कंपन्या त्यांच्या प्रणाली मजबूत करण्यासाठी सतत सायबर सुरक्षा प्रोफेशनल्सची भरती करत असतात.
या व्यवसायात विविध करिअरमार्ग उपलब्ध आहेत. व्यक्ती एथिकल हॅकर, पेनिट्रेशन टेस्टर, सायबर सिक्युरिटी ॲनालिस्ट, सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर ॲनालिस्ट, इन्सिडंट रिस्पॉन्स ॲनालिस्ट, सायबर फॉरेन्सिक एक्स्पर्ट, सिक्युरिटी कन्सल्टंट म्हणून काम करू शकतात. काहीजण यापुढे जाऊन क्लाउड सिक्युरिटी, नेटवर्क सिक्युरिटी, ॲप्लिकेशन सिक्युरिटी, सायबर थ्रेट इंटेलिजन्स किंवा मालवेअर ॲनॅलिसिसमध्ये तज्ज्ञ होतात.
एथिकल हॅकिंगचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याचे जागतिक स्तरावरील महत्त्व. हे कौशल्यावर आधारित क्षेत्र असल्यामुळे यामध्ये वर्क फ्रॉम होम, रिमोट वर्क, आंतरराष्ट्रीय कन्सल्टिंग, फ्रीलान्सिंग आणि स्वतंत्र सुरक्षा संशोधनाच्या (सिक्युरिटी रिसर्च) अशा अफाट संधी उपलब्ध आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, स्मार्ट डिव्हाइसेस आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा जसा विस्तार होत आहे, तशी सायबर सुरक्षा प्रोफेशनल्सची मागणी येत्या काही दशकांमध्ये लक्षणीयरित्या वाढणार आहे.
सध्याच्या जगात आपली बँकिंग, शिक्षण, आरोग्य सेवा, व्यवसाय, नातेसंबंध आणि अगदी वैयक्तिक ओळखदेखील डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा आता केवळ चैन राहिलेली नाही, तर ती अत्यावश्यक गरज झाली आहे. प्रत्येक सुरक्षित व्यवहाराच्या, सुरक्षित डेटाबेसच्या आणि सुरक्षित डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मागे कोणतेही अघटित घडण्यापूर्वी धोके रोखण्यासाठी शांतपणे काम करणारे सायबर प्रोफेशनल्स महत्त्वाचे कार्य करत आहेत.
एथिकल हॅकर्स तंत्रज्ञानाला जबाबदारीची जोड देतात. ते केवळ कोड आणि सिस्टीमवर काम करत नाहीत, तर ते या डिजिटल युगातील लोकांचा विश्वास सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. आजच्या तरुणांसाठी एथिकल हॅकिंग हा केवळ अपारंपरिक करिअर पर्याय उरला नाही, तर तो एक भविष्याभिमुख व्यवसाय ठरला आहे. हे क्षेत्र तरुणांना नावीन्य, आव्हान, जागतिक संधी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता बाळगते. भविष्य केवळ तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांचे नसेल, तर त्याचे जबाबदारीने रक्षण करणाऱ्यांचेही असेल.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
चौकट-
सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि प्रमाण वाढू लागले, तसे सायबर सुरक्षा विश्वाने नैतिकता आणि अधिकारांवर आधारित हॅकर्सच्या विविध श्रेणी विकसित केल्या :
१. व्हाइट हॅट हॅकर्स : यांना ‘एथिकल हॅकर्स’ म्हणून ओळखले जाते. हे रीतसर परवानगी घेऊन सुरक्षेतील त्रुटी शोधण्यासाठी आणि ती मजबूत करण्यासाठी कायदेशीररित्या सिस्टीमची चाचणी घेतात.
२. ग्रे हॅट हॅकर्स : हे नैतिक आणि अनधिकृत सीमांच्या मधोमध काम करतात. हे हॅकर्स परवानगीशिवाय सिस्टीममध्ये प्रवेश करू शकतात, परंतु कोणत्याही वाईट हेतू न बाळगता, वैयक्तिक फायदा व विनाश केंद्रस्थानी न ठेवता, असुरक्षिततेचा गैरफायदा न घेता ते त्या त्रुटींची माहिती सिस्टीमच्या मालकांना देतात.
३. रेड हॅट हॅकर्स : हे हॅकर्स हानिकारक कारवाया रोखण्यासाठी थेट सायबर गुन्हेगारांवर (ब्लॅक हॅट हॅकर्सवर) हल्ला करतात आणि त्यांच्या सिस्टिम्स निकामी करतात.
४. ब्लू हॅट हॅकर्स : कंपन्या नवीन उत्पादन किंवा सॉफ्टवेअर लाँच करण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता तपासण्यासाठी या बाह्य सुरक्षा तज्ज्ञांना आमंत्रित करतात.
५. ग्रीन हॅट हॅकर्स : हे सायबर सुरक्षेचे कौशल्य शिकणारे नवशिके असतात.
६. स्क्रिप्ट किडीज : हे अननुभवी युजर्स असतात. त्यांच्याकडे सखोल तांत्रिक ज्ञान नसते, परंतु ते आधीच तयार असलेल्या हॅकिंग टूल्सचा वापर करतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
ॲड. शालिनी दीपक शर्मा पुणेस्थित डीएनएस लीगल ॲण्ड पार्टनर्सच्या संस्थापक व व्यवस्थापकीय भागीदार असून कायदे अभ्यासक आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.