पीक विम्याचा चेंडू आता मुख्यमंत्र्यांच्याच दालनात!
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील ८ महसूल मंडला पैकी लाखपूरी आणि कुरुम या दोनच सर्कलमधील सोयाबीन पिकाला एकरी केवळ ३०० ते १००० रुपये इतका अत्यल्प पीक विमा जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात आंदोलन झाल्यानंतर या विषयाची जिल्हा स्तरावर बैठक झाली. या मदतीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कड़े करण्यात आली आहे.
प्रगती शेतकरी मंडळाचे नेते राजू वानखडे यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून १५ मे रोजी तब्बल ४५ अंश तापमानात तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर महामोर्चाचे आयोजन केले होते.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार हरिष पिंपळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि पीक विमा कंपनीशी तातडीने संपर्क साधून सोमवारी (ता.१८) त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी आणि शेतकरी चळवळीतील नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली.
या बैठकीत पीक विमा कंपनीच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, विधानसभेत मुख्यमंत्री यांनी पीक विमा काढलेल्या तसेच विमा न काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट १७,५०० रुपये प्रति हेक्टर विमा देण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर पीक विम्याबाबत शेतकरी मंडळ व विविध संघटनांची बैठक थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात, मुंबई येथे आयोजित करण्याचे आश्वासन आमदार पिंपळे यांनी दिले.
या बैठकीस आमदार पिंपळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, प्रगती शेतकरी मंडळाचे राजू वानखडे, भारतीय किसान संघाचे राहुल राठी, शेतकरी संघटनेचे गुलाबराव म्हसाये, क्रांतिकारी संघटनेचे राहुल वानखडे, रियाजखान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कैलास साबळे, राष्ट्रवादीचे मंगेश कुकडे उपस्थित होते.
----
चौकट
प्रोत्साहन अनुदानाची मागणी
पीक कर्जमाफी आणि चालू कर्जदार शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी नेते आणि आमदारांना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.