मका उत्पादक शेतकऱ्यांचे
७५ लाख रखडले
----
प्रशासकीय दिरंगाईचा शेतकऱ्यांना फटका
----
ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत मका बाजार समितीला विकला होता. मात्र विक्री होऊन तीन महिने उलटले, तरी ११५ शेतकऱ्यांचे तब्बल ७५ लाख चार हजार आठशे रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जिल्ह्यात माण, फलटण तालुक्यांत मका पिकांसाठी दोन हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले होते. यामध्ये फलटण केंद्रावर २१० शेतकऱ्यांना ५६९५ क्विंटल मक्याची खरेदी झाली. फलटण केंद्रात मका विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एक कोटी ३६ लाख ८९ हजार २०० रुपये मिळाले आहे. माण तालुक्यातील केंद्रावर १३३ शेतकऱ्यांनी तीन हजार ७३२ क्विंटल मका २४०० रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने खरेदी केली होती. याची एकूण रक्कम ८९ लाख ५६ हजार ८०० रुपये झाली होती. नियमानुसार माल जमा केल्यानंतर काही दिवसांतच पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत केवळ १८ शेतकऱ्यांना १४ लाख ५२ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. उर्वरित ११६ शेतकऱ्यांचे ७५ लाख चार हजार ८०० रुपये अद्याप शासनस्तरावर रखडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मक्याचे पैसे हाती येताच विकास सोसायट्यांचे कर्ज फेडण्याचे नियोजन केले होते. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरले असते, तर शेतकऱ्यांना व्याजात सवलतीचा फायदा मिळाला असता. मात्र रक्कम रखडल्याने रकमेचे वाढीव व्याज भरावे लागणार आहे. एका केंद्रावर पैसे मिळतात व दुसऱ्या केंद्रावर शेतकऱ्यांना हक्काच्या पैशाची वाट पाहण्याची वेळ आली आहे. याबाबत विचारणा केली असता, आम्ही सर्व प्रक्रिया ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करून माहिती सातारा येथील मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाला पाठवली आहे, असे सांगण्यात आले. मार्केटिंग फेडरेशननेही ही माहिती मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवल्याचे सांगितले आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, अशी माहिती देण्यात आली.
चौकट -----
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
शासकीय योजनेवर विश्वास ठेवून हमीभाव केंद्रावर माल विकला ही आमची चूक झाली का, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. एकीकडे नैसर्गिक संकट आणि दुसरीकडे हक्काच्या पैशांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.