CKL26B03276
शेटफळ (ता. करमाळा) : येथे मकापासून मुरघास करून त्याच्या बॅगा भरताना शेतकरी.
---
चाराटंचाईच्या भीतीने मुरघासाची तयारी
आठ ते दहा महिने टिकणारा चारा साठविण्याकडे पशुपालकांचा कल
गजेंद्र पोळ : सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. २ : करमाळा तालुक्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य चाराटंचाई लक्षात घेऊन पशुपालकांनी आतापासूनच मुरघास तयार करून साठविण्यास सुरुवात केली आहे. स्वतःच्या शेतात चारा उपलब्ध नसलेले शेतकरीही मका, कडवळ आदी चारा पिके विकत घेऊन मुरघास तयार करीत आहेत. त्यामुळे ओल्या चाऱ्याचे दर वाढले असून, पूर्वी ११०० ते १२०० रुपये गुंठा मिळणाऱ्या मक्याचे दर आता दोन ते अडीच हजार रुपये गुंठ्यापर्यंत पोचले आहेत.
पशुपालक शेतातच कुट्टी मशिनच्या साह्याने चाऱ्याची बारीक कुट्टी करून ती प्लास्टिकच्या हवाबंद मोठ्या पिशव्यांमध्ये साठवत आहेत. योग्य पद्धतीने तयार केलेला मुरघास आठ ते दहा महिने टिकतो. जनावरेही हा चारा आवडीने खात असल्याने दूध उत्पादनासाठी तो उपयुक्त ठरतो. मात्र, मुरघास तयार करण्यासाठी आणि चारा विकत घेण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. दुधाच्या उत्पन्नातून चाऱ्याचा खर्च भागविणे कठीण झाल्याने पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शासनाने सर्व जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
---
कोट
सध्या पशुपालक दुभत्या जनावरांना जगविण्यासाठी खर्चाचा विचार न करता विकतचा चारा देत आहेत. मात्र, भाकड जनावरांची अवस्था बिकट आहे. शासनाने त्यांच्यासाठी मोफत चाऱ्याची व्यवस्था करावी. तसेच उपलब्ध उसाची कुट्टी करून ती पशुपालकांना मोफत द्यावी.
- राजेंद्र साबळे, पशुपालक, शेतकरी
---
कोट
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत दूध उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. मात्र, जनावरे जगविणे हेच पशुपालकांसमोरील मोठे आव्हान आहे. उन्हाळ्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन अल्प पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना आतापासूनच चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
- किरण पोळ, चेअरमन, नागनाथ दूध संकलन केंद्र, शेटफळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.