शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम
होल्ड किंवा कपात करण्यास मनाई
निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांचे निर्देश
नाशिक : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मंजूर करण्यात आली आहे. या मदतीसह नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून बँकांनी कोणत्याही प्रकारची कर्जवसुली करू नये. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली मदतीची रक्कम होल्ड ठेवणे किंवा त्यातून कपात करणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांना दिले आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अग्रिम मदत आणि नैसर्गिक आपत्ती नुकसानभरपाईचे अनुदान दिले जात आहे. ही मदत संबंधित शेतकऱ्यांना विनाअडथळा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वळती करू नये. तसेच अनुदान जमा झालेल्या खात्यावर कोणत्याही कारणास्तव होल्ड ठेवू नये किंवा रक्कम काढण्यास प्रतिबंध करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
यापूर्वी काही प्रकरणांमध्ये अनुदानाची रक्कम कर्जखात्यात वळती केली असल्यास अथवा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम होल्ड ठेवली असल्यास, संबंधित प्रकरणांची तपासणी करून लागू कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असेही निर्देशांत नमूद केले आहे. या आदेशांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि इतर बँकांच्या शाखा व्यवस्थापकांना या निर्देशांची माहिती द्यावी. तसेच सर्व बँकांनी निर्देशांचे काटेकोर पालन करावे. उल्लंघन झाल्यास लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे राजपूत यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.