SGW26B09356
अधिवेशनात बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख.
SGW26B09357
‘सकाळ’मध्ये २२ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झालेली मका खरेदीची बातमी.
‘सकाळ’च्या बातमीवर आमदार देशमुखांनी विधानसभेत उठविला आवाज
मका खरेदीसह वीज, हमीभाव, पीकविमा, कर्जमाफी आणि तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसंदर्भातही केले उपस्थित प्रश्न
सांगोला, ता. २५ : ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या २१ हजार क्विंटल मका खरेदीविना पडून असल्याच्या वृत्ताची दखल घेत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी थेट विधानसभेत आवाज उठवत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. केवळ मका खरेदीच नव्हे, तर वीज, हमीभाव, पीकविमा, कर्जमाफी आणि तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसंदर्भातील व्यापक प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडली.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत तालुक्यात मक्याचे झालेले मोठे उत्पन्न व शासनाने थोडेफार हमीभावाने खरेदी केलेली मका याबाबत सविस्तरपणे मत मांडले. तालुक्यातील ७४१ शेतकऱ्यांचा सुमारे २१ हजार १९८ क्विंटल मका नोंदणी करूनही खरेदीविना शेतकऱ्यांच्या दारात पडून आहे. शासनाकडून केवळ १४ दिवसच मका खरेदी करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी २५ हजार क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी केंद्र बंद करण्यात आले.
तालुक्यातील ९१३ शेतकऱ्यांनी ११२५ हेक्टर क्षेत्रावरील २६ हजार ४६५ क्विंटल मक्याची नोंदणी केली होती. मात्र फक्त ५ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. प्रत्यक्षात ५ हजार २६७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आणि २१ जानेवारीपासून खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आली. परिणामी मोठ्या प्रमाणावर मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. सध्या बाजारात भुसार व्यापाऱ्यांकडून मका १८०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत आहे. शासनाच्या हमीभावाच्या तुलनेत सुमारे ६०० रुपयांचा फरक पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. एकीकडे शासन एआय द्वारे शेती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे हमीभाव मिळत नाही; हमीभावापेक्षा कमी किमतीत शेतीमाल आज विकावा लागत आहे, अशा परिस्थितीत शेतकरी कसा टिकणार? असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
हिरव्या चाऱ्यासाठी अनुदानाची मागणी
शेती मोजणीसाठी पोलिस यंत्रणा मोफत देण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी अधिकाऱ्यांअभावी मोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हिरव्या चाऱ्यासाठी शासनाने पूर्वीप्रमाणे अनुदान देण्याची मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ जाहीर झाला असला तरी पूर्वीच्या नुकसानीचे अनुदान अद्याप न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.