उसाच्या भावासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला
धुळे - सोलापूर महामार्गावर ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
ॲग्रोवन वृत्तसेवा
धाराशिव : उसाला भाव जाहीर करा, चार हजार रुपये पहिली उचल द्यावी, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये दुष्काळी मदत द्यावी व दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता. १६) धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येडशी टोल नाका परिसरात सकाळी साडेअकरापासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून दहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे व संघटनेच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत तिढा कायम होता. विविध मागण्यांसाठी सोमवारपासून येडशी टोलनाक्यावर बेमुदत रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने यापू्र्वीच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दिला होता.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, निवेदने आणि विविध आंदोलने करण्यात आली. जिल्ह्यातील साखर कारखानदारांना प्रत्यक्ष भेटूनही उसाच्या दराबाबत निवेदने देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नावर बैठक बोलावली होती; मात्र या बैठकीला एकही कारखानदार उपस्थित राहिला नसल्याने ती निष्फळ ठरली.
दोन दिवसांत पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन देऊनही अद्याप बैठक झालेली नाही. यामुळे प्रशासन आणि कारखानदारांकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी उसाला प्रतिटन चार हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पहिली उचल द्यावी आणि पंधरा दिवसांच्या आत ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.
यासोबत जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी, खरीप हंगाम २०२६-२७ चा शंभर टक्के पीकविमा मंजूर करून रक्कम त्वरित खात्यावर जमा करावी, तसेच खरीप हंगाम २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील प्रलंबित पीकविम्याचे वितरण करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. याशिवाय जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून तो चारा छावण्यांऐवजी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला द्यावा, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासूनच संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला.
आंदोलनानंतर काही अधिकाऱ्यांनी येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाण होते. आंदोलनात मराठवाडा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, युवा जिल्हाध्यक्ष विष्णूदास काळे, रविकिरण गरड, चंद्रकांत समुद्रे, संजय भोसले, शेषराव साळुंके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन टेकाळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--- फोटो W66144 ----
धाराशिव : उसाला चार हजार रुपये पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येडशी टोल नाक्यावर सुरु असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत रास्ता रोको आंदोलन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.