विद्राव्य खतांच्या किमतीत
१५ ते २० टक्क्यांनी वाढ
महागाईचा फटका, उत्पादन खर्च वाढला
अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः खानदेशात युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा कमी आहे. त्यातच केळी व भाजीपाला पट्ट्यात सरळ व संयुक्त खतांना मागणी अधिक आहे. खतांचा पुरवठा संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी पर्याय म्हणून विद्राव्य खतांचा वापर करीत आहेत. मात्र, इराणमधील अस्थिरतेनंतर विद्राव्य खतांच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात विविध कंपन्यांची विद्राव्य खते उपलब्ध असून, प्रत्येक कंपनीच्या खतांचे दर वेगवेगळे आहेत.
डीएपी खताचा पुरवठा मागील दोन-तीन वर्षांपासून कमी आहे. या खताची मागणी सर्वाधिक असते. परंतु पुरवठा कमी असतो. या खताची जळगाव जिल्ह्यात खरिपात २० ते २२ हजार टन मागणी असते. परंतु पुरवठा अपेक्षेएवढा होत नाही. सर्वच शेतकरी डीएपीची मागणी करतात. केळी, भाजीपाला पट्ट्यात या खताचा उठाव अधिक आहे. याच भागात टंचाई असते. तसेच १०.२६.२६ या खताची देखील मागणी आहे. पण पुरवठा कमी आहे.
युरियाला देखील मागणी आहे. अनेक शेतकरी एकाच वेळी युरियाची खरेदी करतात. अन्य भागांत यामुळे तुटवडा तयार होतो. यामुळे प्रत्येक भागात समान वितरण व एकाच शेतकऱ्यास अधिकचे खत देणे टाळले पाहिजे, असाही मुद्दा उपस्थित होत आहे. युरियाचा या हंगामात सुमारे ७६ हजार टन पुरवठा होईल. एकूण तीन लाख टन विविध खते जिल्ह्यात खरिपात येतील. त्याचा पुरवठा लक्ष्यांक वरिष्ठ कार्यालयाने मंजूर केला आहे.
पावसानंतर सरळ खतांची मागणी
पाऊस आल्यानंतर कडधान्ये, तृणधान्ये, तेलबिया व अन्य कोरडवाहू पिकांसाठी देखील सरळ व संयुक्त खतांची मागणी होती. अनेक शेतकरी पेरणी करतानाच खतेही देतात. या काळात खतांची मागणी होती. भाजीपाला, फळपिकांसाठी डीएपी, युरिया हवा तेवढा मिळत नसल्याने शेतकरी विद्राव्य खते वापरत आहेत.
गोणीमागे ७०० ते १००० रुपयांची वाढ
विद्राव्य खतांसाठी सध्या मोठा किंवा अधिकचा खर्च करावा लागत आहे. त्यात १२.६१.०, १३.४०.१३, ०५.२.३४ आदी खतांचा समावेश आहे. या खतांच्या किमती वाढल्या आहेत. काही कंपन्यांचे १२.६१.० हे खत (२५ किलोची गोणी) ५२०० रुपयांना मिळत आहे. मागील वर्षी हेच खत ४३०० ते ४४०० रुपयांना मिळत होते. यासोबत पीजीआर (प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर), पीजीपी (प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर) खते, द्रव्येही बाजारात असून, त्यांचे दरही १५ ते २० टक्के वाढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.