बारामती, ता. ४ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील १ हजार १२६ दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांचा निर्वाह भत्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आला आहे. यासाठी ३९ लाख ४१ हजार रुपयांचे वितरण केले गेले.
सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षात पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिमहिना ५०० रुपये याप्रमाणे सात महिन्यांचे प्रत्येकी ३५०० रुपये देण्यात आले आहेत. त्यानुसार तालुक्यातील १ हजार १२६ लाभार्थ्यांच्या खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आधार मिळावा, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत व्हावी आणि त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या निधीमुळे दिव्यांग कुटुंबांना सणासुदीच्या काळात आर्थिक हातभार लागणार आहे.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती तसेच जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दिवाळीपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात सात महिन्यांची रक्कम जमा होऊ शकली. लाभार्थ्यांनी आपली बँक खाती सुरू स्थितीत ठेवावीत तसेच आधार क्रमांकाशी खाते संलग्न असल्याची खात्री करावी, असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे.