फ्लोरिडा (अमेरिका) : अमेरिकेतील मराठी समुदायासाठी गेल्या सात वर्षांपासून विविध सेवाभावी आणि सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या ‘व्हिटॅमिन म’ संस्थेतर्फे यंदाही फ्लोरिडामध्ये ऑनलाइन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोरोना काळात गरजू कुटुंबांना घरपोच मोफत किराणा साहित्य देण्यापासून सुमारे ३०० रोपांचे मोफत वाटप करण्यापर्यंत विविध सामाजिक उपक्रम ‘व्हिटॅमिन म’ने राबविले आहेत. या कार्याची भारतीय आकाशवाणीनेही दखल घेतली होती. संस्थेच्या संचालिका यशश्री देशपांडे यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना मांडलेला समाजाला एकत्र आणण्याचा उद्देश डिजिटल माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जातो.
अशी होते स्पर्धा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत स्पर्धक व्हॉट्सॲप समूहावर सजावटीचे फोटो पाठवतात. त्यानंतर कलाक्षेत्रातील तज्ज्ञ परीक्षक प्रवेशिकांचे परीक्षण करून तिसऱ्या दिवशी निकाल जाहीर करतात. यंदा रीमा अग्रवाल गुप्ता (पंढरपूरची वारी), सुखदा गोखले (फुलांचा गणपती) आणि स्नेहल मंत्री भुतडा (ऋषिकेश दर्शन) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. अनुराधा भाटे आणि स्मिता सावे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. अमेरिकेत राहूनही मराठी संस्कृती आणि पुढील पिढीशी सांस्कृतिक नाते जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.